Next
खरा तो प्रेमा...
BOI
Tuesday, June 27, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्वांची जयंती २६ जूनला झाली. त्या निमित्तानं ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘खरा तो प्रेमा...’ या गीताविषयी... 
.................
गडकिल्ले, मराठी साहित्य आणि संगीत रंगभूमी हे महाराष्ट्राचं लखलखतं वैभव! या महाराष्ट्रानं एकाच वेळी दोन युगं अनुभवली. ती म्हणजे टिळकयुग आणि गंधर्वयुग!! या कालखंडात महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव अधिक तेजानं झळकू लागलं होतं. २६ जून ही बालगंधर्वांची जयंती साजरी करताना मानापमान नाटकातलं एक पद दिवसभर कानामनात रुंजी घालत होतं...

नभी जनहितरत भास्कर तापत
विकसत पहा नलिनी।।

संगीत मानापमान नाटकातलं हेच पद का? बालगंधर्वांच्या सुस्वर गळ्यातून अवतरलेली कितीतरी नाट्यपदं आहेत, ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं; पण ‘मानापमान’मधल्या या पदाची आठवण विशेषकरून होणं, याला कारण बालगंधर्वांच्या आयुष्यातली हृदयद्रावक घटना. 

१२ मार्च १९११. ‘मानापमान’चा पहिला प्रयोग जाहीर झाला आणि दुसऱ्याच दिवशी सर्व तिकिटं संपली. काकासाहेब अर्थात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचं पहिलं संगीत नाटक आणि बालगंधर्वांची भूमिका हा ‘किर्लोस्कर मंडळी’नं साधलेला अपूर्व संयोग होता. नाटकाची जय्यत तयारी झाली होती. काकासाहेबांच्या कडक शिस्तीत अभिनय आणि गाण्याच्या तालमी उत्तम झाल्या होत्या. नाटक सादर होणार होतं मुंबईत. कंपनीच्या बिऱ्हाडी पाहुण्यांची गर्दी झाली होती. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उत्साहाला उधाण आलं होतं. १२ तारीख उजाडण्याची प्रत्येक जण वाट पहात होता; पण अकरा तारखेच्या रात्री बालगंधर्वांची एकुलती एक चिमुकली मुलगी आजारी पडली. इतकी आजारी, की त्या आजारपणातच तिचा मृत्यू झाला. दु:खद निधनवार्ता ऐकून सर्वत्र शोककळा पसरली. बारा तारखेला नाटकाचा प्रयोग करण्याऐवजी पुढचा दिवस ठरवावा असा विचार कंपनीनं केला. कंपनीच्या नटांची आणि पाहुण्यांची घोर निराशा झाली. प्रेक्षकांचीही घोर निराशा होणार; पण इलाज नव्हता. नारायणरावांना अर्थात बालगंधर्वांना हे सागितलं, की नाटक पुढं ढकलायचं. त्या वेळी त्यांनी निक्षून सांगितलं, की ‘झालं ते झालं, नाटक रद्द करू नका.’ आपलं दु:ख काळजाच्या कुपीत बंद करून रसिकांसाठी आनंदाची कुपी उघडी करायची असं बालगंधर्वांनी ठरवलं. काळजातलं दु:ख काळजातच लपवलं आणि नाटकाचा प्रयोग सादर झाला. ते रसिकांवरचं खरं प्रेम! ते रंगभूमीवरचं खरं प्रेम.

दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी
गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाव जनी।

काकासाहेब खाडिलकरांची ही रचना, गोविंदराव टेंबे यांच्या संगीतानं आणि बालगंधर्वांच्या स्वरांनी मोहरली...कन्यावियोगाची वेदना विसरली...टाळ्यांच्या कडकडाटात बालगंधर्वांच्या अंतर्मनातले हुंदके विरून गेले. दु:खाचे कढ दाबून हास्यवदनानं बालगंधर्वांनी सादर केलेलं गाणं रसिकांना आनंदाचे झरे देऊन गेलं. मानापमान नाटक इतकं गाजलं, की किर्लोस्कर मंडळी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. बालगंधर्वांनी साकारलेली भामिनी रसिकांच्या हृदयी विराजमान झाली.

