Next
टेबल टेनिसमधील नवे आशास्थान
BOI
Friday, March 16, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

पृथा वर्टीकर

वयाच्या पाचव्या वर्षी सिम्बायोसिसमध्ये पृथाने मधुकर सरांकडे टेबल-टेनिसचे धडे गिरवायला सुरुवात केली, तेव्हाच त्यांना तिच्यातील स्पार्क जाणवला होता. ल मेरीडियन प्लेअर्स करंडक स्पर्धेतून नावारूपाला आलेल्या असंख्य खेळाडूंपैकीच पृथा एक... ‘क्रीडारत्ने’ या सदरात आजचा लेख टेबल-टेनिसपटू पृथा वर्टीकरबद्दल...
...............
भारतात क्रिकेट, टेनिस आणि बॅडमिंटन या खेळांच्या पाठोपाठ कोणता खेळ लोकप्रिय असेल, तर तो आहे टेबल टेनिस. या खेळात भारताने अनेक रथी-महारथी खेळाडू घडवले आहेत. या खेळात अद्याप आपण ऑलिंपिक पदक जरी मिळवू शकलो नसलो, तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे. अशाच खेळाडूंच्या यादीत आता आणखी एक नाव दाखल झाले आहे. ते म्हणजे, पृथा वर्टीकर. 

पृथाने कॅडेट, सबज्युनिअर, ज्युनिअर स्तरावरील आपल्या कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला आहे. भविष्यात तिच्याकडे भारतीय टेबल टेनिसचे आशास्थान म्हणून पाहावे, इतकी तिची कामगिरी नजरेत भरणारी आहे.

कमलेश मेहताभारतात माध्यमांचा फार सुळसुळाट नव्हता, त्या काळात मुख्यत्वे कमलेश मेहता, चेतन बबूर आणि पौलमी घटक यांनी या खेळाला लोकप्रियता मिळवून दिली. आज कोणत्याही खेळाडूने जरा सरस कामगिरी केली, की वृत्तपत्रात रकानेच्या रकाने बातमी छापून येते. शिवाय इलेक्ट्रॉनिक्स मिडीया आहेच चोवीस तास बबलगम चघळायला. ही चंगळ तेव्हा नव्हती. तरीही मेहता किंवा पौलमीने या खेळातही भारताचा दबदबा आहे हे सिध्द केले होते. कमलेश मेहता यांना आता या खेळाचे राष्ट्रीय सल्लागार व निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना या खेळातील योगदानाबद्दल शिवछत्रपती आणि अर्जुन या मानाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले. आठ वेळेस राष्ट्रीय विजेते म्हणून त्यांचा विक्रम आजही अबाधित आहे. मेहता हे राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणूनही काही काळ कार्यरत होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अचंता शरथ कमाल, सौम्यजीत घोष यांसारखे खेळाडू आज आपला ठसा उमटवत आहेत.

पौलमी घटकमहिलांमध्ये हा खेळ लोकप्रिय करण्याचे श्रेय खरे तर पौलमी घटकलाच जाते. पाच वेळा ज्युनिअर राष्ट्रीय विजेती आणि पाच वेळा वरिष्ठ राष्ट्रीय विजेती होताना वयाच्या केवळ सोळाव्या वर्षीच तिने सिडनी ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता. तीन वेळा तिने राष्ट्रीय विजेती बनण्याचाही मान मिळवला. पौलमी आज प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि नवनवीन खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. याच खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन, पुण्याच्या पृथा वर्टीकरनेही राष्ट्रीय आणि पाठोपाठ आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला तर ती अभिमानाची बाब ठरेल, याच दिशेने आज तिची वाटचाल सुरू आहे.

