Next
अभिनय कला केंद्राचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात
BOI
Thursday, June 13, 2019 | 04:34 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : येथील अभिनय कला केंद्राचा वर्षपूर्ती सन्मान सोहळा नुकताच कचराळी तलाव कट्टा येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या वेळी सिने-मालिका दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि ठाणे महापालिकेचे सभागृह नेते शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले. 

ठाण्यातील अभिनय कला केंद्राचे कलाकार नेहमीच काहीतरी नवीन कलाकृती सादर करण्याच्या प्रयत्नात असतात. हे करत असतानाच या वेळी केंद्राच्या कलाकारांनी वर्षपूर्ती सोहळ्याचे एक वेगळेच वातावरण निर्माण केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने-मालिका दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख तथा ठाणे महापालिकेचे सभागृहनेते नरेश म्हस्के उपस्थित होते. या दोघांनीही नवीन कलाकारांना मार्गदशन करत अभिनय कला केंद्राच्या कार्याचे विशेष कौतूक केले.

केंद्राचे अध्यक्ष रोहित चंद्रकांत गायकवाड आणि संस्थापक करण पेणकर यांनी मागच्या वर्षी २२ एप्रिल २०१८ला अभिनय कला केंद्राची सुरुवात केली होती. या अभिनय कला केंद्रासाठी ठाणे महापालिका परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. याच अभिनव कला केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त रोहित चंद्रकांत गायकवाड यांच्यामार्फत हा सन्मान सोहळा घेण्याचे योजिले होते. 

कार्यक्रमासाठी पाचपाखाडी विभाग नगरसेविका रुचिताताई मोरे आणि वेब सिरिज मास्टर हर्षद समर्थ हेदेखील उपस्थित होते. या वेळी केंद्राच्या कलाकारांनी ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील ‘तुझे माझे एक नाव..’ या गाण्यावर खूप छान सादरीकरण केले. ऐश्वर्या देवकर हिने ‘वाजले की बारा’, या गाण्यावर सादरीकरण केले. जगन्नाथने ‘लाज वाटते मी मराठी असल्याची’, या विषयावर एकपात्री प्रयोग सादर केला. ज्योती काशीकेदार हिने ‘ती फुलराणी’वर सादरीकरण केले. याशिवाय अभिनय कलाकेंद्राच्या टीमने एक पथनाट्य सादर केले. त्यातून एक चांगला विषय लोकांपर्यंत पोहचवून त्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 

प्रतीक्षा आणि जितेश बागवे यांनी ‘गोरी नवरी मांडवाखाली’, या गाण्यावर सादरीकरण केले. त्यानंतर केंद्राच्या रोहित गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेल्या, केंद्राचे कार्य सांगणाऱ्या एका गीताचे सर्व कलाकारांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाची सांगता ‘मराठी पाऊल पडते पुढे’, या गीताने झाली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search