
गेली तीस वर्षं सातत्याने महाराष्ट्रभर दौरे करून मराठी संगीत नाटक सर्वदूर पोहोचवणाऱ्या गायक कलावंतांमध्ये चिंचवड येथील ‘नादब्रह्म’ परिवाराचे डॉ. रवींद्र आणि डॉ. वंदना घांगुर्डे या दाम्पत्याचा ठळक आणि लक्षणीय सहभाग आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा संगीतप्रवास आणि संगीत रंगभूमीविषयीचे त्यांचे विचार जाणून घेतले. ‘अन्य कोणत्याही जुन्या गोष्टींप्रमाणेच संगीत नाटकंही आपण तरुणांना रुचेल, पचेल अशा स्वरूपात मांडली, तर त्यांना नक्कीच भावतात,’ असे अनुभवाचे बोल त्यांनी काढले. संगीत रंगभूमीवरील या सेवाव्रती दाम्पत्याची ही खास मुलाखत आज गुढीपाडव्याच्या औचित्याने प्रसिद्ध करत आहोत.................
- रवींद्रजी, तुम्हाला संगीत नाटकाची आवड कशी निर्माण झाली? तुम्ही संगीत नाटकांकडे कसे वळलात? कधीपासून?
- माझा जन्म कोकणातला आणि बालपणही तिथेच गेलं. त्यामुळे सर्वसाधारण कोकणी माणसाला असते तशी आवड संगीत नाटकं पाहून आवड लहानपणीच निर्माण झाली. साहजिकच शास्त्रीय संगीताकडेही ओढा निर्माण झाला. कोकणातून आधी मुंबईत आणि मग पुण्यात येऊन स्थायिक झालो. इथे वसंतराव देशपांडे यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आम्ही संगीत नाटकं करण्याचा निश्चय केला. १९८७ साली आम्ही ‘संगीत संशयकल्लोळ’पासून संगीत नाटकं करायला सुरुवात केली. मग ‘मानापमान’, ‘कट्यार...’ यांसारखी नाटकं केली. ‘मृच्छकटिक’ केलं. सावरकरांची नाटकं केली. सावरकरांची एक आठवण म्हणजे १९२४ ते १९३७ अशी काही वर्षं ते डॉ. वंदना घांगुर्डे यांचे आजोबा नारायणराव पटवर्धन यांच्या घरी राहत होते. सावरकरांमुळे भाषेचं एक वेगळं रूप, एक वेगळं सौंदर्य कळलं.
- संगीत नाटकाच्या इतिहासाविषयी तुमच्याकडून ऐकायला आवडेल..
- संगीत नाटकाचा पाया रचला तो अण्णासाहेब किर्लोस्करांनी. त्यांना ‘कवी’ म्हणत. म्हणजे नाटकाच्या सर्व अंगात प्रवीण! तेच नाटककार, तेच गीतकार, तेच संगीतकार, तेच तालीम मास्तर. त्यांना साथ दिली देवलांनी. नंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आले. मंचावर केशवराव भोसले, बालगंधर्व, मा. दीनानाथ होते. १९११-३३ हा काळ संगीत रंगभूमीचा ‘सुवर्णकाळ’ मानला जातो. टेंबे, भास्करबुवा बखले, वझे, मास्टर कृष्णराव असे संगीतकार, तर कृष्णाजीपंत खाडिलकर, गडकरी असे दिग्गज नाटककार होते. त्या वेळी खूप मोठी नाटकं आली. त्या काळी ब्रिटिशांचा अंमल असताना आपला देश, आपली भाषा, आपला स्वाभिमान जपण्यासाठीही नाटकं लिहिली गेली. संगीत रंगभूमी समृद्ध झाली. छोटी छोटी सुंदर पदं आली. अनेक नाटक कंपन्या आल्या. पुढे अनेक चांगल्या इंग्लिश नाटकांची रूपांतरंसुद्धा सादर केली जात होती. त्या वेळी उत्तमोत्तम नाटक कंपन्या होत्या. महाराष्ट्र नाटक मंडळी, किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व संगीत मंडळी, पुढे मग बलवंत संगीत मंडळी, शिवराज अशा अनेक कंपन्या होत्या. सुवर्णकाळ सरल्यानंतर संगीत नाटकाला उभारी मिळाली ती १९६०पासून विद्याधर गोखले यांच्या नाटकांमुळे. गोखल्यांना संस्कृत आणि उर्दूची उत्तम जाण होती. मग पुढे कानेटकर, शिरवाडकर, दारव्हेकर यांनी त्या परंपरेत भर घातली.