पृथाकडे अफाट गुणवत्ता आहे असा विश्वास तिचे प्रशिक्षक रोहित चौधरी यांनी व्यक्त केला आहे, मात्र त्याच वेळी तिने शारीरिक तंदुरूस्तीबाबत कमालीचे गंभीर असायला हवे, असेही चौधरी यांनी नमूद केले आहे. म्हणजेच आता कॅडेट गटात पृथाला तिच्या जास्त उंचीचा लाभ होत आहे, पण हाच लाभ सबज्युनिअर, ज्युनिअर गटात होईलच असे नाही. आता कॅडेट गटात उंचीमुळे संपूर्ण टेबल तिला कव्हर करता येते, मात्र पुढील वयोगटात उंचीबरोबरच शारीरिक तंदुरूस्तीही टिकवावी लागेल, कारण तिथे तिला अशाच प्रकारच्या खेळाडूंचा सामना करायचा आहे. 

बारा वर्षांखालील गटात ती तिसरी मानांकीत खेळाडू आहे, हेच सातत्य टिकवले तर भारताला एक नैपुण्यवान खेळाडू निश्चितच मिळेल. वयाच्या अकराव्या वर्षी तिने महिला गटात विजेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारी पुण्याची ती पहिलीच खेळाडू ठरली होती. एकवीस वर्षांच्या खेळाडूवर मात करत तिने हे विजेतेपद मिळवले, हीच सर्वात अभिमानाची बाब आहे. इतकी गुणवत्ता या वयात खूप कमी खेळाडूंमध्ये दिसते.  सन्मित्र संघात सराव करताना आज पाचवीत मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकणारी पृथा एक दिवस देशाचेही प्रतिनिधित्त्व करेल असा विश्वास वाटतो.

पृथाला घरातूनच खेळासाठी पाठींबा मिळाला ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कित्येक खेळाडूंचा खेळ हा घरातच कोंडला जातो आणि ‘सो कॉल्ड’ अभ्यासी जगाची आभासी प्रतिमा उभी केली जाते. अशा प्रकारे आपल्या देशात लाखो खेळाडू तयार होण्यापूर्वीच दाबले गेले आहेत. पृथा त्याबाबत नशीबवान ठरली. तिची आई स्वतः राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळली आहे, तर वडीलांनी ‘तायक्वांदो’बरोबरच क्रिकेटमध्येही यश मिळवले आहे. पृथा खरे तर तिच्या मोठया बहिणीकडून प्रेरणा घेत टेबल-टेनिस खेळायला शिकली. मोठया बहिणीने हा खेळ खेळणे सोडून दिले, पण त्याचा वारसा पृथाकडे सोपवला.

वयाच्या पाचव्या वर्षी सिंबायोसीसमध्ये पृथाने मधुकर सरांकडे टेबल-टेनिसचे धडे गिरवायला सुरूवात केली तेव्हाच त्यांना तिच्यातील स्पार्क जाणवला होता. ली मेरीडियन प्लेअर्स करंडक स्पर्धेतून नावारूपाला आलेल्या असंख्य खेळाडूंपैकीच पृथा एक. मात्र ते असंख्य खेळाडू आज कुठे राहीलेत आणि पृथाने किती झेप घेतली आहे, हे अभिमानास्पदच आहे.  प्रत्येक सामना, प्रत्येक स्पर्धा गांभीर्याने खेळण्याचा तिचा गुणच तिला इतर खेळाडूंपेक्षा सरस ठरवतो. सध्या ती सन्मित्र संघात रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आहे. आता तर तिची वर्णी भारतीय संघातही लागली आहे. तिच्यासाठी केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतराष्ट्रीय स्तराची कवाडेही खुली होणार आहेत.

नैसर्गिक गुणवत्ता, घरच्यांचा पाठींबा, सातत्याने व वेळेच्या आधी मिळणारे यश, यामुळे कित्येकदा खेळाडू जमीनीपासून  वर हवेत चालायला लागतात. यश त्यांच्या डोक्यात जाते. असे पृथाच्या बाबतीत होऊ नये यासाठी तिचे प्रशिक्षक व आई-वडील यांनाच सावध राहावे लागणार आहे जेणेकरून तिचे पाय जमिनीवर घट्ट राहतील आणि देशाला एक विनम्र आणि सर्वोत्तम खेळाडू मिळेल. बघू या आता पृथा तिच्या कारकीर्दीचा आलेख कसा उंचावते ते...

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search