Next
‘माणसे हाच सकारात्मक ऊर्जेचा स्रोत’
प्राची गावस्कर
Monday, September 10, 2018 | 10:00 AM
15 0 0
Share this article:

आनंदी आणि उत्साही आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचारांची ऊर्जा खूप गरजेची असते. म्हणूनच ‘बी पॉझिटिव्ह’ हे ब्रीदवाक्य घेऊन BytesofIndia.com हे पोर्टल सुरू करण्यात आले. जी माणसे यशस्वी झालेली असतात, ज्यांनी मोठे, वेगळे आणि चांगले काम करून दाखवलेले असते, त्यांच्यामध्ये सकारात्मकता हा समान धागा असतो. या सकारात्मकतेच्या समान धाग्याने बांधल्या गेलेल्या व्यक्तींच्या सकारात्मकतेचा वेध घेणाऱ्या मुलाखतींचे ‘बी पॉझिटिव्ह’ हे नवे साप्ताहिक सदर सुरू करत आहोत. तुमच्या-आमच्या सर्वांच्याच विचारांना यातून सकारात्मक ऊर्जा मिळेल, असा विश्वास वाटतो. पहिली मुलाखत आहे ज्येष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे यांची...
..........

- सर, तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत कोणता? 
- सकारात्मक ऊर्जा माझ्या रक्तातच आहे. माझा रक्तगटच ‘ए पॉझिटिव्ह’ आहे. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे विविध प्रकार असतात. आयुष्य आ वासून उभे असते; मात्र त्या आयुष्यावर प्रेम असेल, तर आयुष्यातील सुख, दुख, यश, अपयश, विरह, व्याकुळता, आनंदाचे क्षण, असे विविध अनुभव येतात, हे लवकर लक्षात येते आणि आयुष्यातील कोणतीही घटना सकारात्मक पद्धतीने घेता येते. 

- तुम्हाला प्रेरणा कशातून मिळते? 
- मला मुख्यत्वे प्रेरणा मिळते ती माणसांमधून. आजूबाजूला विलक्षण माणसे वेगवेगळ्या पद्धतीने जगत असतात. त्यांच्याकडून मला ऊर्जा मिळते. पुस्तके, सिनेमे, नाटक, गाणी, संगीत हेदेखील महत्त्वाचे स्रोत आहेत. अर्थात, माझ्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत नाटक हा आहे. नाटक करण्यासाठी आणि नाटक करत असताना प्रचंड ऊर्जा व्यय होते; पण जी ऊर्जा गेलेली असते, ती प्रयोग झाला की भरून निघते. ही ऊर्जा पुढच्या सर्जनशीलतेसाठी उपयोगी पडते.

- तुमच्या आयुष्यातील अशी एखादी घटना सांगा, की ज्यातून सकारात्मक संदेश मिळाला?
- अशा खूप घटना आहेत. नाटकात, नाटक करताना अशा अनेक घटना घडतात, ज्यातून आयुष्याकडे कसे बघायचे याचे चांगले ट्रेनिंग मिळते. माझ्या आयुष्यातील अशी घटना, दुर्घटना म्हणू या, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या. त्या वेळी मी महाराष्ट्रभर हिंडत होतो. रिंगण नाटकाचे प्रयोग करत होतो. एक उद्वेग आला होता. त्या दरम्यान मला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे १५ दिवस घरी होतो. त्या काळात मी विचार करत होतो. हे का, कसे झाले? मी माझ्या शरीराला, मनाला कसे वापरले? ज्या दुःखाकडे मी इतक्या तीव्रतेने बघत होतो, त्याची खरेच इतकी गरज होती का? त्या वेळी, ही तीव्रता सर्जनशीलतेमध्ये रूपांतरित करता येईल, असे मला वाटले. महात्मा फुले, गाडगेबाबांसारख्या लोकांनी किती प्रचंड काम करून ठेवले आहे. त्यातून खूप प्रेरणा मिळाली. काही गोष्टींकडे आपण नव्याने पाहू शकतो, हे लक्षात आले. आणि त्या घडामोडींवर मी ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ हे पुस्तक लिहिले.

