Next
‘कोकणातील प्रेक्षक नाटकाची जाण असलेला’
BOI
Monday, January 22, 2018 | 05:39 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ‘कोकणातले प्रेक्षक हे नाट्यवेडे आणि शांत आहेत. मला तर पुण्यातील प्रेक्षक आणि कोकणातील प्रेक्षक यांच्यात काहीच फरक वाटत नाही. कुठे हसायचं, किती हसायचं हे सगळं तेच ठरवतात. हा प्रेक्षकवर्ग नाटकाची जाण असलेला असल्यामुळे अशा प्रेक्षकांसमोर खरी कसोटी लागते,’ असे मत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

जयेश पाथरे यांच्या ‘स्वामी इव्हेंट्स’तर्फे ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने ते रत्नागिरीत आले आहेत. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या संवादात त्यांनी अनेक गोष्टींचा ऊहापोह केला. या नाटकाचा हा एकूण २२६ वा, तर कोकणातील पहिलाच प्रयोग आहे. या नाटकासाठी दामले यांनी ६०हून अधिक दौरे केले असून, आठ परदेश दौरेही केले आहेत.

नाटकाविषयी ते म्हणाले, ‘आपल्या सध्याच्या आयुष्यात ‘टार्गेट अचीव्ह’ करणं हा खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. हे करता करता ज्या काही गोष्टी वाट्याला येतात त्याच्यावरचे हे नाटक आहे. ध्येयाच्या मागे लागताना आपण काय गमावतो, काय कमावतो याचा लेखाजोखा काढला, तर आपल्या हातात शून्यच उरतो. आपण ध्येय साध्य केले, तरी आपली आरोग्यसंपदा, आपले नातेसंबंध, घरच्यांशी असलेले आपले संबंध यात पूर्वी जो गोडवा होता तो कमी झालेला आहे. आपण स्वतःशी आणि घरच्यांशी ‘नॉन कमिटेबल’ झालोय. स्वत:कडे आणि स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष न दिल्यामुळे काय घडते हे लेखकाने आणि दिग्दर्शकाने वेगळ्या आणि गमतीशीर पद्धतीने मांडले आहे. त्यामुळे हे नाटक ‘शुगरकोटेड कॉमेडी’ असे आहे.’

‘कोकणात नाटकांचे दौरे कमी का येतात,’ या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मेकअप रूम, महिला कलाकारांसाठी चेंजिंग रूम, साउंड सिस्टीम, वॉशरूम यांसारख्या मूलभूत गरजा नाटकांसाठी आवश्यक असतात; मात्र कोकणात या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पूर्वी काहीही चालायचं, कसंही चालायचं आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता आयोजक आणि कलाकार दोघांनाही कसंही चालत नाही. मग त्यातल्या त्यात निर्माता काय पुढाकार घेऊ शकतो, तर उत्तम प्रतीची बस पुरवू शकतो; पण ती बस चालणार रस्त्यावर आणि रस्ताच चांगला नसेल, तर ती उत्तम प्रतीची बस काय करणार? म्हणजे कोकणातील रस्ते आणि नाटक, कलाकारांसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांचा अभाव यांमुळे कोकणात नाटकांचे दौरे कमी येतात.’

‘लेखन ही शैली आहे, कला आहे. त्यासाठी वेगळा अभ्यास लागतो, शब्दसंपदा लागते, शब्दांचा व्यासंग लागतो. त्यामुळे लेखन क्षेत्राकडे वळण्याचा कोणताच विचार नाही,’ असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच शासनाने मनोरंजनावरील ‘जीएसटी’ कमी केला ही प्रेक्षकांसाठी चांगलीच बाब असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search