Next
भाट्ये किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट दाखल
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला सागरी सुरक्षेचा आढावा
BOI
Friday, January 11, 2019 | 04:57 PM
15 0 0
Share this article:

भाट्ये किनाऱ्यावर तटरक्षक दलाच्या हॉवरक्राफ्टची पाहणी करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कमांडंट एस. आर. पाटील आदी मान्यवर.

रत्नागिरी : तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस एच १९८’ हे हॉवरक्राफ्ट देशाच्या पश्चिम किनार्‍यावर गस्त घालत असताना १० जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर दाखल झाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ जानेवारीला सकाळी या हॉवरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला.

तटरक्षक दलास रत्नागिरी येथे अद्ययावत हॉवरपोर्ट निर्माण करायचे असून, त्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे भाट्ये किनाऱ्याजवळील सुमारे तीन एकर जमीन तटरक्षक दलास हस्तांतरित केली आहे. हॉवरक्राफ्ट हे पाणी आणि जमीन या दोन्हींवर चालणारे उभयचर जहाज आहे. जेट इंजिनच्या साहाय्याने ते जमीन अथवा पाण्यावर हवेची एक मोठी गादी तयार करते आणि पृष्ठभागावर अधांतरी धावते. यामुळे ते बर्फाळ प्रदेश, दलदल, वाळूचे पुळण याबरोबरच रस्त्यांवरदेखील सहजरीत्या ताशी सुमारे ७० किमी इतक्या वेगाने धावते. जेथे साधारण जहाजांना प्रवेश करता येत नाही, अशा दुर्गम भागात हे जहाज तस्कर किंवा राष्ट्रद्रोही कार्यवाह्या करणार्‍या लहान जहाजांचा किंवा व्यक्तींचा पाठलाग करू शकते.

रत्नागिरी हे देशाच्या पश्चिम किनार्‍यावरील मुंबई ते गोवा या दोन महत्त्वाच्या ठिकाणांच्या मध्यावरील केंद्र असल्याने यास सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. नजिकच्या काळात भाट्ये येथे हॉवरपोर्टचे काम पूर्ण होताच रत्नागिरी येथे तटरक्षक दलाचे तीन हॉवरक्राफ्ट नेहमी तैनात राहणार असून, अरबी समुद्रातून मार्गक्रमण करणार्‍या तटरक्षक दलाच्या इतर हॉवरक्राफ्टना देखील या हॉवरपोर्टवर पार्किंग, रसद पुरवठा किंवा तांत्रिक मदत आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

रत्नागिरीमार्गे मुंबई ते मॅंगलोर यांदरम्यान गस्त घालणार्‍या या तटरक्षक दलाच्या हॉवरक्राफ्टची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमूगले आणि रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांच्याकडून ११ जानेवारीला पाहणी करण्यात आली. रत्नागिरी तटरक्षक दलाचे कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांनी हॉवरक्राफ्टच्या कार्यप्रणाली आणि प्रभावीपणा यांबद्दल माहिती दिली. ‘रत्नागिरीमार्गे हॉवरक्राफ्टच्या अशा गस्ती आता वारंवार हाती घेण्यात येत असून, भाट्ये येथे हॉवरपोर्टची निर्मिती झाल्यानंतर कोकणचा समुद्र किनारा अभेद्य होईल,’ असे कमांडंट पाटील म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search