Next
‘आर्यन्स ग्रुप’ उभारणार राज्यातील पहिले सोलर थर्मल पॉवर पार्क
प्रेस रिलीज
Friday, August 17, 2018 | 03:27 PM
15 0 0
Share this story

‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’च्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सोलर थर्मल पॉवर पार्क प्रकल्पाची घोषणा करताना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता शितोळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप.
पुणे : येथील ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’च्या वतीने  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात, खासगी क्षेत्रातील राज्यातील पहिले सोलर थर्मल पॉवर पार्क (सौर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प) उभारण्यात येणार आहे. याची अधिकृत घोषणा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता शितोळे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केली. 

‘सोलर थर्मल पॉवर पार्कच्या माध्यमातून ‘आर्यन्स ग्रुप’ हरित उर्जा (ग्रीन एनर्जी) क्षेत्रात पदार्पण करत असून, भविष्यात ग्रुपच्या वतीने मिडीया, साखर उद्योग आणि पायाभूत सोयीसुविधा आदी व्यवसायांमध्ये देखील पदार्पण करण्यात येणार आहे’,अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप, मुकुंद जगताप, संचालिका स्वप्नाली जगताप व अजय जगताप हे या वेळी उपस्थित होते.

या पार्कविषयी अधिक माहिती देताना मनोहर जगताप म्हणाले, ‘सध्या हरित उर्जेला (ग्रीन एनर्जी) अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हेच लक्षात घेत, एक मोठा सोलर थर्मल पॉवर पार्क महाराष्ट्रात उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला. आमच्या ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चा भाग असलेल्या ‘कनिष्क एंटरप्रायजेस प्रा. लि.’ या कंपनीच्या वतीने हे सोलर थर्मल पॉवर पार्क उभारण्यात येत आहे. तब्बल १२०० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या या पार्कची उभारणी ही तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून, त्याची क्षमता ही सुमारे ३०० मेगावॅट वीज  निर्मितीची असेल. इंग्लंड व सिंगापूरस्थित ‘मित्तल आयएनसी’ ही संस्था या पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या निर्मितीसाठी अंदाजे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.’

‘या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असलेले आधुनिक तंत्रज्ञान हे होय. ज्यामुळे या प्रकल्पात २४ तास वीजनिर्मितीची प्रक्रिया सुरू ठेवण्यास मदत होणार आहे, हे विशेष. याबरोबरच या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेची विक्री आणि वितरण हे राज्य शासनाच्या नियमानुसार करण्यात येईल, असेही जगताप यांनी नमूद केले. याशिवाय या प्रकल्पामध्ये एक विशेष शैक्षणिक संकुल उभारून, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सौरउर्जेवरील काही अभ्यासक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे’, असेही ते म्हणाले.

याबरोबरच आर्यन्स ग्रुप लवकरच मिडीया क्षेत्रात पदार्पण करीत असल्याचे घोषणाही या वेळी करण्यात आली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link