- सकारात्मक ऊर्जेसाठी पुस्तकांचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व काय?
- पुस्तकांशिवाय मी जगूच शकत नाही. पुस्तकेच नव्हे, तर संगीत, नृत्य, अशा विविध कलाप्रकारांमधून मला सकारात्मक प्रेरणा मिळते. मला प्रत्येक कलाप्रकार आवडतो. मी भारतातील, परदेशांतीलही उत्तम नृत्य बघितले आहे. यातून अफाट ज्ञान, अनुभव मिळतो. मन समृद्ध होते. आमच्याकडे पुस्तके सर्वांत महत्त्वाची आहेत. लग्न, सण समारंभ, मर्तिक यापेक्षा कलेला, पुस्तकांना अधिक महत्त्व आहे. अशा कार्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा पुस्तकांवर खर्च केले जातात. देशोदेशीची पुस्तके घेतली जातात. त्यातून देशोदेशीची संस्कृती, माणसे जणू घरी येतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. कुमार गंधर्वांचे गाणे ऐकले, अबिदा परवीन, नुसरत फतेहअली खान यांची कव्वाली ऐकली की दिवस छान जातो. या सगळ्यातून खूप ऊर्जा मिळते.

- हताशा, निराशा येते तेव्हा काय करता? 
- अशा वेळी मी उठून चालायला, पळायला जातो. टेकडीवर व्यायाम करायला जातो. निराशा येते; पण ती फार कमी काळ असते. आपण श्रद्धांजली किती काळ वाहतो? एक मिनिट! तसेच निराशेचे असावे. तिला फार थोडा वेळ स्थान द्यावे. जीवन प्रवाही आहे, ते तसेच असले पाहिजे. 

- आनंदी, सकारात्मक राहावे यासाठी काय संदेश द्याल?
- जीवनावर प्रेम केले पाहिजे. खूप प्रेम केले पाहिजे. तसेच, तुमच्यामध्ये विश्वव्यापी करुणा असली पाहिजे. ‘हे विश्वचि माझे घर’ ही ज्ञानेश्वरांची उक्ती समजून घेतली पाहिजे. आपला अहंकार आपल्या जिवंतपणी विरला पाहिजे, अशी आपली इच्छा असली पाहिजे. सगळी मानवजात समान पातळीवर आहे. इथे कोणी उच्च-नीच नाही, असेच वर्तन असले पाहिजे. आपल्या कलेतून आपल्या स्वतः विषयीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या पाहिजेत.

- कला आणि आयुष्य यातील नाते कसे आहे?
- माझे आयुष्य आणि कला यातील अंतर मी हळूहळू कमी करत आलो आहे. प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात वेगळे घडते आहे आणि कलेत तुम्ही वेगळे मांडता आहात, असे असू नये. विरोधाभास असणार; पण आपले जगणे पारदर्शक, साधे, सर्वसाधारण माणसांसारखे असावे, अशी माझी धारणा आहे. कलेच्या बाबतीत चांगले करावे, घडावे असे वाटते. ज्यामुळे लोकांचे आयुष्य समृद्ध व्हावे अशी इच्छा असते. त्यामुळे माझी नाटकांची निवडही तशीच असते. आयुष्यातील मूल्येच नाटकात असावीत, असे माझे मत आहे.

- अन्य कोणत्या गोष्टी आवडतात?
- मला खूप गोष्टी करायला आवडतात. ज्यामध्ये कोणावर अन्याय, अत्याचार, शोषण होत नाही, अशा सगळ्या गोष्टी करायला आवडतात. मला खाण्याची, हिंडण्याची आवड आहे. घर स्वच्छ ठेवायला, साफसफाई करायला आवडते, भाज्या करायला आवडतात. माझी मुलगी लहान होती, तेव्हा नोकरी सोडून मी तिचे संगोपन केले आहे. येणारा क्षण आनंदाने जगायला मला आवडते. महाराष्ट्रातील अनेक डोंगर मी पालथे घातले आहेत. अनेक ठिकाणी स्वतः गाडी चालवत मी प्रवास केला आहे. परदेशात हिंडतो तेव्हा लाखो चित्रे मी पाहिली आहेत. कधीतरी वाइन प्यायला आवडते. इटलीत असताना पिझ्झा खाऊन पहायला आवडले. अशा सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला मला आवडतो.

