Next
यंदाचे ‘मराठी रत्न’ पुरस्कार जाहीर
BOI
Monday, February 26 | 06:14 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने दर वर्षी ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘मराठी रत्न’ पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यंदा मधु पोतदार, सुजाता देशमुख आणि देविदास देशपांडे यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.     

२७ फेब्रुवारी हा महाकवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या मराठी साहित्याच्या निर्मितीतून मराठी साहित्य सेवा करणार्याी लेखक/पत्रकारांना मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे ‘मराठी रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुढील महिन्यात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी दिली. यापूर्वी सुधीर गाडगीळ, मुकुंद संगोराम, सुलभा तेरणीकर, प्रभाकर खोले, चारुहास पंडीत, प्रभाकर वाडेकर, सतिश कामत, प्रल्हाद सावंत, श्रीधर लोणी, अद्वैत मेहता, डॉ. शैलेश गुजर, मृणालिनी ढवळे, राजीव साबडे अशा अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   

मधु पोतदार यांची १४ मराठी पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक दैनिके व नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने स्तंभलेखन केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून नोकरी सांभाळत असतानाच काव्य, कथालेखन, प्रवासवर्णन, पत्रलेखन, इतिहासासंबंधी लेखन, चरित्रे, एकांकिका, आत्मचरित्रे (शब्दांकन) असे त्यांचे विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित झाले आहे. चित्रपट व संगीतविषयक व्यक्तीरेखांचे जीवनचरित्र लिहिणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. गीतयात्री गदिमा, छिन्नी हातोड्याचा घाव (संगीतकार राम कदम यांचे आत्मकथन), विनोदवृक्ष (विनोदमूर्ती वसंत शिंदे यांचे आत्मकथन), वसंतवीणा (संगीतकार वसंत देसाई यांचे चरित्र), कुबेर (मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे चरित्र), वसंतलावण्य (संगीतकार वसंत पवार यांचे चरित्र), जनकवी पी. सावळाराम, मराठी चित्रपट संगीतकार कोश ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. ‘छिन्नी हातोड्याचा घाव’, ‘कुबेर’, ‘वसंतलावण्य’ या पुस्तकांना राज्य शासनासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गीतकार जगदीश खेबूडकर, मराठी चित्रपट गीतकार कोश, मराठी चित्रगीते व भावगीते यांच्या आठवणी ही त्यांची आगामी प्रकाशने आहेत. 

सुजाता देशमुख या ‘मेनका प्रकाशना’मध्ये ग्रंथसंपादक आणि ‘माहेर’ मासिकात कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी अनुवाद केलेल्या ‘गौहरजान म्हणतात मला’ या मराठी अनुवादित पुस्तकास साहित्य अकादमीचा २०१७चा उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी राजहंस प्रकाशनमध्ये ग्रंथसंपादक, ‘मिळून सार्यातजणी’ मासिकात कार्यकारी संपादक, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अॅदन्ड जर्नालिझम येथे कोर्स को-ऑर्डिनेटर आणि व्याख्याती, युएनआय, इंडियन एक्स्प्रेस, दिनमान, विशाल सह्याद्री, श्रमिक विचार आदी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केले आहे. त्यांची आतापर्यंत नऊ पुस्तके प्रकाशित झाली असून यातील आठ पुस्तके अनुवादित आहेत. या पुस्तकांना राज्यशासनासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची नवीन अनुवादित पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत. 

देवीदास देशपांडे हे तरुण पत्रकार असून महाराष्ट्र सरकारचा २०१६चा राज्यस्तरीय ‘सोशल मीडिया पुरस्कार’ त्यांना नुकताच मिळाला आहे. मराठीत आरंभीच्या काळापासून ब्लॉगलेखन करणार्याह मोजक्या पत्रकारांपैकी ते एक आहेत. बीबीसी व बीबीसी हिंदीसह अनेक मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केले असून मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराती, फ्रेंच, संस्कृत या भाषा त्यांना येतात. ‘फेसबुकचा जनक मार्क झुकेरबर्ग’ आणि ‘जागतिकीकरणाची बदलती भाषा’ ही त्यांची मराठी पुस्तके प्रकाशित झाली असून, ‘शनिवारवाडा’ हे अनुवादित इंग्रजी पुस्तकही प्रकाशित झाले आहे. सध्या ते ऑर्गनायझर साप्ताहिकासाठी पुण्यातून लेखन करतात तसेच केरळमधील ‘सम्प्रति वार्ताः’ या संस्कृत वृत्त पोर्टलसाठी लेखन करतात. इंडिया अब्रॉड, स्वदेश व पांचजन्य (हिंदी) या वृत्तपत्रांबरोबरच अनेक दिवाळी अंकांमध्येही त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर याहू, जम्मू काश्मीर नाऊ डॉट कॉम (इंग्रजी), प्रवक्ता डॉट कॉम (हिंदी), मॅगआयटी (फ्रेंच), रिडीफ डॉट कॉम, लोकसत्ता डॉट कॉम (मराठी) आणि दिनमलर डॉट कॉम (तमिळ) इत्यादी संकेतस्थळासाठी ते लेखन करतात. ‘माझी भाषा - भविष्याची भाषा’ हे त्यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. 

मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रचनात्मक कामावर भर दिला जातो. मराठीत सही करणे, दारावरील पाटी मराठीत करणे, मराठी शुभेच्छा पत्र पाठवणे, शक्य तिथे मराठीतच बोलणे, ‘माध्यम रत्न पुरस्कार’, ‘मराठी रत्न पुरस्कार’ असे विविध उपक्रम प्रतिष्ठानतर्फे गेली १७ वर्षे सुरू आहेत, असेही वाळिंबे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link