Next
‘स्वेरी’च्या प्राध्यापकांचे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात डोंगरगावात श्रमदान
BOI
Monday, May 06, 2019 | 06:01 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
डोंगरगाव (ता. मंगळवेढा) येथे सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (स्वेरी) अध्यापकांनी सहा मे रोजी श्रमदानात सहभाग घेऊन समाजकार्याचा आनंद लुटला. कुदळ-फावड्यांच्या आवाजाने जणू तिथे तुफानच आले होते. डोंगरगाव सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरले असून, त्या दृष्टीने तयारीदेखील सुरू आहे. डोंगरगावचे सरपंच बाळासाहेब कवाळे व तेथील युवा कार्यकर्त्यांनी ‘तुफान आलंया...’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘पाणी फाउंडेशन’ उपक्रमात श्रमदान करण्यासाठी ‘स्वेरी’कडे काही विद्यार्थ्यांची मागणी केली होती. परंतु अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. कार्यक्रम समाजोपयोगी असूनही विद्यार्थ्यांना पाठवता येणार नसल्याने त्यांच्याऐवजी प्राध्यापक वर्गाने श्रमदानात सहभाग घेण्याची तयारी दर्शविली. ‘स्वेरी’च्या प्राध्यापकांनी स्वतः कुदळ हातात घेऊन घाम गाळला. ‘स्वेरी’च्या इंजीनिअरिंग व फार्मसीच्या स्टाफसमवेत पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे, तसेच ‘मेसा’चे समन्वयक, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी अशा मिळून ‘स्वेरी’च्या जवळपास ५० जणांनी यात सहभाग घेतला. त्यांनी पाणी साठविण्यासाठी चारी खणली. या वेळी उन्हाचा कडाका प्रचंड होता. परंतु सर्वांनी कामात कसूर केली नाही. दिवसभर काम फत्ते करून ‘स्वेरी’चा स्टाफ परतला. दिवसभरात केलेली स्वच्छता आणि सगळ्यांनी मिळून १२० फूट लांबी, तीन फूट रुंदी आणि तीन फूट खोली एवढ्या आकारमानाची जमीन खणलेली पाहून उपस्थित नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. माती काढून बांध घालताना तेथील ग्रामस्थांच्या प्रेरणादायी घोषणांमुळे कामातील उत्साह वाढत होता. स्वेरी शिक्षण संकुल महाराष्ट्रात शिक्षणात अग्रेसर आहेच; पण आता या अशा सांघिक, सामाजिक कार्यामुळे ते समाजकार्यातदेखील मागे नाही, हे दिसून आले. पाणी फाउंडेशनच्या या श्रमदानाच्या उपक्रमात मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, मंगळवेढा अर्बन बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. पवार, डोंगरगावचे सरपंच बाळासाहेब कवाळे, कांचन कवाळे यांच्यासह ‘स्वेरी’चे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. कामातील जोश पाहून ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ आपलाच गाव जिंकेल अशी आशा बाळगून ग्रामस्थदेखील तेवढ्याच जोमाने श्रमदान करत आहेत. सायंकाळी डोंगरगाव ग्रामस्थांनी स्वेरी परिवाराचे आभार मानले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
परमेश्वर माळी , पीएमरोपळे टीपीएल About 76 Days ago
स्वेरीचे अभिनंदन
0
0
परमेश्वर माळी , पीएमरोपळे टीपीएल About 77 Days ago
पाणी फाऊंडेशनचा उपक्रम फारच छान आहे. त्याला बाईटस आॅफ इंडियाची संपादकीय टीम व संबंधीत प्रतिनीधीने ही बातमी चांगली वापरल्यामुळे या उपक्रमाची माहिती जगभरात गेल्याचा फारच आनंद झाला.
0
0

Select Language
Share Link
 
Search