पुणे : काही वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या ‘निर्भया’च्या घटनेनंतर आता उत्तर प्रदेशमधील उन्नाव आणि काश्मीरमधील कथुआ येथील अल्पवयीन मुलींवरील झालेल्या बलात्काराच्या प्रकारांनी संपूर्ण देश पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही कलाकारांनी याचा केवळ निषेध न करता त्यावर साहित्यनिर्मिती करून त्यामार्फत जनजागृती करण्याचा पर्याय अवलंबला आहे. त्यांनी एक कविता लिहून व्हिडिओद्वारे ती प्रसारित करायला सुरुवात केली आहे.
संपूर्ण माणूस जातीला कलंक ठराव्यात अशा या दोन घटना आहेत. उन्नाव आणि कथुआ येथील दोन्ही प्रकारांबाबत आपण गेले दोन दिवस विविध प्रकारच्या गोष्टी ऐकत आहोत. देशाच्या बहुतांश भागात जनतेमार्फत आणि विविध सामाजिक संस्थांमार्फत आंदोलन, मोर्चे, बंद आदींद्वारे या घटनांचा निषेध नोंदवला जात असताना, पुण्यातील ‘झिवा स्टुडिओ स्पेस’चे दिग्दर्शक प्रज्ञेश मोळक, अभियंता, कवी पूर्वल खरात आणि सुमित देशमुख या तीन तरुण कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून याला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यांनी एक कविता लिहून व्हिडिओद्वारे त्यातील संदेश प्रसारित केला आहे.
यावर बोलताना प्रज्ञेश मोळक म्हणाले, ‘असिफासारख्या मुलींच्या बाबतीत घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनांबद्दल आपण सर्वांनीच ऐकले किंवा वाचले. संवेदनाच बोथट झाल्या आहेत की काय, असा प्रश्न पडू लागला आहे. मेंदूला झिणझिण्या याव्यात, असा हा प्रकार आहे आणि यावर आज आम्ही व्यक्त झालो नाही, याला विरोध केला नाही, या गोष्टी अशाच मुक्याने सहन करत राहिलो, तर मुंबईत व दिल्लीत घडणाऱ्या घटना गल्लीगल्लीत घडायला वेळ लागणार नाही. स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे. ही विकृत मानसिकता बदलण्याची जबाबदारी आता आम्हा युवकांवर आहे. आम्ही त्यावर बोललो पाहिजे आणि जर बोलू शकत नसू, तर कमीत कमी जे तरुण यावर आवाज उठवत आहेत, त्यांच्या विचारांना आवाजाला साथ द्यायला हवी. एवढीच माफक अपेक्षा आहे.’
(या तरुणांनी केलेल्या कवितेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)