- तुम्ही संगीत नाटक कशा प्रकारे सादर केलंत?
- आम्ही पूर्वीच्या संगीत नाटकात असणारा अतिरिक्त पसारा किंवा विस्तार कमी करून नाटक अधिक सुटसुटीत केलं. उदाहरणार्थ, पूर्वी नाटकं रात्री दहाला सुरू होऊन पहाटे चार-पाचपर्यंत संपायची. एक तर मुळात नाटकात पदांची संख्या भरपूर असायची. ती आम्ही कमी केली. शाकुंतल नाटकात २०० पदं आहेत. सौभद्रमध्ये ९०-९५ पदं आहेत. संगीत सहज ऐकण्याची आजच्याएवढी साधनं त्या काळी उपलब्ध नसल्याने लोकांची सांगीतिक आणि सांस्कृतिक भूक अशा ‘भरपूर वेळ चालणाऱ्या’ नाटकांमुळे भागली जायची. आताची लोकांची गरज वेगळी आहे. ती ओळखून आम्ही संगीत नाटकाच्या लांबीत बदल केला. आटोपशीरपणा आणला.
- तुम्ही कोणाची नाटकं जास्त प्रमाणात सादर केलीत? तुमची विशेष आवडीची नाटकं कोणती?
- किर्लोस्कर आणि देवल यांची नाटकं तर आम्ही केलीच, खाडिलकरांची केली, सावरकरांची केली, कानेटकरांची केली. या प्रत्येक नाटककाराच्या भाषेचा एक खास बाज, सौंदर्य, सौष्ठव आणि वैभव आहे; पण सर्व जण मानतात शेवटी किर्लोस्करांना! दीनानाथ मंगेशकरांनी ‘बलवंत संगीत मंडळी’ काढली, तीही त्यांच्याच नावावरून!
- वंदनाताई, तुमचा संगीत नाटकांचा प्रवास कसा झाला? नुकताच तुम्ही ‘बलवंत संगीत मंडळी’चा शताब्दी महोत्सव साजरा केलात. त्याविषयी थोडक्यात सांगा.- संवादातून पद आणि पदातून पुन्हा संवाद अशी सुंदर गुंफण असणारं संगीत नाटक कायमच भावत आलं होतं. शब्दांत लपलेला सूर आणि सुरांत लपलेले शब्द यांची गुंफण मोहवणारी अशीच! त्यामुळे संगीत नाटक आपली अभिजातता टिकवून आहे आणि ती टिकून राहीलही. समाजातल्या प्रश्नावर भाष्य करणारं किंवा डोळ्यांत अंजन घालण्याचं कामही संगीत नाटकांनी केलं आहे. मराठी संगीत नाटकांत तीन प्रकारच्या विचारधारा मानता येतील. बालगंधर्व, केशवराव भोसले आणि दीनानाथ मंगेशकर. यांपैकी दीनानाथ यांचे शिष्य म्हणजे डॉ. वसंतराव देशपांडे आणि तेच आमचे गुरू. ‘बलवंत संगीत मंडळी’चे तीन मालक होते. चिंतामणराव कोल्हटकर, दीनानाथ आणि कोल्हापुरे. नाटकातली शब्द आणि दिग्दर्शनाची बाजू कोल्हटकर सांभाळीत असत आणि बाकी दोघे संगीताची बाजू सांभाळायचे. नाटक मंडळी स्थापना करताना ‘बलवंत’ हे नाव घेतलं गेलं ते अण्णासाहेब किर्लोस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोघांचं ‘बलवंत’ नाव वापरून! ‘बलवंत संगीत मंडळी’ने मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकंसुद्धा केली. आपल्या पूर्वसुरींचा हा वारसा किती समृद्ध आणि महान आहे ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावं या हेतूने आम्ही ही संगीत नाटकं करण्याचं ठरवलं. गेली तीस वर्षं आम्ही नादब्रह्म परिवारातर्फे मानापमान, स्वयंवर, संशयकल्लोळ, मंदारमाला, कट्यार काळजात घुसली, संन्यस्त खड्ग, ययाती देवयानी, सौभद्र, शाकुंतल, मृच्छकटिक. एकच प्याला यांसारखी अनेक नाटकं करत आलो आहोत. तसंच संगीत नाटकांमध्ये स्थित्यंतरं कशी होत गेली, त्यावरही आम्ही आमच्या संस्थेतर्फे कार्यक्रम करत असतो.