कृ. प्र. खाडिलकर अर्थात काकासाहेब अतिशय कडक शिस्तीत नाटकाची तालीम घेत. सकाळच्या तालमीला बालगंधर्व उशिरा येत. सुरुवातीला काकासाहेब नाराज होत; पण बालगंधर्वांची गाणी ऐकली, की त्यांचा राग कुठल्याकुठे पळून जाई. ‘मानापमान’ची पदं काकासाहेबांनी लिहिली होती. नाटकातले प्रसंग, त्यानुसार चाली आणि मग चालीनुसार पदरचना असं संगीत नाटकातल्या गीतांचं स्वरूप असे. स्वर शब्दांना साद घालत आणि मग काव्यप्रतिभेचं बोट धरून हळुवार पदन्यास करत कविता अवतरत असे. अशीच स्वरांनी मोहरलेली काकासाहेब खाडिलकरांची ही कविता....

पीडित जन देखता स्वसुखा त्यागी दया।
जनभयहरण हेचि सुख, सदया।।

स्वसुखाची पर्वा न करता पीडित जनांना आनंद देणं हाच खरा प्रेमाचा मार्ग चोखाळणारे काकासाहेब खाडिलकर लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य होते. केसरी वर्तमानपत्राचे उपसंपादक आणि उत्कृष्ट नाट्यलेखक, पदरचनाकार आणि नाट्यशिक्षकही होते. ‘किर्लोस्कर मंडळी’ला यशाच्या शिखरावर पोहोचवलं ते खाडिलकरांच्या लेखणीनं, बालगंधर्वांच्या गोड गळ्यानं, कलाकारांच्या अभिनयानं आणि गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारानं!

‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी’ या नाट्यपदाचे संगीतकार गोविंदराव टेंबे. संगीतकलेवर त्यांचं नितांत प्रेम होतं. प्रसिद्धीचा, संपत्तीचा आणि इतर कसलाही लोभ मनी न धरता संगीतकलेवर खरंखुरं प्रेम करणारे संगीताचे उपासक गोविंदराव टेंबे उत्कृष्ट हार्मोनियमवादक म्हणून प्रसिद्ध होते. मानापमान नाटकाच्या वेळी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी काकासाहेब खाडिलकरांनी गोविंदराव टेंबे यांच्यावर टाकली आणि गोविंदरावांनी ती यशस्वीरीत्या पार पाडली. गोविंदरावांनी एखाद्या गुरूकडे जाऊन संगीत शिक्षण घेतलं नव्हतं, तर गायकांच्या आणि वादकांच्या श्रवणभक्तीतून ते साध्य केलं. अल्लादियाँ खाँसाहेब आणि भास्करबुवांसारखे गायक, गोहरजानसारखी गायिका आणि बरकतउल्ला खाँसारखे तंतकार अशा अनेकांचे कार्यक्रम ऐकून त्यांच्या कलेचं गमक समजून घेतलं. त्यासाठी अपार कष्ट घेतले, मेहनत केली. मानापमान नाटकाचं संगीत दिग्दर्शन करायचं ठरल्यावर मौजुद्दीन खाँसाहेबांचं श्रवणमधुर गाणं भरपूर ऐकलं. आणि त्यामुळेच अत्यंत सुमधुर असं ‘खरा तो प्रेमा..’ हे गीत बालगंधर्वांच्या सुरेल गळ्यातून त्यांनी गाऊन घेतलं. हार्मोनियमच्या साथीला राजारामबापू पुरोहित आणि तबल्याच्या साथीला दादा लाडू असे उत्तम वादक गोविंदराव टेंबे यांच्याबरोबर होते. ‘मानापमान’ची कीर्ती सर्वदूर पसरली. धैर्यधर आणि भामिनीची कथा रसिकांना खूप भावली. खाडिलकरांनी लिहिलेलं पहिलं संगीत नाटक, गोविंदराव टेंबे यांचं पहिलं संगीत दिग्दर्शन आणि बालगंधर्वांची भामिनी रसिकांसाठी आनंदाचं निधान ठरली.

