Next
‘त्यांनी’ प्रथमच हाताळला संगणक
प्रेस रिलीज
Monday, March 05 | 04:29 PM
15 0 0
Share this story

पुणे : घरची हलाखीची परिस्थिती इतकेच काय राहावयासही घर नाही, पदपथावर आडोसा करून, ज्या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत अशा ठिकाणी वास्तव्य करून पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांना मदत व्हावी यासाठी सिग्नलवर फुले, चिक्की विक्री करणाऱ्या मुलांनी वाय-फाय, फोर-जीच्या युगात प्रथमच संगणक हाताळला.

निमित्त होते, पदपथावरील मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवाराने सुरू केलेल्या ‘संगणक आपल्या दारी’ या उपक्रमाचे. आयुष्यात प्रथमच संगणक पाहणाऱ्या या मुला-मुलींच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे आणि मला जमेल की नाही असे संमिश्र भाव होते; मात्र शिक्षक जशी माहिती देत होते, तसे या मुलांचे चेहरे खुलत होते. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या उपस्थितीत आणि मुलांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत आठवड्यातून दोन दिवस शहरातील विविध पदपथांवर राहणाऱ्या मुला-मुलींना संगणकाची माहिती व्हावी, आर्थिक दुर्बल घटकांतील शिक्षण घेणाऱ्या मुलानांही  संगणक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे.

याबाबत या उपक्रमाचे संयोजक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल म्हणाले, ‘आज वाय-फाय, फोर-जीच्या युगात समाजातील कित्येक घटक असे आहेत की ज्यांना परिस्थितीमुळे संगणक काय असतो याची माहितीही नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांना हातभार लावताना ते त्यांच्या बालपणालाही मुकले आहेत. मोबाइल काय असतो हे त्यांना फक्त माहिती आहे तो ही लोकांच्या हातात दिसतो म्हणून; पण इंटरनेट काय असते, संगणक कसा असतो याची माहिती, तर त्यांना अजिबात नाही. जे शिकत आहेत त्यांना थोडीफार माहिती आहे; मात्र त्यांना संगणक कधी हाताळायला मिळालेलाच नाही. एकदिवस या मुलांसमवेत चर्चा केली, त्यांनी आम्हाला संगणक कसा असतो, दाखवाल का, हे प्रश्न विचारून आम्हालाही शिकायचे आहे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आणि त्यातूनच ‘संगणक आपल्या दारी’ या उपक्रमाचे नियोजन आम्ही केले. आठवड्यातून दोन दिवस हा उपक्रम पदपथावरील गरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी राबविला जाणार आहे.’

या वेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी,  राजू पोळ, समीर शिंदे, नारायण टेकाडे, अरूण कामठे, स्वप्नील नाईक, धनंजय कांबळे, विक्रम खन्ना, सुरेश कांबळे, हेरॉल मसी, सागर आटोळे, भरत तेलंग, महेश ढवळे, राजू ससाणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link