Next
व. पु. काळे, कुमुदिनी रांगणेकर, म. पां. भावे, सत्त्वशीला सामंत
BOI
Sunday, March 25, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘एकच क्षण भाळण्याचा बाकी सारे सांभाळण्याचे’, ‘आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक’यांसारख्या असंख्य चमकदार अर्थपूर्ण वाक्यांनी ज्यांच्या कथाकादंबऱ्या सजलेल्या असतात असे लोकप्रिय लेखक व. पु. काळे, कादंबरीकार कुमुदिनी रांगणेकर, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा ’हे गोड गीत लिहिणारे कवी म.पां. भावे, आणि भाषातज्ज्ञ सत्त्वशीला सामंत यांचा २५ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी'मध्ये त्यांच्याविषयी...
........
वसंत पुरुषोत्तम काळे 

२५ मार्च १९३२ रोजी जन्मलेले वसंत पुरुषोत्तम काळे हे ‘वपु’ या सुटसुटीत आद्याक्षरांनी अवघ्या मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे साहित्यिक. त्याचं लेखन हे मराठी मध्यमवर्गीय, पांढरपेशी भावविश्वाभोवती फिरत असलं तरी त्यांची तत्त्वज्ञानप्रचुर, हलकीफुलकी, सोप्पी सुभाषितवजा वाक्यं समाजातल्या सर्वच स्तरातल्या लोकांवर विलक्षण मोहिनी टाकणारी असत. 

पेशाने आर्किटेक्ट असणाऱ्या ‘वपुं’नी कथा आणि कादंबरी लेखन तर केलंच पण आकाशवाणी आणि दूरदर्शनसुद्धा आपल्या छोट्या छोट्या प्रहसनांनी गाजवलं. श्रोत्यांवर गारूड घालणारं कथाकथन म्हणजे तर त्यांचा हातखंडा पैलू! त्यांनी आपल्या खास शैलीत १५००हून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम करत आपलं लेखन गावोगावी तर पोहोचवलंच, पण त्यांच्या कथाकथनाच्या ऑडियो कॅसेट्समुळे ते अक्षरशः घराघरात जाऊन पोहोचले होते. त्यांच्या कथांवर एकांकिका, नाटकं आणि सिनेमे निघाले होते. वपु स्वतःही उत्तम अभिनेते होते. 

आपण सारे अर्जुन, भुलभुलैय्या, चिअर्स, दोस्त, दुनिया तुला विसरेल, घर हरवलेली माणसं, ही वाट एकटीची, इन्टिमेट, गोष्ट हातातली होती, पार्टनर, का रे भुललासी, काही खरं काही खोटं, मी माणूस शोधतोय, तू भ्रमात आहासी वाया, ऐक सखे, वलय, बाई बायको आणी कॅलेंडर, चतुर्भुज, गुलमोहर, कर्मचारी, कथाकथनाची कथा, मायाबाजार, नवरा म्हणावा आपला, निमित्त, वन फॉर द रोड, प्लेझर बॉक्स भाग १ आणि २, प्रेममयी, रंगपंचमी सखी, संवादिनी, स्वर, तप्तपदी, ठिकरी, झोपाळा, वपुर्वाई, मोडेन पण वाकणार नाही, रंग मनाचे -अशी त्यांची कित्येक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या बहुसंख्य पुस्तकांमधल्या चमकदार आणि सुभाषितवजा वाक्यांचा संग्रह ‘वपुर्झा’ या नावाने प्रसिद्ध आहे. 

२६ जून २००१ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं. 

(व. पु. काळे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.) 
.........

कुमुदिनी रांगणेकर 

२५ मार्च १९०६ रोजी जन्मलेल्या कुमुदिनी रांगणेकर या कथाकार, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी अनुवादक म्हणूनही स्वतःचं विशिष्ट स्थान निर्माण केलं होतं. अपूर्व साहित्य, हुकमी एक्का, मखमली वल्ली, पत्त्यातली राणी, प्रेमाचा हुकमी त्रिकोण, अनियमित जग, प्रीतीचा शोध, फुललेली कळी, क्षणात वैधव्य, ढगाळलेलं मन - अशी तब्बल २३६ पुस्तकं त्यांनी लिहिली होती.

१७ मार्च १९९९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

(कुमुदिनी रांगणेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

मधुसूदन पांडुरंग भावे

२५ मार्च १९२४ रोजी जन्मलेले मधुसूदन पांडुरंग भावे हे कवी आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्यांनी औट घटकेचा कारभार ’ नावाचं लोकनाट्यही लिहिलं होतं. असा मी काय गुन्हा केला’ ही कादंबरीही त्यांच्या नावावर आहे. मसाला पान, श्रीरामकृष्ण संगीत गाथा, गीत कृष्णायन, भंपकपुरीचा फेरफटका - असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा’ हे आशाबाईनी गायलेलं त्यांचं गीत अफाट लोकप्रिय आहे.

१९ मे २००३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
.......

सत्त्वशीला विठ्ठल सामंत 

२५ मार्च १९४५ रोजी जन्मलेल्या सत्त्वशीला विठ्ठल सामंत या भाषातज्ज्ञ, कोशकार आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. 

व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली, त्रैभाषिक विषयवार व्यवहारोपयोगी शब्दकोश, बोरकरांची समग्र कविता खंड २, शब्दानंद, आहेर - असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि होमी भाभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एक मे २०१३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(सत्त्वशीलासामंत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link