Next
लेणं मेळघाटाचं...
मानसी मगरे
Friday, November 10, 2017 | 07:17 PM
15 0 0
Share this story

डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे

दारिद्र्याने, अज्ञानाने आणि आजाराने ग्रासलेल्या सातपुडा पर्वतरांगांतील घनदाट अरण्याने व्यापलेला मेळघाट प्रदेश आणि तेथील तीन नद्यांच्या त्रिकोणात बेटासारखं वसलेलं गाव बैरागड. या गावाच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या आणि मेळघाटातील कुपोषणाशी दोन हात करणाऱ्या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे या समाजसेवी दाम्पत्याला १० नोव्हेंबर रोजी यंदाचा ‘पुलोत्सव कृतज्ञता सन्मान’ पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने डॉ. स्मिता कोल्हे यांच्याशी साधलेला हा संवाद...
..........................................  
डॉ. स्मिता कोल्हे
कायद्याची पदवी आणि वैद्यकीय क्षेत्र अशा दोन्ही वेगळ्या वाटांवर एकाच वेळी पाऊल ठेवताना नेमकी काय परिस्थिती होती..?
- मुलींच्या दृष्टीने तेव्हाची परिस्थिती फारच वाईट होती. मुलगी शिकली, तर तिला पुढे तेवढा शिकलेला नवरा मिळणार नाही, या विचाराने मुलीला शिकू दिले जायचे नाही. मी मूळची नागपूरची. आम्ही सगळी मिळून दहा भावंडं आणि त्यातली मी सर्वांत शेवटची म्हणजे दहावी मुलगी. वडील रेल्वेत नोकरी करणारे. परिस्थिती तशी सामान्य होती. माझ्याहून मोठी भावंडं असल्याने शाळेत जायच्या आधीच मला बहिणींकडून शिकायला मिळालं. त्यामुळे मग पहिलीत जायच्या ऐवजी मी थेट तिसरीच्या वर्गात दाखल झाले. 

त्या काळात लग्नं लवकर व्हायची. त्यामुळे इतर मोठ्या भावंडांची लग्नं लवकर झाली. माझ्या वेळी मात्र आता ही शेवटची, हिच्यानंतर कोणी नाही म्हणून मला शिकू दिले गेले. चित्रकला, पेंटिंग हे आवडते विषय असल्याने मी फाइन आर्ट्सला प्रवेश घेतला. खरं तर सायन्सकडे माझा कल होता. परंतु कॉलेज जवळ नसल्यामुळे कला शाखेला प्रवेश घ्यावा लागला. पुढे मैत्रिणीचं पाहून एलएलबीला प्रवेश घेतला. ती पदवी पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु तेवढ्यावर नोकरी मिळेना. आधीपासूनच विद्यार्थी परिषदेच्या कामात असल्याने त्यातील काही मार्गदर्शकांनी दहावीच्या पायावर तू होमिओपॅथी करू शकतेस, असं सुचवलं आणि मग तो विचार प्रत्यक्षात आला. 

स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा विचार ठाम झाला.. तो नेमका कशामुळे ?
- मला लहानपणापासूनच त्वचेची अॅलर्जी होती. एलएलबी करत असताना दरम्यानच्या काळात ती वाढून संपूर्ण शरीरावर पांढरे चट्टे आले. लग्न व्हायच्या वयात हे सगळं झाल्यामुळे लग्न करण्याचा विचार बाजूला पडला. दरम्यान तिन्ही भावांची लग्नं झाली. एलएलबी आणि होमिओपॅथी अशा दोन्ही पदव्या घेतल्या आणि शिवाय तेव्हा मी सतार शिकत होते. हे म्हणजे, ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असा प्रकार असल्याचं सगळ्यांचं मत बनलं. या सगळ्या प्रकारामुळे एक प्रकारची निराशा आली. त्यातून मग स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे असं वाटू लागलं. त्यात विद्यार्थी परिषदेच्या कामामुळे एक वेगळं विश्व तयार झालं. तेव्हा नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे त्या कामात तिथे होते. जिद्दीने दोन्ही पदव्या मिळवल्या. संगीतातही चांगल्या गुणांनी पास झाले. होमिओपॅथीमध्ये काम सुरू केलं. स्वतःला सिद्ध करून दाखवल्याचं समाधान मिळालं.     

डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे
रवींद्र कोल्हे सरांशी संपर्क आणि मग लग्न, या गोष्टी कशा घडल्या..?
- होमिओपॅथीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर माझे वैद्यकीय क्षेत्रातले गुरू डॉ. डांगरे यांनी मला काम सुरू करण्यास मदत केली. ओळखीने दवाखाना सुरू करण्यासाठी एक खोली मिळाली. गडकरींचं तेव्हा फर्निचरचं दुकान होतं. त्यांनीही  मदत केली. आता माझी मी पूर्णपणे स्थिरस्थावर झाले होते. त्यामुळे मग लग्नाचा विचार करू लागले. मीच मुलं पाहणार असंही ठरवलं होतं. 

दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी एमबीबीएसची पदवी पूर्ण केली होती. डेविड व्हर्नरच्या ‘देअर व्हेअर इज नो डॉक्टर’ या पुस्तकाचा आणि गांधीजी, विनोबा भावे, गाडगेबाबा यांच्या विचारांचा त्यांच्या आयुष्यावर प्रभाव होता. यावरून त्यांनी जिथे डॉक्टर नाही, अशा ठिकाणी जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी बैरागडची निवड केली. चार मित्र मिळून तिथे काम सुरू केलं. ५० पैशाचे न्यूमोनियाचे औषध नसल्याने मरणारी लहान मुले आणि पावसाळ्यात तापाच्या आणि इतर आजाराच्या साथीने मरणारी माणसं पाहून त्यांचं मन हेलावून गेलं. मेळघाटात कुपोषण हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. यासाठी त्यांनी परत नागपूर विद्यापीठातून पुन्हा त्यावर अभ्यास केला. यातून कुपोषण या शब्दाचा जन्म झाला. ते प्रत्येक रुग्णाकडून एक रुपया शुल्क घेत असलेला दवाखाना आजही सुरू आहे. तेव्हा डांगरे सरांनी रवी कोल्हे हा मुलगा मला सुचवला. 

मला मिळणाऱ्या ४०० रुपयांत संसार करणारी, लग्नाच्या रजिस्ट्रेशनला येणाऱ्या पाच रुपयांतच लग्न करेली अशी, धारणी ते बैरागड असा चाळीस किलोमीटरचा प्रवास पायी करू शकेल अशी आणि इतरांसाठी भीक मागण्याची तयारी असणारी अशी मुलगी पत्नी म्हणून डॉ. कोल्हेंना हवी होती. या चार अटी त्यांनी सांगितल्या होत्या. महिनाभर यावर विचार केला आणि मग थोडं जुळतंय असं वाटलं. तयार झाले आणि दोन डिसेंबर १९८८ रोजी आम्ही लग्न केलं. 

सुखवस्तू घरातून एकदम 'बैरागड'सारख्या ठिकाणी गेल्यानंतर कोणकोणत्या 
गोष्टींना सामोरं जावं लागलं..? 
- बैरागडला आल्यानंतर तिथल्या लोकांप्रति फक्त सहानुभूती न दाखवता त्यांचं आयुष्य बदलवण्यासाठी काम करायचं, असा दोघांनी निर्धार केला. लोकांनी आम्हाला एक एक लाकूड जमवून घर बांधून दिलं. चुलीवर स्वयंपाक करणं, विहिरीचं पाणी काढणं, घर सारवणं हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. घरात वीज नाही, जात्यावर दळणं हे सगळं कधी न पाहिलेलं असं होतं. चुलीवर पाऊस पडायला लागला, की छत्री घेऊन स्वयंपाक करायचा. दिवेलागणीची वेळ झाली, की घरात किडे-कीटक, पाली, बेडूक, साप आणि विंचूही फिरायचे! हे घर आहे की प्राणिसंग्रहालय असं वाटायचं; पण हे सगळं आवडायला लागलं होतं. 

घरी येणारे पेशंट सुरुवातीला मला डॉक्टर मानायला तयार नव्हते. मग पुढे काही असे प्रसंग घडले आणि त्यांनी मला डॉक्टर म्हणून स्वीकारलं. बैरागड भागात तेव्हा धर्मांतराचं वारं होतं. हे म्हणत असताना मी मात्र त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध दर्शवला. त्यामुळे आमच्यात बरेच वादही झाले. मग मी स्त्रियांसाठी काम सुरू केलं. स्त्रियांवरील अन्याय ही तेव्हा तिथे असलेली एक खूप मोठी समस्या होती. अजूनही त्यात फार फरक झाला नाही. 

'तरुणाई' शिबिरादरम्यान प्रबोधन करणारे कार्यकर्ते
वैद्यकीय सेवेबरोबरच इतर अनेक क्षेत्रांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली.. ती काय होती ? 
- सर्वप्रथम कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुधारित शेतीची माहिती दिली. शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. तिथल्या सामान्य आदिवासींची फसवणूक थांबविण्यासाठी त्यांना कायद्याबद्दल जागरूक केले. आदिवासींसाठी अनेक योजना स्वातंत्र्यापासून होत्या; पण मेळघटात त्याची सुरुवात मात्र १९९७पासून झाली. मी सरपंच झाल्यानंतर गावात रस्ता, वीज, पाणी या मूलभुत सोयीसुविधा आणल्या. हे करत असताना स्वत:च्या दोन्ही मुलांचं शिक्षण आदिवासी मुलांबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेतच केलं. आदिवासींकडून श्रद्धेच्या नावाखाली होणारी पशुहत्या थांबवण्यासाठी ‘आमची मान कापा, पण मुक्या प्राण्यांना मारू नका,’ असं त्यांना सांगितलं. याचा परिणाम म्हणून मागील २४ वर्षांपासून गावच्या यात्रेत रक्ताचा एक थेंबही सांडला नाही. आदिवासींना त्यांच्या हक्कासाठी लढण्यास प्रवृत्त केले. सामजिकतेची जाणीव तरुणांमध्ये व्हावी, म्हणून १९९७पासून ‘तरुणाई’ शिबिराची सुरवात केली. याअंतर्गत तरुणांना श्रमप्रतिष्ठा, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची, साहसीपणाची आणि ‘स्वत्वा’ची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. मेळघाट, इथली जैवविविधता, संस्कृती, माती आणि माणुसकीचं माणूसपण जपणारी माणसं यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न इथे केला जातो. 

मोठा मुलगा रोहित पूर्णवेळ शेती करतो आणि नवनवीन प्रयोग करून त्यांचा फायदा इतर बांधवांना कसा होईल यासाठी प्रयत्न करतो. याचाच परिणाम म्हणून मेळघाटात शेतकरी आत्महत्येची एकही घटना घडलेली नाही. लहान मुलगा राम सध्या अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करत आहे. 

(डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. )


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link