- आवडलेली स्वतःची कलाकृती?
- स्वतःच्या कलाकृतीकडे इतके तटस्थपणे बघता येत नाही. अगदी अपयशी कलाकृती असल्या, तरी सगळ्यात जीव ओतलेला आहे. मी पस्तीस नाटके केली, ती सगळीच चांगली आहेत असेही माझे मत नाही. त्यात काही गोष्टी राहून गेल्या याची खंत वाटते. अजून माझे चांगले नाटक यायचे आहे, असेच मला वाटते. तरीही त्यातल्या त्यात ‘सत्यशोधक’मधील जोतिबांची भूमिका आणि  ‘समाजस्वास्थ’मधील रघुनाथ कर्वे यांची मी करत असलेली भूमिका महत्त्वाची वाटते. 

- तुमचे प्रेरणास्थान, आदर्श कोण आहेत?
- माझे गुरू कोणी नाहीत; पण आदर्श अनेक आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी हे लोक आवडतात. भीमसेन जोशी त्यांच्या साधेपणामुळे आवडतात. कुमार गंधर्व प्रयोगशीलतेमुळे, किशोरीताई त्यांच्या तीव्रतेमुळे, विजय तेंडुलकर बहुआयामीपणामुळे, संत तुकाराम सामाजिक जाणिवेमुळे, महात्मा फुले त्यांच्या राजकीय प्रेरणेने आवडतात. डॉ. आंबेडकर त्यांच्या संपूर्ण विद्रोहामुळे आवडतात. याच कारणाने नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे आवडतात. दुर्गा भागवत, दि. बा. मोकाशी त्यांच्या भाषेमुळे आवडतात. गो. नी. दांडेकरांची भाषा अत्यंत आवडायची. गाडगेबाबा, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मला आवडतो. ‘शिवाजी कोण होता?’ हे पानसरे यांचे पुस्तक वाचले, की आपला दृष्टिकोन बदलतो. संत चोखामेळा यांच्यावरचे एक उत्तम पुस्तक वाचनात आले. ही माणसे काय जगलीयत, हे त्यावरून लक्षात येते. र. धों. कर्वे यांचे साहित्य वाचले, जगणे बघितले, की आपण त्यांची परंपरा टिकवण्यासाठी काम केले पाहिजे, असे वाटते.

- तुमचे आवडते लेखक कोण आहेत?
- खूप आहेत. समकालीन लेखक मला महत्त्वाचे वाटतात. मकरंद साठे, जयंत पवार, राजू नाईक, संजय पवार, प्रेमानंद गज्वी, श्याम मनोहर या सगळ्यांचे लेखन मला वेगवेगळ्या कारणांनी आवडते. परदेशी लेखकसुद्धा मला आवडतात. हाराकी मोराका यांची कादंबरी मला खूप आवडली. पामुक, दस्तोव्हस्की, काफ्का हे सगळे लेखक मला आवडतात. विजयकांत देथा हा राजस्थानी लेखक महत्त्वाचा वाटतो. सफदर हश्मी, बादल सरकार, हबीब तन्वीर हेही खूप आवडतात. 

- आवडता सिनेमा?
- खूप आहेत. ‘पाथेर पांचाली’पासून नावीन्यपूर्ण प्रयोग झालेले अनेक भारतीय चित्रपट आहेत. श्याम बेनेगल, गुरुदत्त, मृणाल सेन यांचे चित्रपट आवडतात. कुरोसावा, फेलिनी, चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटांनी आपले विश्वच बदलले आहे. इराणच्या माझिदीच्या फिल्म्स खूप आवडतात. अशा फिल्म्स नसत्या, तर आपले आयुष्य इतके सुखकर झाले नसते. 

- आगामी नियोजन? 
- काही नाटके, मोनोलोग्ज करून बघायचे आहेत. दोन नाटकांच्या संहिता आवडल्या आहेत. त्यावर काम करायचे नियोजन आहे. 

(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर दर सोमवारी प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध असतील. अतुल पेठे यांच्या मुलाखतीचा व्हिडिओही सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
nikhil About 214 Days ago
mala ghar ka avadato
0
0

Select Language
Share Link
 
Search