Next
फुलपाखरू, छान किती दिसते!
राधानगरीचा फुलपाखरू महोत्सव येत्या रविवारपासून
BOI
Friday, November 30, 2018 | 03:18 PM
15 0 0
Share this story


कोल्हापूर : सुंदर रंग, नजर खिळवून  ठेवणारी आकर्षक नक्षी इवल्याशा पंखांवर मिरवणारे फुलपाखरू सर्वांनाच मोहवून टाकते. लहानपणापासून त्याचे आकर्षण असते, मोठेपणीदेखील इवलेसे भिरभिरणारे फुलपाखरू कुठे दिसले की मन आनंदून जाते. अशा या सुंदर फुलपाखरांच्या दुनियेत रंगून जायचे असेल तर राधानगरीला जावे लागेल. येत्या रविवारपासून तिथे सुरू होतोय फुलपाखरू महोत्सव. तिथल्या जंगलात शेकडो प्रकारची फुलपाखरे भिरभिरताना दिसणार आहेत. निसर्गप्रेमींना आकर्षित करत असलेला राधानगरीचा फुलपाखरू महोत्सव येत्या रविवारपासून (२ डिसेंबर) सुरू होत आहे. बायसन नेचर क्लबच्या वतीने यंदाही राधानगरी, दाजीपूर परिसरात दोन ते १६ डिसेंबर या कालावधीत फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  

 

‘राधानगरी परिसर हा जैवविविधतेने समृद्ध परिसर असून, फुलपाखरू पतंगाच्या वेगवेगळ्या दुर्मिळ प्रजाती येथे आढळतात. नोव्हेंबर ते डिसेंबर हा काळ फुलपाखरांसाठी अनुकूल काळ असतो. या काळामध्ये खूप प्रमाणात फुलपाखरे आढळतात. महाराष्ट्रातील पहिला फुलपाखरू महोत्सव येथे २०१५ मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून अभ्यासक, पर्यटक आले होते. या महोत्सवातून प्रेरणा घेऊन राधानगरी येथे वन्यजीव विभागाने एक आकर्षक फुलपाखरू उद्यान उभे केले आहे. राधानगरी परिसरात वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या बायसन नेचर क्लबच्या वतीने या वर्षी दोन डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये रोज अभ्यासक, विद्यार्थी, पर्यटकांच्या गटांना फुलपाखरू भ्रमंती व तज्ज्ञ अभ्यासकांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येईल. पर्यटकांना येथे राहण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून, त्याकरता तंबू उभारण्यात आले आहेत. या काळात शालेय सहली, महाविद्यालयीन सहलींना विशेष मार्गदर्शन या महोत्सवात केले जाणार आहे. फुलपाखरू उद्यान घरी कसे बनवावे, फुलपाखरू संवर्धन, त्याची दिनचर्या याबाबत या विषयातले तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत’, अशी माहिती बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी दिली.   


अधिक माहितीकरिता संपर्क : 

९६०४१ १३७४३ 
९७३०८ ८६३५४  
९५०३१ ८१८५५
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link