Next
‘राष्ट्रीय कीर्तनातून पेटली राष्ट्रभक्तीची ज्योत’
BOI
Saturday, January 06 | 12:39 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
‘स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मोट बांधली. टिळक कीर्तन संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या वेळी त्यांनी कीर्तनकारांना ‘राम, श्रीकृष्ण आणि पौराणिक कीर्तनासह शिवचरित्र उलगडून राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवा,’ असा उपदेश केला. तेव्हापासून राष्ट्रीय कीर्तन सुरू झाले, क्रांतिकारक तयार झाले आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने बाजी मारली,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांनी केले.

रत्नागिरीतील स्व. महाजन क्रीडा संकुल येथे ‘कीर्तनसंध्या’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (पाच जानेवारी) आफळेबुवांनी टिळकांचे चरित्र मांडले. टिळकांच्या कॉलेज जीवनातील काही किस्से बुवांनी रंजकपणे सांगितले. महाविद्यालयात सोवळ्याने भोजन, छत्रे गुरुजी, इंग्रजांशी लढा कसा द्यावा याचे गणित सोडवणारे टिळकांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी उलगडले.

‘आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या लाठीकाठीच्या वर्गात टिळकांनी प्रशिक्षण घेतले होते; पण मर्यादित सैन्याने इंग्रजांना हरवणे शक्य नसल्याने टिळकांनी फडके यांच्या लढ्यात भाग घेतला नाही; पण टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव उभा करून हिंदूंमध्ये इंग्रजांविरोधात रणशिंग फुंकले. क्रांतिकारक तयार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि वृत्तपत्रे सुरू करून लढा उभारला,’ असे प्रतिपादन आफळेबुवांनी केले.

‘शरीरयष्टी कमावण्यासाठी त्यांनी व्यायाम केला. वर्षभर वर्ग चुकवला नाही. परीक्षाही दिली; पण सर्व उत्तरे येऊनही पास होण्याएवढी उत्तरेच लिहिली नाहीत. प्रभासपट्टण येथील जातीय दंग्यामध्ये इंग्रजांनी तेल ओतले आणि तेव्हाच भारताची दोन देशांत विभागणी होणार हे टिळकांच्या लक्षात आले. टिळकांनी वृत्तपत्रांतून इंग्रजांवर टीका केली. इंग्रजांना रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून समस्त हिंदूंना एकत्र आणले. रायगडावर जाऊन शिवजयंतीनिमित्त लाठीकाठीचे खेळ, कवायती सुरू केल्या,’ असे आफळे यांनी सांगितले.

‘भारतावर आक्रमणासाठी चीन, पाकिस्तान व पाश्चिमात्य देश सज्ज आहेत. त्यासाठी हिंदूंनीही बलदंड झाले पाहिजे, रोज व्यायाम, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा केली पाहिजे. सीमेवर युद्धासाठी सैन्यासोबत पोलिसांनाही जावे लागेल. त्या वेळी आपणच आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. आपल्या शाळांमधील कवायत म्हणजे ज्येष्ठांसाठीचा व्यायाम. याबाबत शासनाला तीन वेळा कळवले आहे. शालेय मुलांना लाठीकाठी, जोर-बैठका, गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे,’ अशी अपेक्षा आफळेबुवांनी व्यक्त केली.

आफळेबुवा म्हणाले, ‘आहारातला विवेक महत्त्वाचा आहे. चमचमीत, उग्र खाणे यातून काहीही फायदा नाही. पूर्वी राजांना युद्धावर जाताना मांसाहाराची परवानगी धर्माने दिली होती; पण आवश्यकता नसताना तो करू नये. आयुष्यभर आध्यात्मिक साधना करणाऱ्या व शाकाहारी असलेल्या दधिची ऋषींच्या हाडांच्या शस्त्राने वृत्रासूर राक्षसाला मारण्यात आले. आत्मिक सुखाकडे वळण्यासाठी दररोज ध्यानसाधना हवी. त्यासाठी दृढ बुद्धी (धृती) ठेवली पाहिजे. शरीर हे भाड्याचे घर आहे आणि आतील आत्मा हे स्वतःचे घर. त्या दिशेने वाटचाल करायला हवी.’

(‘कीर्तनसंध्या’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सवाच्या अन्य बातम्या वाचण्यासाठी https://goo.gl/6HoSxk येथे क्लिक करा.)

(कीर्तन महोत्सवातील तिसऱ्या दिवशीच्या कीर्तनाच्या काही भागाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
Most Popular
Most Commented

Select Language
Share Link