Next
‘परिस्थितीवर मात करणाऱ्या स्त्रियांच्या जिद्दीला सलाम’
प्रेस रिलीज
Wednesday, May 02 | 05:55 PM
15 0 0
Share this story

वंचित विकास संस्थेच्या ‘अभया सन्मान पुरस्कार' सोहळ्यात सन्मानार्थी  दहा महिलांसह,अभिनेत्री जयमाला इनामदार, विलास चाफेकर, ज्योती जोशी आदी मान्यवर

पुणे : ‘स्त्री नेहमी कुटुंबाचा विचार सर्वप्रथम करत असते. त्यांच्यामध्ये कष्ट कऱण्याची सर्वाधिक ताकद आहे. प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यात संघर्ष करते, तडजोड करते, प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन, आज या सर्वजणी सुखी, समृद्ध जीवन जगत आहेत. याठिकाणी गौरविण्यात आलेल्या सर्वच स्त्रियांचा संघर्ष खूप मोठा आहे. त्यांच्या जिद्दीला माझा सलाम’, असे मत ‘गाढवाचं लग्न’ फेम मराठी अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी व्यक्त केले. 

वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे देण्यात येणाऱ्या ‘अभया सन्मान पुरस्कार २०१८’ या सन्मान सोहळ्यादरम्यान त्या बोलत होत्या. अभया सन्मान पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, संस्थेतर्फे कठीण परिस्थितीवर मात करून संकटाना धैर्याने तोंड देणाऱ्या रणरागिणींना दरवर्षी अभया मैत्री गटाच्या वर्धापन दिनी- एक मे रोजी हा सन्मान प्रदान करण्यात येतो. या वेळी ‘निर्मळ रानवारा’च्या संपादिका ज्योती जोशी या प्रमुख पाहुण्या होत्या. वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर, संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष व संचालिका सुनीता जोगळेकर, सहसंचालिका मीनाताई कुर्लेकर , संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्यासह इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

इनामदार पुढे म्हणाल्या, ‘या स्त्रियांप्रमाणे मला काही जास्त अडचणींचा सामना करावा लागला नाही, परंतू मला देखील संघर्ष करावा लागला आणि यात मला माझ्या पतीची साथ होती. मला व्यासपिठावर बोलता येत नव्हते, परंतू  माझ्या मनातील भीती नाहीशी करून त्यांनी मला व्यासपिठावर बोलायला शिकवले. माझे पती माझे गुरु आहेत. आज त्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथे आहे.’
 
या वर्षी अभया सन्मान पुरस्कारासाठी दहा जणींची निवड करण्यात आली. यात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विशाखा, गरिबीशी सामना करून ट्रॅक्टर चालवणे, शेती, मधमाशी पालन, ग्लास पेंटिंगमध्ये निपुण असणाऱ्या इंदिरा भिलारे, ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण व पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुनीता गायकवाड, मराठी संस्कृती आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या जेनी लामा, कमी वयात कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या व रुग्णांसाठी घरपोच सेवा देणाऱ्या  छाया नागोशी, यांच्यासह सुरेखा पळसकर, ज्योती सपकाळ, मनीषा शिंदे, डॉ. नीलम ताटके आणि विमल वाणी यांचा समावेश होता.

याव्यतिरिक्त सुतारदरा येथे जनार्दन प्रतिष्ठानची स्थापना करून समाजकार्यास हातभार लावणाऱ्या उषा उपाध्ये आणि लोकांचे दुःख जाणून ते दूर करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सदैव उभ्या राहणाऱ्या व रणरागिणी पुरस्काराच्या मानकरी हिराबाई कांबळे यांचाही या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. सुतारदरा वसाहतीत अभया गटातर्फे घेण्यात आलेल्या उद्योजकता प्रक्षिक्षण शिबिरातील स्त्रियांना देखील प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. या वेळी काही उद्योजक स्त्रियांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

‘येथे पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या प्रत्येक स्त्रीची कथा डोळ्यात पाणी आणणारी आहे. त्यांच्या संघर्षातून आपण प्रेरणा घ्यायला हवी’, असे मत निर्मळ रानवाराच्या संपादिका ज्योती जोशी यांनी व्यक्त केले.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी गोंगले यांनी केले. संस्थेच्या मिनाक्षी नवले, चैत्राली वाघ, प्रतिभा शिंदे, अनुजा पाटील, मिनाक्षी नागरे व तेजस्विनी थिटे यांनी पुरस्कार विजेत्या स्त्रियांच्या सन्मानपत्राचे वाचन केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link