- रवींद्रजी, आजकालच्या फास्ट जमान्यात ही संगीत नाटकं लोकांपर्यंत पोहीचावीत म्हणून ती कॉम्पॅक्ट स्वरूपात (थोडी संकलित करून) सादर करावीत असं तुम्हाला वाटतं का?
- एक मान्य, की आजच्या इंटरनेट, यू-ट्यूबच्या जगात लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात, कथानक माहीत असू शकतं. ते समोर सादर कसं केलं जातंय हाच एक बघण्याचा भाग असू शकतो. त्यामुळे आताच्या काळाची गरज म्हणून कथानकाला थोडी कात्री लावून चालू शकतं. त्यामुळे उत्तम संकलन करून नाटकातला अर्क आणि सत्त्व जपून, नाटकं सादर करायला काहीच हरकत नाही.
- नव्या, तरुण पिढीपर्यंत हा ठेवा पोहोचतोय आणि त्यांना तो आवडेल असा विश्वास वाटतो का?- निश्चितच. आपण त्यांना रुचेल, पचेल अशा स्वरूपात मांडलं, तर त्यांना नक्कीच भावतं असा आमचा अनुभव आहे. चांगले पर्याय मुलांना देणं हे आपलं काम आहे. आम्ही दोन दिवसांचं शिबिर आयोजित करून उपस्थित ३५ मुलांना संगीत नाटक काय ते समजावून सांगितलं. सगळं समजून घेतल्यावर त्यांची प्रतिक्रिया अशीच होती, की ‘हे इतकं चांगलं असतं हेच आम्हाला माहीत नव्हतं.’
- संगीत नाटकाला प्रोत्साहन किंवा मदत मिळण्यासंबंधी काही आश्वासक परिस्थिती आहे, असं वाटतं का?
- शासनदरबारी फारच उदासीनता आहे. अनुदान आहे असं म्हणतात; पण ते कोण घेऊन जातं हा संशोधनाचा विषय होईल. तळमळीने काम करणाऱ्या कलावंतांपर्यंत मदत पोहोचताना दिसत नाही. मग जे आत्मीयतेने स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून ही कला सादर करताहेत, ते करत राहतात. कारण संगीत नाटकाच्या वेडाने झपाटलेले लोक आहेत ते त्यामध्ये काम करत राहणारच आहेत. ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा’ हे अशांना लागू होतंच की!
- महाराष्ट्रात संगीत नाटकांना विशेष प्रतिसाद कुठे मिळतो?
- मुंबई, पुणे आणि गोव्यात प्रतिसाद चांगला असतो. गोव्यात तर वर्षभर माहौल असतो. कारण तिथल्या राज्य सरकारचे उत्तम आणि सढळ सहकार्य असते, जे महाराष्ट्रात अजिबातच नाही. बाकी इतर शहरांत नगर, सोलापूर, कोल्हापूर आणि विदर्भ या ठिकाणी सुनियोजित पद्धतीने केलं तर काही होऊ शकतं.
(डॉ. रवींद्र आणि डॉ. वंदना घांगुर्डे या दाम्पत्याच्या मुलाखतीचे व्हिडिओ सोबत देत आहोत.)
(व्हिडिओ : मानसी मगरे)