Next
मुलांना वेळ द्या...
BOI
Saturday, August 18, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


बाळाचा जन्म झाला की त्याचं सगळ्यात पहिलं-वहिलं जग म्हणजे त्याचं कुटुंब. या कुटुंबापासूनच त्याच्या आयुष्याची सुरुवात होते. आपल्या मुलाची वाढ निकोप व्हायला हवी असेल, तर त्याला सुरुवातीच्या काळात आनंदी, उत्साही, सकारात्मक वातावरण पुरवणं खूप आवश्यक असतं.  ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या बालवयातल्या मानसिकतेबद्दल...
..............................................
बाळाचा जन्म झाला की त्याचं या जगातलं सगळ्यात पहिलं-वहिलं जग म्हणजे त्याचं कुटुंब. या कुटुंबापासूनच त्याच्या आयुष्याची सुरुवात होते. या जगातल्या, बाळाच्या या छोट्या विश्वातल्या सगळ्यांत महत्त्वाच्या दोन व्यक्ती म्हणजे बाळाचे आई आणि बाबा. कारण त्यांच्यापासूनच बाळाचं आयुष्य सुरू होतं. त्याच्या कुटुंबातलं वातावरण, त्याला मिळणारी वागणुक, एकमेकांशी असलेले नातेसंबंध या साऱ्यातूनच त्याला या जगाची ओळख होत असते. सुरुवातीच्या काळात बाळाला जर पालकांचा पुरेसा वेळ मिळाला, आनंदी, प्रोत्साहन देणारं वातावरण मिळालं, तर त्याचं व्यक्तिमत्व आपोआपच सकारात्मक, आनंदी, उत्साही बनत जातं. त्याचा आत्मविश्वास वाढतो, पण याउलट जर काही कारणांनी त्याच्या लहान वयात त्याला तणावांना, दुःखांना सामोरं जावं लागलं, तर मात्र त्याचा संपूर्ण आयुष्याकडे, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच  नकारात्मक होऊन जातो. कारण त्याच्या आयुष्याची सुरुवातच मुळी नकारात्मक झालेली असते. अशी मुलं नेहमीच रडकी, चिडचिडी, दुखी, शांत, अबोल, एकलकोंडी होत जातात. त्यांचं व्यक्तिमत्वही मग तसच नकारात्मक होत जातं.

आपल्या मुलाची वाढ निकोप व्हायला हवी असेल, त्याचं व्यक्तिमत्व सकारात्मक व्हायला हवं असेल, तर त्याला सुरुवातीच्या काळात आनंदी, उत्साही, सकारात्मक वातावरण पुरवणं खूप आवश्यक असतं. जसं हे वातावरण त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं, तसच, किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो आई वडिलांचा सहवास, त्यांचा वेळ, त्यांच्याबरोबरचा संवाद, त्यांच प्रेम. कारण यावरच त्यांची संपूर्ण आयुष्याची जडणघडण होत असते. त्यांच्या छोट्या, उमलत्या वयात हा सहवास, प्रेम, संवाद जर त्यांना मिळाला नाही, तर त्याचे बरेच गंभीर व दूरगामी परिणाम मुलांवर होतात.

काही वेळा परिस्थितीजन्य कारणांमुळे मुलांना एखाद्या पालकाचा सहवास कमी लाभतो. जसे पालकांची अचानक झालेली बदली, निर्माण झालेली काही विवादात्मक परिस्थिती, नोकरीनिमित्त काही काळ कुटुंबापासून दूर जावं लागणं, अशा परिस्थितीत मूल लहान असल्याने त्याला या बदलाला सामोरं जाणं, हा बदल स्वीकारणं खूप अवघड जातं. मूलं मोठी व्हायला लागल्यावर ती हळूहळू समाजात मिसळायला लागतात. या काळातही जर त्यांचा पालकांबरोबरचा सहवास कमी झाला, तर मुलांच्या मनात तात्कालिक भीती निर्माण होते. म्हणूनच मुलं शाळेत जायला लागली, की खूप रडतात. त्यांच्या मनातल्या या भितीला 'सेप्रेशन एंझायटी' किंवा 'विलगता भीती' असं म्हणतात.

जेव्हा कारण तात्कालिक स्वरूपाचं असतं, तेव्हा हळूहळू ही भीती कमी होत जाते. म्हणजे मूल शाळेत जायला लागतं तेव्हा सुरुवातीला ते खूप रडतं, पण नंतर आपल्याला घरचे न्यायला येतात किंवा हा दुरावा थोड्याच वेळापुरता आहे, हे समजायला लागल्यावर काही दिवसांनी ते हळूहळू शांत होते आणि शाळा या नवीन  विश्वाशी, जगाशी जुळवून घेण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची एक नवी धडपड सुरू होते. या वातावरणाशी समायोजन साधणं जमायला लागलं, की त्याच्या मनातली 'सेप्रेशन एंझायटी' कमी होत जाते. पालक व मुलाचं नात सुंदर, भक्कम असेल, तर ही भीती लवकर कमी होते. पण हे नातं जर कमकुवत असेल, तणावपूर्ण असेल किंवा सततच काही ना काही कारणांनी मूल हा दुरावा अनुभवत असेल, तर ही भीती मनात पक्की होत जाते आणि मग  मूल भित्रं, रडकं, एकलकोंडं बनत जातं.

आपल्या मुलात अशा वर्तन समस्या निर्माण होऊ नयेत, असं जर वाटत असेल, तर आपल्या मुलाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्याला पुरेसा वेळ, आनंदी वातावरण, विश्वास देणं हे खूपच महत्वाचं आहे. काही कारणाने जर थोड्या काळासाठी दूर जावं लागणार असेल, तर हळूहळू मुलापर्यंत ते कौशल्याने पोचवणं महत्त्वाचं आहे. ज्यामुळे त्याच्या मनात दुरावले जाण्याची भीती निर्माण होणार नाही आणि मूल आनंदी, खेळकर आणि सकारात्मक दृष्टीकोन घेऊन मोठं होईल. परिस्थितीतील बदलांशी समायोजन साधणं त्यांना सोपं जातं आणि मग पुढच्या सर्व समस्या आपोआपच टाळता येतात.  

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search