Next
मन कोणत्याही विकारावर मात करू शकते : पर्रीकर
BOI
Tuesday, February 05, 2019 | 11:44 AM
15 0 0
Share this article:

पणजी : ‘मानवी मन कोणत्याही विकारावर मात करू शकते....’ हे विचार आहेत देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे. गेल्या वर्षीपासून कर्करोगाने आजारी असलेल्या पर्रीकरांनी अलीकडेच आपल्या कामाला पुन्हा जोमाने सुरुवात केली असून, गोव्याचा अर्थसंकल्पही त्यांनी नुकताच सादर केला. त्यामुळेच स्वतःच्या अनुभवातून त्यांनी जागतिक कर्करोग दिनी (चार फेब्रुवारी) केलेले हे प्रेरक ट्विट नागरिकांना प्रचंड भावले आहे. २४ तासांच्या आत ४० हजारांहून अधिक जणांनी ते लाइक केले असून, नऊ हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे.


गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (६३) यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने फेब्रुवारी २०१८पासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई, दिल्ली, तसेच अमेरिकेतही त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने काही काळ ते कामापासून दूर होते; १४ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांना नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर त्यांनी घरातूनच कामाला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी त्यांचे एका बैठकीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. तसेच २०१९च्या सुरुवातीलाच मांडवी नदीवरील पुलाचे उद्घाटन करण्यासाठी ते उपस्थित राहिले होते. नाकात नळ्या घातलेल्या स्थितीतही कामाला सुरुवात करून त्यांनी आपण कर्करोगाचा बाऊ न करता सक्षमपणे त्याच्याशी लढणार असल्याचे इरादे स्पष्ट केले होते.


त्यानंतर ३० जानेवारी रोजी त्यांनी गोव्याचा अर्थसंकल्पही सादर केला. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर झालेल्या एका टीकेचा समाचार त्यांनी त्या वेळी केलेल्या भाषणात घेतला. ‘माझ्यात अजूनही जोश आहे आणि मी पूर्णपणे शुद्धीत (होश) आहे,’ असे ते म्हणाले होते. ‘आज मी पुन्हा एकदा वचन देतो, की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी गोव्याची निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन सेवा करीन,’ असे उद्गार त्यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणादरम्यान काढले होते.


या दोन्ही प्रसंगांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कृतीतून जे काही दिसले, त्याचीच उक्ती त्यांनी ट्विट केल्यामुळे ते नागरिकांना अधिक भावले. त्यांची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आणि ट्विट अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, यात शंका नाही.


दरम्यान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीदेखील कर्करोगाशी लढाई सुरू असतानाच पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


(सोनाली बेंद्रेने पुन्हा कामावर रुजू होताना व्यक्त केलेल्या भावना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dhananjay Kartiki About 124 Days ago
विकारांवर मात करणारं मन बाळगणार्‍या शरीरावर अखेर कर्करोगानं मात केली. पण त्याला इलाज नाही. मानव मर्त्य असला, तरी त्याचा विचार अमर असतो. असा अमर्त्य विचारांचा ठेवा देणार्‍या पर्रीकरांना विनम्र श्रद्धांजली!
0
0

Select Language
Share Link
 
Search