Next
जुस्तजू जिसकी थी....
BOI
Sunday, October 07, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आपला अभिनय आणि सौंदर्य यामुळे बॉलिवूड गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा १० ऑक्टोबरला वाढदिवस. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘उमराव जान’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील ‘जुस्तजू जिसकी थी....’ या गीताचा...
...............
सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राज कपूर ‘तिच्या’बद्दल म्हणाले होते, की ‘जर ‘हिने’ मन एकाग्र करून काम केले, तर ती खूप उच्च कोटीची अभिनेत्री होईल.’ राज कपूर यांनी हे उद्गार ‘धरमकरम’ चित्रपटाचे काही भाग बघितल्यानंतर काढले होते आणि ज्या अभिनेत्रीबद्दल राज कपूर हे म्हणाले होते, ती अभिनेत्री होती ‘रेखा’! भानुरेखा गणेशन हे तिचे मूळ नाव! राज कपूर यांचे हे वर उल्लेख केलेले उद्गार १९७७-७८च्या दरम्यानचे आहेत. म्हणजे रेखा तेव्हा २४ वर्षांची होती. १० ऑक्टोबर १९५४ ही तिची जन्मतारीख!

तिचा ‘सावन भादो’ हा पहिला चित्रपट १९७०मध्ये पडद्यावर आला. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ती चौदा-पंधरा वर्षांची असेल. तेव्हा ती अंगाने जरा जाड होती. मद्रासकडील काळासावळा वर्ण! तिचे ते रूप, तसेच त्या वेळेस आणि पुढची पाच-सात वर्षे तिचे वागणे, चित्रपटातील कामे करणे हे सगळे जाणून घेऊनच राज कपूर यांनी तसे उद्गार काढले होते.

...आणि आज तिच्या वयाच्या चौसष्ठाव्या वर्षी तिचे चित्रपटसृष्टीतील स्थान आणि विविध भूमिका पाहिल्या, की हे जाणवते, की रेखाने त्या वेळचे राज कपूर यांचे ते शब्द/बोलणे/सल्ला/मार्गदर्शन गांभीर्याने मनावर घेतले होते. म्हणूनच आज तिचे जे स्थान आहे, तेथे ती आहे.

तशी दक्षिणेकडून आलेल्या चित्रपटतारकांची संख्या बरीच आहे. आकर्षक नाक-डोळे असलेल्या, विपुल केशसंभाराच्या आणि स्त्री सौंदर्याच्या व्याख्येत बसणारी शरीरयष्टी राखणाऱ्या त्या सर्वच नायिका हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यावर आपल्यात बदल करून लोकप्रियता टिकवत गेल्या. आणि त्यांच्याप्रमाणेच रेखाने आपला स्थूल बांधा सडपातळ करून आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली. तिच्या समकालीन आणि थोड्याफार पुढील-मागील काळातील हेमा मालिनी, श्रीदेवी, जयाप्रदा, माधुरी दीक्षित यांच्या स्पर्धेत रेखा आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करून राहिली.

सुरुवातीच्या काळातील रेखा चित्रपटसृष्टीत वादग्रस्त ठरली. कधी पत्रकारांबरोबरच्या वागणुकीमुळे, तर कधी काही नायकांबरोबरच्या बोलण्या-चालण्याने. आणि नंतर प्रसिद्ध उद्योगपतीशी लग्न, त्याची आत्महत्या इत्यादी इत्यादी.

... पण हे सगळे घडत असतानाच १९७०मध्ये एक, १९७१मध्ये चार, १९७२मध्ये सात, १९७३मध्ये नऊ असे तिचे चित्रपट चढत्या संख्येने पडद्यावर येत राहिले. अर्थात, खूप सिनेमे केले, म्हणून ती मोठी झाली नाही, तर तिच्या भूमिकांमधील विविधता व अभिनयातील परिपक्वता तिला एका उंचीवर नेत गेली. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये ५५-६० वयाचे चाहतेही आहेत व ३०-३५ वयातील चाहतेही आहेत.

खूबसूरत, घर या चित्रपटांपासून तिच्या अभिनयात कमालीची परिपक्वता आली. त्यानंतर ज्या भूमिका तिला मिळत गेल्या, त्यामुळे एक परिपक्व प्रेयसी म्हणूनच ती रसिकांपुढे येत राहिली. फक्त प्रणयगीतांतून दिसणारी प्रेयसी न राहता प्रियकरावर जीव तोडून प्रेम करणारी (‘मुकद्दर का सिकंदर’ आठवा) आणि त्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार असणारी, अशी तिची प्रतिमा तयार झाली.

तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकांपैकी काही भूमिका या तिच्या जीवनातील घटनांशी निगडित होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो तो १९८२च्या ‘जीवनधारा’ चित्रपटाचा. आई, बहीण, भाऊ अशा कुटुंबीयांसाठी खस्ता खाणारी, आपले सुख बाजूला ठेवणारी रेखा फक्त पडद्यावरच दिसली नाही, तर तिच्या जीवनातही तेच घडले होते.

