Next
‘मुलांवर डोळसपणे प्रेम करा’
BOI
Friday, November 17, 2017 | 03:08 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘आपली मुले ही आपले एक्स्टेंशन नाहीत किंवा आपली मालमत्ता नाहीत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्यांचा सन्मान राखा आणि मुलांवर डोळसपणे प्रेम करा,’ असा सल्ला सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री हेमा लेले यांनी दिला समस्त पालकांना दिला.

लेले यांचे ‘पालकत्वाचे कॉकटेल’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. येथील बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात या पुस्तकावर चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. या पुस्तकाचे परीक्षण केंद्राच्याच तीन पालकांनी केले आणि आपल्या पालकत्वाच्या अनुभवांच्या आधारे चर्चेत भाग घेतला.

‘आपण पालक म्हणून वागत असताना आपण स्वतः कसे वाढलो याचा विचार करतो. सकारात्मक बोलणाऱ्या पालकांचे नकारात्मक बोलणाऱ्या पालकांशी असलेले प्रमाण हे १: १४ असे आहे. मुले पालकांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतात. त्याचा पालकांनी गैरफायदा घेऊ नये. तसे झाल्यास म्हातारपणी विरुद्ध परिस्थितीचा सामना करावा लागेल हेमा ताईंचे विचार मला पटले,’ असे दीपाली बोरा यांनी नमूद केले. त्यांनी पुस्तकातील शिस्त व शिक्षा, विचित्र औदासिन्य, पालकांचे व्यसन, पालकांची गोची आदी प्रकरणांचा उल्लेख केला.

अॅड. शिल्पा महामुनी म्हणाल्या, ‘माझे पालकत्व ‘बालरंजन’च्या प्रांगणात रुजले आणि फुलले. इथे होणारे सुजाण पालक मंडळाचे कार्यक्रम आपल्याला समृद्ध करतात. आर्य चाणक्यांच्या काळापासून पालकत्व या विषयाचा विचार झाला आहे. पालक ज्या गोष्टी आचरणात आणतात, त्याच मुलांना सांगण्याचा नैतिक अधिकार पालकांना पोहोचतो. पालकांनी स्वतः मनोवृत्ती शांत ठेवावी आणि मुलांना कणखर बनवावे.’

कपिल अपशंकर यांनी पालकत्व हे उत्स्फूर्त असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘लेले यांचे ‘पालकत्वाचे कॉकटेल’ हे पुस्तक ‘पालकत्वाचे हँडबुक’ असून त्यात वेगवेगळ्या समस्यांची उत्तरे सापडतात. त्यातील नव्या जुन्याच्या संगमाने आपले पालकत्व बहरेल. आपण मुलांचे रोल मॉडेल असतो हे पालकांनी लक्षात ठेवावे.’

‘बालरंजन’च्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी या चर्चेचा अध्यक्षीय समारोप केला. ‘मुलांना कष्ट करायला शिकवा, चैन करायला ती आपली आपण शिकतील. मुलांना वाढविताना ‘ट्रॅफिक सिग्नल’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवावी. गैरवर्तनाला लाल दिवा, समाजमान्य वर्तनाला हिरवा दिवा असावा; मात्र नापसंत वर्तन असले, तरी काही वेळा चालेल असा पिवळा दिवाही असणे गरजेचे आहे.’

‘हा कार्यक्रम खूपच रंगला आणि आशयसंपन्न झाला,’ असे आशा होनवाड यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search