Next
टेबल टेनिसमध्ये पूजाचे वर्चस्व
BOI
Friday, August 17, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर

काही खेळाडू असे असतात, की ज्यांच्या कारकिर्दीत कितीही चढ-उतार आले, तरी ते डगमगत नाहीत. उलट फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेतात. पुण्याची पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर ही अशीच एक गुणवान टेबल टेनिसपटू.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या टेबल टेनिसपटू पूजा सहस्रबुद्धेबद्दल...
.....................
पूजा सहस्रबुद्धेने इंदूर येथे नुकत्याच झालेल्या मध्य विभागाच्या राष्ट्रीय मानांकन टेबल-टेनिस स्पर्धेत महिला गटाच्या एकेरीचे विजेतेपद मिळवले. यंदाच्या मोसमातील अनेक अपयशानंतर तिने मिळवलेले हे पहिलेच विजेतेपद आहे. या विजेतेपदामुळे पूजाचा भारताच्या महिला टेबल टेनिस संघात समावेश झाला असून हा संघ जागतिक प्लॅटिनम दूर स्पर्धेत सहभागी होणार आहे. या दौऱ्यात संघ कोरिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सहभागी होणार आहे.

२०००मध्ये वयाच्या नवव्या वर्षी पूजाने टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. आज केवळ २७व्या वर्षीच तिच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. ती रोहित चौधरी या नामांकित प्रशिक्षकाकडे सराव करते. तसेच तिचे पती अनिकेत कोपरकर हेदेखील राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्यांचेही बहुमोल मार्गदर्शन पूजाला मिळते. 

शैलजा गोहड यांच्याकडे पूजा सुरुवातीला सराव करत होती. मग गोहड यांनीच तिला व्यावसायिक प्रशिक्षक रोहित चौधरी यांच्याकडे सराव करण्यासाठी पाठवले आणि त्यानंतर तिचा हौशी खेळाडू ते व्यावसायिक खेळाडू असा प्रवास सुरू झाला. अतिशय लहान वयातच तिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ओएनजीसी (ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड) कंपनीने २०१०मध्ये तिला आपल्या सेवेत सामावून घेतले. १७ आणि २१ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवले. २०१६पर्यंत राष्ट्रीय क्रमवारीत ती तिसऱ्या स्थानावर होती. सध्या ती विविध स्पर्धांमध्ये खेळत असली, तरी तिचे मुख्य ध्येय भारताचे सातत्याने प्रतिनिधित्व करण्याचे असून, आता तर ती भारताच्या महिला एकेरी संघाचाच एक भाग बनली असल्याने तिचे ध्येय पूर्ण होणार आहे.

कटक येथे झालेल्या सतरा वर्षांखालील मुलींच्या एकेरीत राष्ट्रीय विजेतेपद मिळाल्यानंतर ती खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. त्यानंतर पुण्यात झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत २००८मध्ये तिने दुहेरीत रौप्य पदक पटकावले. त्यानंतर रायपूर येथे झालेल्या युवा गटाच्या २१ वर्षांखालील स्पर्धेत तिने पुन्हा एकदा राष्ट्रीय विजेतेपद मिळवले.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच देशाचे प्रतिनिधित्व करताना तिने महिला दुहेरीत रौप्य पदक, तर त्याच स्पर्धेतील सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. आयटीएफएफ जागतिक सीरिज स्पर्धेत मोरोक्को येथे तिने कांस्य पदकाची कमाई केली. त्यानंतर लगेचच तेहरान येथील स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्य तर सांघिक गटात सुवर्णपदक मिळवले. याच वेळी तिची जपानमध्ये होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेसाठी पुन्हा एकदा भारताच्या महिला संघात निवड झाली. या स्पर्धेत मात्र तिला फारसे यश मिळाले नाही.

हैदराबाद येथे पार पडलेल्या ७७व्या राष्ट्रीय आणि आंतरराज्य स्पर्धेत तिने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. सांघिक गटात सुवर्ण, मिश्र गटात सुवर्ण आणि महिला एकेरीत रौप्य पदक जिंकून हरवलेला आत्मविश्वास परत मिळवला. या स्पर्धेद्वारे तिची शिलाँग येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. या स्पर्धेत तिने सांघिक गटात आणि मिश्र गटात मिळून दोन सुवर्णपदके जिंकली.

२०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने मुख्य संघात स्थान मिळवत कमालीचे यश संपादन केले. २०१७मध्ये आलेले अपयश विसरून तिने पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवून दिली. या स्पर्धेत तिने मनीषा बात्रा, मधुरिका पारकर, मौमा दास आणि सुतीर्था मुखर्जी यांच्यासह अफलातून कामगिरी करत सांघिक गटाचे सुवर्णपदक पटकावले. सध्या ती बूस्टर्स टेबल टेनिस क्लब आणि रेडियंट अकादमी येथे सराव करते. कोरिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपनसाठी सुरू असलेला हा सराव तिला पुन्हा अव्वल स्थानी नेईल.

पुण्याच्या मानांकित खेळाडूंमध्ये तिचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असले, तरी आगामी मोसमात पूजाकडून आणखी बऱ्याच विजेतेपदांची आणि पदकांची अपेक्षा आहे. राष्ट्रीय विजेतेपद निश्चितच महत्त्वाचे असते; पण एखाद्या परदेशातील स्पर्धेत एकेरीत मिळवलेले विजेतेपद तुम्हाला आंतरराष्ट्रीय विजेता म्हणून नावारूपाला आणत असते. पूजाची वाटचाल त्याच दिशेने सुरू असली, तरी ती वाटते तितकी सोपी नाही.  कोरिया, थायलंड, जपान, चीन या देशांच्या खेळांडूंविरुद्ध खेळताना वेग जितका महत्त्वाचा असतो, तितकीच महत्त्वाची असते शारीरिक तंदुरुस्ती. भारतीय खेळाडू याच बाबतीत आजवर कमी पडत आले आहेत. पूजाने हा इतिहास पुसावा व नवा इतिहास साकार करावा हीच अपेक्षा आहे.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Megha more About 184 Days ago
Very nice artical
0
0

Select Language
Share Link