‘सिलसिला’ हा चित्रपट तर रेखाच्या जीवनातील एका भागासाठीचाच होता. जे जीवनात, तेच पडद्यावर, तेथे वेगळा अभिनय करायची गरजच काय? रेखाच्या विविध भूमिका बघत असताना तिच्या अभिनयसामर्थ्याची जाणीव होते. ‘उत्सव’मधील ती ‘वसंतसेना’ खरोखरच शोभली होती. तिचे रूपसौंदर्य, अभिनय व वेशभूषा सारेच अप्रतिम. ‘उमराव जान’ चित्रपट तर खास तिचाच होता. परंतु बदललेल्या काळानुसार बदललेल्या कथानकातील रेखा खूनभरी मांग, जाल, किला, खिलाडियों का खिलाडी अशा चित्रपटांतील विविध भूमिकांतून आपला अभिनय दाखवून आणि सौंदर्य टिकवून आपण ‘एव्हरग्रीन’ असल्याचे दाखवत आली आहे. नवीन निश्चल ते अक्षयकुमार अशा नायकांच्या वेगवेगळ्या पिढ्यांबरोबर काम करून आपले वेगळेपण जपणारी रेखा आजही चित्रपटप्रेमींना भावते! तिच्या जीवनातील ‘अमिताभ’ या चार अक्षरांबद्दलही तिने काही लपवून ठेवले नव्हते. एकेकाळी पत्रकारांबद्दल रोष बाळगणारी रेखा केव्हाच मागे पडली आहे. सध्याची ‘ रेखा मॅडम’ आकर्षकपणा काय असतो, ते अभिनय, शरीरसौंदर्य या बाबतीत ठामपणे दाखवून देऊ शकते. त्या अशाच राहोत, अशा शुभेच्छा त्यांना वाढदिवसानिमित्त देऊन आपण त्यांच्या एका ‘सुनहऱ्या’ गीताकडे वळू या! 

१९८१मध्ये पडद्यावर आलेला निर्माता, दिग्दर्शक मुजफ्फर अली यांचा ‘उमराव जान’ हा चित्रपट’ मिर्झा हादी रुस्वा यांच्या ‘अदा’ कादंबरीवर आधारित होता. त्याचे बहुतांश चित्रीकरण लखनौ, तसेच फैजाबाद येथे झाले. रेखा, फारुख शेख, नासिरुद्दीन शाह असे त्यातील मुख्य कलावंत होते. गीतकार शहरयार यांच्या अप्रतिम काव्याला संगीतकार खय्याम यांनी स्वरबद्ध केले होते. त्यामधील दहा गीतांपैकी आशा भोसले यांनी गायलेले एक गीत पाहू या -

इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने

(खरेच की हो) ज्यांचा आम्ही शोध घेत होतो (ते आपले माणूस, प्रेम करणारे माणूस) त्यांना आम्ही प्राप्त करू शकलो नाही. ते आम्हाला मिळाले नाही; पण (काही हरकत नाही, चला) त्या निमित्ताने हे जग (कसे आहे) तर आम्ही पाहिले. 

तुझको रुसवा न किया, खुद भी पशेमां न हुए 
इश्क की रस्म को इस तरह निभाया हमने 

(तुम्ही आम्हाला प्राप्त झाला नाहीत म्हणून रागाने, आम्ही) तुम्हाला बदनाम (रुसवा) केले नाही (आणि त्यामुळे) आम्ही स्वतःही लज्जित (पशेमां) झालो नाही. (त्याची खंतही वाटू दिली नाही आणि) अशा तऱ्हेने आम्ही प्रीतीचे रीतिरिवाज (रस्म) निभावून नेले. (फक्त मनातल्या मनात दुःख करीत राहिलो.) 

कब मिली थी, कहाँ बिछडी थी, हमें याद नहीं 
जिंदगी तुझ को तो बस ख्वाब में देखा हमने

(प्रीतीचे सौख्य देणारे) जीवन (आम्हाला) कधी मिळाले होते, (कधी ते आमच्यापासून) दूर गेले (दुरावले गेले), (यातले) आता आम्हाला काहीच आठवत नाही. (खरेच ते तसे प्रीतीच्या सौख्याचे जीवन) आम्ही फक्त स्वप्नातच बघितले होते (ते एक स्वप्नच होते, असे आता आम्हाला वाटते.) 

ऐ अदा और सुनाएं भी तो क्या हाल अपना
उम्र का लंबा सफर तय किया तनहा हमने

(आमच्या या आयुष्याच्या ढंगाबद्दल, पद्धतीबद्दल) आम्ही अजून काय वेगळे सांगावे? (अहो) आयुष्याचा हा दीर्घ प्रवास आम्ही एकट्यानेच (एकाकीपणानेच) व्यतीत केला आहे. खरेच ज्यांचा शोध आम्ही घेत होतो, त्यांना प्राप्त करू शकलो नाही. 

फक्त दोन ओळींचे खूप आशय असलेले हे शेर आणि त्यामधून तयार झालेली ही गझल भावपूर्ण स्वरांमध्ये आशा भोसले यांनी गायली आहे. साजेसे संगीत खय्याम यांनी दिले आहे. आणि पडद्यावर साकार करणारी उमराव जान अर्थात रेखा वेगळा अभिनय करत आहे, असे वाटतच नाही. ती ते गीत जगत आहे व त्यातूनच ते आपल्यापुढे येते असे वाटते. 

रेखाच्या जीवनाकडे पाहिले तर तिचा विवाह, त्यानंतर घडलेल्या घटना आणि महत्त्वाचे म्हणजे अमिताभबरोबर तिचे घेतले जाणारे नाव! या सगळ्याचा विचार करता हे गीत रेखाचे जीवनगीत आहे, असेच वाटते. एकूण वस्तुस्थिती काय असेल ती असेल, पण दुःखी आशय असला तरी हे गीत ‘सुनहरे’ आहे एवढे मात्र खरे!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search