Next
गोष्ट सांगण्याच्या ऑनलाइन स्पर्धेला जगभरातून प्रतिसाद
पाच ते १९ वर्षे वयोगटासाठीही स्पर्धा आयोजित
दत्तात्रय पाटील
Wednesday, October 31, 2018 | 11:22 AM
15 0 0
Share this article:

बदलापूर : गोष्ट सांगण्याच्या निमित्ताने घराघरांमधून बालक-पालक संवाद वृद्धिंगत व्हावा, गोष्टींची परंपरा कायम राहावी आणि वाचन परंपरा दृढ व्हावी, या हेतूने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील ‘सुहृद : एक कलांगण’ या संस्थेच्या वतीने ‘गोष्ट सांगा’ ही अनोखी ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने जगभरातील २० वर्षांवरील मराठी भाषकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकालही जाहीर झाला असून, आता पाच ते १९ वर्षे वयोगटासाठीही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धकांनी त्यांची पाच मिनिटांची गोष्ट व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून संस्थेच्या फेसबुक पेजवर पोस्ट करणे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेतील नावीन्य आणि आणि संस्थेच्या उपक्रमांचे वेगळेपण ओळखून बदलापूरच्या संवेग फाउंडेशनचे श्रीधर पाटील आणि पुण्यातील ‘डीजी व्यवस्थापन तज्ज्ञ’चे धनंजय गोखले यांनी या स्पर्धेला आर्थिक पाठबळ अर्थात प्रायोजकत्व दिले. या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेते आणि आवाजाच्या दुनियेतील किमयागार उदय सबनीस यांनी केले. 

या स्पर्धेत बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे,वाशी, मुबई, पेण, पुणे, सांगली, यवतमाळ, इंदोर आणि वॉशिंग्टन आणि नायजेरियामधून एकूण ४१ स्पर्धकांनी भाग घेतला होता. १५ ऑक्टोबर म्हणजे वाचन प्रेरणा दिनी रात्री परीक्षक उदय सबनीस यांनी व्हिडिओद्वारेच निकाल घोषित केला. विविध शहरांमधील विजेत्यांना पुस्तके आणि सीडी स्वरूपातील पारितोषिके पोहोचवण्याची जबाबदारी अनुक्रमे बुकगंगा डॉट कॉम आणि डीजी व्यवस्थापन तज्ज्ञ यांनी आनंदाने पार पाडली.

या स्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी -

प्रथम - वैदेही अष्टपुत्रे- कुलकर्णी, पुणे; द्वितीय - श्रीपाद रानडे, बदलापूर; तृतीय - अमरजा परांजपे, बदलापूर.

या व्यतिरिक्त ललिता घोडे (यवतमाळ), समीरा नवलकर (मुंबई), सावनी गोडबोले (पेण), उमा निजसुरे (बदलापूर), मृदुला कर्वे (पुणे), प्रसाद गोडबोले (पेण), अनुया धारप (डोंबिवली), गायत्री कशेळकर-हर्डीकर (वॉशिंग्टन), मंजिरी येडूरकर (सांगली) यांना उल्लेखनीय पारितोषिके मिळाली.
या वेगळ्या स्पर्धेबद्दल सर्वच स्पर्धकांनी आनंद व्यक्त केला आणि पुढेही प्रतिसाद देण्याची इच्छा व्यक्त केली.

पाच ते १९ वयोगटासाठी स्पर्धा
सुहृद संस्थेने याच स्वरूपाची ‘गोष्ट माझी मजेदार’ ही स्पर्धा पाच ते १९ वर्षे वयोगटासाठीदेखील जाहीर केली आहे. या स्पर्धेचे नियम संस्थेच्या फेसबुक पेजवरून जाणून घेता येतील. ही स्पर्धा व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या दोन्ही माध्यमांद्वारे घेण्यात येणार आहे. दिनांक आठ, नऊ आणि १० नोव्हेंबर या तीन दिवशी स्पर्धकांनी आपले व्हिडिओ पाठवायचे आहेत. ही स्पर्धा पूर्णत: नि:शुल्क आहे. बालक आणि कुमारांचे वाचन व संवाद कौशल्य वाढीस लागावे, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. ही स्पर्धा पाच गटांमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचा निकाल १८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्याच्या दृष्टीने ‘सुहृद’ प्रयत्नशील आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Hemant janardan yashwantrao About 265 Days ago
खूप छान
0
0

Select Language
Share Link
 
Search