Next
‘मराठी व्यावसायिकांनी कार्यक्षेत्र वाढवावे’
प्रेस रिलीज
Friday, January 05, 2018 | 04:51 PM
15 0 0
Share this article:

‘भारी भरारी’ फन फूड फेस्टीव्हलच्या उद्घाटनप्रसंगी माधव गोडबोले, मंजुश्री खर्डेकर, श्रीकृष्ण चितळे, श्रीपाद करमरकर, माधुरी सहस्रबुद्धे आदी

पुणे : ‘मराठी माणसाकडे अंगभूत कलागुण असतात. त्यांना मार्केटिंगची जोड दिली, तर त्याचे मोठ्या व्यवसायात रूपांतर होऊ शकते. घरातून सुरु केलेल्या व्यवसायाला व्यापक स्वरूप देण्यासाठी व्यावसायिकांनी आपले कार्यक्षेत्र वाढविले पाहिजे. नव्या माध्यमांचा आणि अशा प्रकारच्या फेस्टिव्हलचा वापर करून घ्यावा,’ असा सल्ला चितळे उद्योग समूहाचे प्रमुख श्रीकृष्ण चितळे यांनी दिला.

मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, कऱ्हाडे ब्राम्हण बेनेवालेंट फाउंडेशन आणि युवा यांच्या संयुक्त विद्यमाने म्हात्रे पुलाजवळील डी.पी.रोडवर असलेल्या शुभारंभ लॉन्स, येथे ५ ते ७ जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या ‘भारी भरारी’ या फन फूड शॉपिंग फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी चितळे बोलत होते. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, निवेदक सुधीर गाडगीळ, अभिनेते रवींद्र मंकणी, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, वाडेश्वरचे जयंत जोशी, श्रीपाद करमरकर, मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी, सुमुख आगाशे, प्रसाद पटवर्धन, राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले, अभिजित देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदर्शन पाहताना श्रीकृष्ण चितळे , सुधीर गाडगीळ व इतर.
या वेळी सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘मराठी व्यावसायिकांनी बनवलेली विविध उत्पादने या प्रदर्शनात आहेत. नव्याने व्यवसाय करणाऱ्या आणि छोट्या व्यावसायिकांसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून घेत आपले उत्पादन व सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी करावा.’ 

रवींद्र मंकणी म्हणाले, ‘ महिलांनी अतिशय कलाकुसरीने वस्तू बनविलेल्या आहेत. त्यांच्या या कलेला प्रोत्साहन देणारे हे फेस्टिवल आहे. ‘भारी भरारी'तुन हे व्यावसायिक भरारी घेतील व आपल्या व्यवसायाला अधिक व्यापक रूप देतील.’

या फन फूड शॉपिंग फेस्टिवलमध्ये विविध भागातील खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खान्देशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रश्श्याची उसळ, घावन, विविध प्रकारची थालीपीठे, मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची रेलचेल येथे आहे. त्याशिवाय गृहसजावट वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, फॅशन फोटोग्राफी, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे असे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. 

एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि लहान मुलांसाठी धम्माल गेम्सही  याठिकाणी आहेत.  दोनशेपेक्षा जास्त स्टॉल्स येथे असून हातमागावर पैठणी विणण्याचा अनुभवही ग्राहकांना घेता येणार आहे. शिवाय, जुन्या यज्ञपात्रांचे प्रदर्शनही यावेळी पाहता येईल.शनिवारी (दि. ६) संध्याकाळी ७ वाजता चंद्रशेखर महामुनी यांच्या सुमधुर संगीताचा कार्यक्रम होणार आहे. चैताली माजगावकर भंडारी यांचा ५ ते ८ या वेळेत पपेट शो (खेळ बाहुल्यांचा) होणार आहे. तर चेतन केतकर यांच्याकडून मातीची भांडी बनवायला शिकता येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search