Next
‘जेएसडब्ल्यू’तर्फे जयगड येथे शिक्षकांसाठी शिबिर
BOI
Wednesday, December 26, 2018 | 03:00 PM
15 0 0
Share this article:जयगड : येथील जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेडच्या सीएसआर विभागातर्फे मानस समुपदेशन, रत्नागिरीतील मानसोपचार व मूल्यमापन केंद्र आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शिक्षकांसाठी ‘वर्गाचे मानसिक स्वास्थ्य आणि शिक्षकांची भूमिका’ हे दोन दिवसीय निवासी शिबिर घेण्यात आले.

ओपीजेसी अंबुवाडी येथे हा कार्यक्रम झाला. यासाठी १८ शाळांमधून २२ शिक्षक उपस्थित होते. २१ डिसेंबर २०१८ रोजी सरस्वती पूजनाने शिबिराची सुरुवात झाली. ‘जेएसडब्ल्यू जयगड’चे प्रमुख कॅप्टन रवी चंदेर यांनी प्रशिक्षकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आणि आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी लिंग विशेषज्ञ चंचल तेलंग यांनी स्त्री-पुरुष समानता या विषयावर मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या पाहिजेत असे सांगतानाच त्यांनी किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन ही अत्यंत गरजेची बाब असल्याचे नमूद केले.

प्रा. माणिकराव बाबर यांनी मानसिक स्वास्थ्याची ओळख, सकारात्मक मानसिक स्वास्थ्याची संकल्पना व ध्येये, मानसिक स्वास्थ्य लाभलेल्या व्यक्तींची लक्षणे सांगून त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. मुलांचे मुलभूत समुपदेशन कसे करावे, विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांची देहबोली कशी अभ्यासावी, पालकांशी कशा प्रकारे संवाद साधावा या गोष्टी उदाहरणासह सांगितल्या. मुलांच्या समस्या आणि शिक्षकांची समस्या व शिक्षकांची भूमिका याबद्दल सांगताना बाबर यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याने हाताळावे, समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना जास्त वेळ द्यावा, असे नमूद केले आणि परीक्षेतील अपयशाची कारणे व उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन केले.प्रा. चंद्रमोहन देसाई यांनी शिक्षकाने सुसमायोजित असणे आणि त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक असणे गरजेचे असल्याचे नमूद केले. पुस्तके हाताळण्याची कला, प्रभावी अभ्यास कसा करावा, नियमित अभ्यासाच्या सवयी कशा अंगी बाणाव्या याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रा. माधव पालकर यांनी प्रभावी शिक्षकांची वैशिष्ट्ये, मुलांच्या मानसिक स्वास्थ्याच्या गरजा, मुलांना समजून घेताना त्यांच्या खोड्यांचे रूपांतर छंदात कसे होईल याकडे लक्ष देणे याविषयी सांगितले.

या दोन दिवसीय निवासी उपक्रम पूर्ण झाल्यावर शिक्षकांनी चर्चासत्रात पालकांचा आर्थिक स्तर, ग्रामीण-शहरी पालक. पालकांच्या मानसिक बदलाचे स्वरूप, कुटुंबाचे बदलते स्वरूप आदी विषयांवर चर्चा करून आपले अनुभव कथन केले. समारोपप्रसंगी जेएसडब्ल्यू पोर्ट लेडीज क्लबच्या अध्यक्षा लावण्या चंदेर व उषा वेट्रीवेल, ओपीजेसी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे कैवल्य पेढे, प्रतिज्ञा संसारे उपस्थित होत्या. या शिबिराचे आयोजन ‘जयगड पोर्ट’चे चंदेर, सीएसआर विभागप्रमुख सुधीर तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी सीएसआर विभागाच्या सई साळवी, योगिता महाकाळ, दर्शन रहाटे, सनोबर सांगरे यांनी मेहनत घेतली. जेएसडब्ल्यू एनर्जीचे विशेष सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search