मुंबई : राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला कौल दिल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले व कार्यकर्त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, ‘राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही भाजपच नंबर वन ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कामगिरीवर राज्यातील ग्रामीण जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. सरपंचांची थेट निवड पहिल्यांदाच होत असून या बदलाला ग्रामीण जनतेने उत्साही प्रतिसाद दिला आहे’.
ते पुढे म्हणाले, ‘ जालना जिल्ह्यात २७२ ग्रामपंचायतींपैकी १६३ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आले. विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी दुपारपर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. हाती आलेल्या निकालांनुसार बीड जिल्ह्यात ३५६ पैकी २०३, औरंगाबाद ९० पैकी ७२, अहमदनगर ११६ पैकी ७९, नंदूरबार २८ पैकी १७, जळगाव १०३ पैकी ७८, वाशीम १२७ पैकी ८६, यवतमाळ ९३ पैकी ४४ आणि लातूर जिल्ह्यात २५० पैकी १५१ ग्रामपंचायतींमध्ये भाजप विजयी ठरली आहे’.
सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण होईल त्यावेळी भाजपने इतर पक्षांपेक्षा आणखी आघाडी घेतल्याचे दिसेल,असा विश्वास व्यक्त करत मतदारांचा आदेश भाजप नम्रपणे स्वीकारत असून गावांचा विकास करण्यास वचनबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.