Next
सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी
नंदुरबार तालुक्यातील कलमाडी ग्रामस्थांकडून कृतज्ञता
शशिकांत घासकडबी
Monday, October 22 | 05:16 PM
15 0 0
Share this story

चंद्रकांत सपकाळे यांचा सोन्याची अंगठी देऊन सत्कार करताना कलमाडी ग्रामस्थ.

नंदुरबार : शिक्षक गावाच्या शाळेसाठी आणि गावासाठीही काय करू शकतात आणि त्या कृतज्ञतेपोटी गाव काय करू शकते, हे कल्पनेच्या पलीकडचे असू शकते. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कलमाडी तर्फ बोरद (ता. शहादा) येथील ग्रामस्थांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला कृतज्ञतेपोटी १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली. गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेली ही भेट त्या शिक्षकाने स्वीकारली; मात्र त्या अंगठीच्या किमतीत स्वतःच्या वतीने काही रक्कम घालून ते पैसे गावाच्या आणि शाळेच्या विकासासाठी वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रकांत मुरलीधर सपकाळे हे त्या शिक्षकाचे नाव.

मूळचे कानळदा (ता. जि. जळगाव) येथील असलेले सपकाळे नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शहादा तालुक्यातील परिवर्धे केंद्रांतर्गत असलेल्या कलमाडी गावातील शाळेत ते १५ वर्षे कार्यरत होते. शेणामातीचे तळ असणाऱ्या शाळेला त्यांनी आपले सहकारी शिक्षक व गावकऱ्यांच्या सहकार्याने आयएसओ मानांकनापर्यंत पोहोचवले. शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास साधला. आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त शाळेसाठीच न करता त्यांनी गावकऱ्यांसाठीही केला होता. त्यांना या वर्षीचा शासनाचा राज्य पुरस्कार मिळाल्याने कलमाडी गावकऱ्यांनी सपकाळे सरांचा गाव पातळीवर सामूहिक सत्कार केला. त्यांना १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट दिली. शिवाय वैयक्तिक स्वरूपात ८७ जणांनी शाली व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

गावकऱ्यांमधून प्रत्येकालाच सरांचे कौतुक करायचे असल्याने कार्यक्रम चार तास चालला. सत्काराला उत्तर देताना सरांनी गावकऱ्यांच्या ऋणात राहायला आवडेल, असे सांगितले. ‘गावाच्या सहकार्याने व चांगल्या सहकारी शिक्षकांमुळे मी ही उंची गाठू शकलो. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांना समर्पित करतो आहे. गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेली अंगठी मी स्वीकारतोय; मात्र या अंगठीच्या किमतीत अजून वाढीव रक्कम टाकून ती रक्कम कलमाडी शाळा व गावाच्या सामाजिक विकासासाठी माझ्याकडून दिली जाणार आहे,’ असे ते म्हणाले. 

एवढेच नव्हे, तर सत्कार स्वरूपात मिळालेल्या सर्व शाली हिवाळ्यात गरीब ऊसतोड मजुरांना वाटण्यासाठी त्यांनी कलमाडी शाळेच्या कर्मचाऱ्यांकडे दिल्या. कलमाडी गावातील सर्वांनी दिलेले प्रेम व केलेले सहकार्य कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले. 

या नियोजनात सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला. ग्रामस्थ संदीप पाटील, मनोज कदम, प्रवीण कलापुरे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सरपंच यांच्यासह कलमाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चेतन शिंदे , शिक्षक संतोष जगताप, श्रीमती स्नेहल गुगळे या शिक्षकांनी अतिशय छान नियोजन केले. संदीप पाटील यांनी उपस्थित असलेल्या ३००हून अधिक लोकांसाठी अल्पोपहाराची सोय केली. 

कलमाडी ग्रामस्थांनी शिक्षकाचा केलेला हा बहुमान शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकासाठी व महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sanjay pawar About 23 Days ago
कौतुकास्पद कार्य,,अभिनंदन सपकाळे सर
2
0
vipul navale About 23 Days ago
अभिनंदन सरांचे💐💐
1
0
किशोर मिरघे कलमाडी About 24 Days ago
मान उंचवणारे काम कलमाडी गावाने केले
1
0
PRAVIN MOHANRAO KALAPURE About 24 Days ago
Kharch Gavrvaspad Karya Ahe
1
0

Select Language
Share Link