Next
‘स्पर्धेतील विजय अंतिम ध्येय नसावे’
गायक महेश काळे यांचे मत
BOI
Friday, July 27, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this article:

महेश काळे
पुणे : ‘रिअॅलिटी शोमधील विजय हा मैलाचा दगड असावा, अंतिम ध्येय नसावे, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी व्यक्त केले. महेश काळे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.   

पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, उपाध्यक्ष विश्वजीत पवार यांच्यासह कार्यकारिणी सदस्य तसेच मोठ्या संख्येने पत्रकार या वेळी उपस्थित होते.

काळे म्हणाले, ‘मुलांना कमी वयातच रिअॅलिटी शोमध्ये मिळालेले यश त्यांना पचवता आले पाहिजे. त्यासाठी  पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. ही मुले शिक्षण सोडून अर्थकारणाकडे वळली तर ते धोकादायक आहे. या स्पर्धांमध्ये आर्थिक बक्षिसाऐवजी गाण्याची संधी किंवा मान्यवर गुरूंकडे शिकण्याची संधी मिळणे या मुलांसाठी अधिक योग्य ठरेल असे वाटते. हल्ली गूगलवर प्रत्येक घराण्याचे गाणे ऐकायला मिळत असले तरी गूगल हा गुरू होऊ शकत नाही. आताच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मी कुठेही राहिलो तरी माझ्या शिष्यांच्या संपर्कात राहू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या चांगल्या गोष्टींचा फायदा जरूर घ्यावा,परंतु मूळ गाभा सोडता कामा नये.’ 

‘ज्ञानाची प्रत्यक्ष ऊब ही गुरूसमोर बसून, शिकतानाच मिळते. आपल्या अनुभवातील प्रचितीचा पोत उंचावण्यासाठी गुरू आवश्यक असतो. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गायनाचे धडे गिरवत असताना याची प्रचीती मी स्वतः घेतली आहे. त्यांच्याकडे शिक्षण घेत असताना मी सकाळी उठून त्यांच्याकडे जायचो, त्यांच्याकडून जे जे काही शिकता येईल ते ते शिकायचो. पुन्हा शाळा, कॉलेज करून संध्याकाळीही त्यांच्या घरी हजार असायचो. हा क्रम अगदी सुट्टीच्या शनिवार, रविवार या दिवशीही चुकवलेला नसायचा’, गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या होत असल्याचे काळे यांनी नमूद केले.      

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी संघाचे सरचिटणीस पांडुरंग सांडभोर,अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
‘लहान मुलांमधील कलागुणांना जोपासण्यासाठी आजची आपली शिक्षण पद्धती योग्य आहे का, आणि तिचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल का असा प्रश्न विचारला असता महेश काळे म्हणाले, ‘आपली शिक्षणपद्धती ही मुलांमधील कलागुण जोपासण्यासाठी फारशी प्रोत्साहन देत नाही. संगीत, कला, प्रेम आणि सहानुभूती ही मूल्ये प्राथमिक शिक्षणातूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबणे आवश्यक आहे.’ 

हल्ली गाण्याच्या मैफलींमध्ये गायकाची वेषभूषा व रंगभूषेला अधिक महत्त्व दिले जाते. या विषयावरील प्रश्नाला उत्तर देताना काळे म्हणाले, ‘आताचा जमाना हा ‘दृश्य’ माध्यमांचा आहे. त्यामुळे जोपर्यंत गाण्याचे मर्म हरवत नाही, तोपर्यंत गायकाच्या सादरीकरणावर लक्ष दिले जात असेल तर त्यात काही चूक नाही.’

संगीताचा निर्व्याज आनंद व्यक्तींमध्ये आत्मभाव कसा निर्माण करतो हे सांगताना त्यांनी एक किस्सा सांगितला. ‘एक १२ ते १५ वर्षे संगीताचे शिक्षण घेतलेली पाकिस्तानी मुलगी अमेरिकेत माझ्याकडे शिकायला आली. आपल्याला संगीताचे पुरेसे ज्ञान आहे आणि केवळ 'अॅडव्हान्स्ड' ज्ञानाची आपल्याला गरज आहे असा तिचा समज होता. परंतु, मी तिचे गाणे ऐकून तिला सुरूवातीपासून शिकण्याचा सल्ला दिला. ते तिला तितकेसे आवडले नाही. परंतु, शिकायला सुरूवात केल्यानंतर तिच्या ठायी इतका आपलेपणा निर्माण झाला की एकदा तिने स्वतःहूनच गुरूसेवेच्या भावनेने माझ्या घरातील भांडी घासून ठेवली आणि माझ्या जेवणासाठी भाजीही करून ठेवली.’ 

‘साधना करण्यासाठी  रियाज हा मार्ग आहे. जोपर्यंत व्याकरण समजत नाही, तोपर्यंत काव्य करता येत नाही. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत, त्या यायला लागल्यानंतर स्वराच्या ब्रम्हांडात विहार करतो, ती साधना. साधक जन्मभर असावे.’ असेही त्यांनी सांगितले.

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याबाबत काय विचार आहे, असे विचारले असता, ते म्हणाले, ‘स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ठरवून काही करण्याऐवजी लोकांना शरण जाऊन त्यांच्यापुढे आपली कला पेश केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की ही तुझी ओळख आहे तर ती जास्त महत्त्वाची. त्यात अहंकार नसतो. आपण सर्व एक आहोत अशा भावनेने काम केले तर काही वेगळेपण निर्माण करता येते. त्यासाठी ठरवून मी काही करत नाही. शास्त्रीय संगीत म्हणजे फक्त श्रवणभक्ती नसून, त्यात सक्रीय भागही घेता येतो, याचा अनुभव मी लोकांबरोबर घेतला. ठाण्यात एका कार्यक्रमात मी लोकांना बंदिश शिकवली आणि आम्ही सर्वांनी ती गायली. अशाप्रकारे जेव्हा संगीत माझे न राहता आपले होते तेव्हा ते अधिक जवळचे होते. असे काही वेगळे सुचेल तसे मी उपक्रम करत असतो.’

 (महेश काळे यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search