मानापमान या नाटकाची लोकप्रियता लक्षात घेऊन टिळक स्वराज्य फंडासाठी या नाटकाचा संयुक्त प्रयोग करण्याच्या केशवराव भोसले यांच्या कल्पनेला बालगंधर्वांनी तात्काळ अनुमती दिली. ‘बालगंधर्व’ या नावानं अवघ्या महाराष्ट्राला परिचित होण्याचं भाग्य लोकमान्य टिळकांमुळेच बालगंधर्वांना मिळालं होतं. याची कृतज्ञ जाणीवही बालगंधर्वांना होती. ‘संयुक्त मानापमाना’चा प्रयोग ही तत्कालीन महाराष्ट्रातली अभूतपूर्व घटना होती. 

बालगंधर्व संगीत रंगभूमीचे कलासक्त भक्त तर होतेच, पण देशभक्तीचीही भावना त्यांच्या मनात जागृत होती. स्वराज्य फंड उभारणीसाठी आपल्या अभिनय आणि गायनकलेचं योगदान देणारे बालगंधर्व महाराष्ट्राचं लाडकं दैवत बनले. त्यांच्या रूपानं शालीनता आणि घरंदाजपणा घरोघरी दिसू लागला. ‘बालगंधर्व कितीही नटले, तरी छचोर कधीच दिसत नसत,’ अशी आठवण सांगणारे ज्येष्ठ रसिक आजही भेटतात. 

‘आपल्या सखीजवळ कथन करणारी, परावलंबी आणि दु:खी सुभद्रा असो किंवा सम्राज्ञीच्या वैभवात दुर्योधनाचा धिक्कार करणारी द्रौपदी असो, ‘दादा ते आले ना’ म्हणत रंगभूमीवर प्रवेश करणारी रुक्मिणी असो किंवा प्रियकराविषयीच्या स्वप्नरंजनात गर्क असणारी भामिनी असो, मधुबनात केस मोकळे सोडलेली देवयानी असो किंवा पावसात भिजणारी वसंतसेना असो, गोवेकरणीचा पेहेराव परिधान केलेली रेवती असो किंवा महेश्वरी लुगडे नेसलेली सिंधू असो, स्वत:चे अंगभूत गुण, त्या गुणांचा शिस्तबद्ध आविष्कार, या सर्व भूमिकांमध्ये सतत केलेला संचार आणि देवल-खाडिलकर आणि भास्करबुवांचं मार्गदर्शन यामुळंच बालगंधर्व हा कलाकार घडला,’ असं वसंत शांताराम देसाई यांनी म्हटलंय.  

कलावंत हा आपल्या कलेद्वारे आत्मोन्नतीकडे जातोच; पण रसिकांना आनंद देणं ही बांधिलकी मानून कला प्रदर्शित करणारा कलावंत समाजप्रिय होतो. बालगंधर्वांनी अवघ्या महाराष्ट्राला आपल्या गायन आणि अभिनयकलेनं भरभरून आनंद दिला. कसलाही लोभ मनी न धरता मराठी रसिकांवर खऱ्या प्रेमाचा वर्षाव त्यांनी केला. त्या प्रेमापोटीच रसिक प्रेक्षकांना ते ‘मायबाप’ म्हणून संबोधत.

बालगंधर्वांची जयंती साजरी करताना ‘खरा तो प्रेमा...’ या पदाचं स्मरण वारंवार होतं. ग. दि. माडगूळकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘असा बालगंधर्व आता न होणे’ याचीही प्रचिती येते आणि डोळ्यासमोर तरळते घरंदाज आणि शालीन अशी बालगंधर्वांची प्रतिमा! 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search