Next
‘टाटा पॉवर’ आणि ‘आयडीएफसी’तर्फे मुंबईत डिजिटल सेवा
प्रेस रिलीज
Thursday, June 21, 2018 | 11:17 AM
15 0 0
Share this story

मुंबई : टाटा पॉवर ही उर्जा क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी एकात्मिक कंपनी ‘ई-एनएसीएच’च्या (इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस) माध्यमातून वीजबिलांचा भरणा स्वयंचलित करणारी या क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे. आयडीएफसी बँक ही टाटा पॉवरची या उपक्रमातील तंत्रज्ञान भागीदार आणि मध्यस्त वित्तसंस्था आहेत.

ही नव्या युगातील एक इलेक्ट्रॉनिक ऑनलाइन मान्यता देणारी अशी प्रक्रिया आहे, जी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी कार्यान्वित केली आहे. या प्रक्रियेद्वारे ‘टाटा पॉवर मुंबई’चे ग्राहक आता त्यांच्या वीजबिलांच्या भरण्यासाठी आधार-कार्डाच्या पडताळणीवर ई-साइन करून ऑनलाइन मान्यता देऊ शकतील.

‘ई-एनएसीएच’ या सेवेचा ई-आदेशाद्वारे ऊर्जा क्षेत्रात पहिल्यांदाच होणारा वापर आता ग्राहकांना एक सुखद अनुभव देईल आणि ऑनलाइन नोंदणीसाठी लागणारा वेळही (टर्न अराऊंड टाइम-टीएटी) लक्षणीयरित्या कमी होईल. आता ग्राहक त्यांची मान्यता सहज नोंदवू शकतील आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचे फॉर्म प्रत्यक्षरित्या भरण्याची आवश्यकता नसल्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत सुलभ होईल.

ही आगळीवेगळी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी आणि वैयक्तिक पातळीवर ग्राहकांना तंत्राधिष्ठीत सेवा देऊन ही प्रक्रिया सहजसोपी करण्यासाठी, तसेच एनपीसीआयचे संकेत आणि नियम काटेकोरपणे पाळण्याच्या हेतूने टाटा पॉवरने ‘आयडीएफसी’ बँकेशी हातमिळवणी केली आहे. ‘ई-एनएसीएच’ची अंमलबजावणी टाटा पॉवरच्या प्रयोगशील तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना सतत समाधानकारक सेवा पुरवण्याच्या धोरणाशी अत्यंत पूरक आहे.

या सुविधेविषयी बोलताना टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘वीजबिलांच्या भरण्यासाठी योजलेल्या या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेवेच्या शुभारंभासाठी आयडीएफसी बँकेशी हातमिळवणी करण्यात आम्हाला खूप आनंद आहे. या सेवेमुळे वीजबिल भरणा क्षेत्रात क्रांती होईल आणि ग्राहकसेवा आणि ग्राहकसमाधानाची एक नवी पातळी गाठली जाईल. या सेवेमुळे वीजबिलांचा भरणा ग्राहकांसाठी जलद आणि सुलभ होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांना सहभागी होता येईल.’

आयडीएफसी बँकेच्या होलसेल बँकिंगचे प्रमुख अजय महाजन म्हणाले, ‘वित्तीय सेवांमध्ये यापूर्वी कधीच न गाठली गेलेली पातळी एकाच किंवा अनेक तंत्रांच्या संगमाद्वारे पहिल्यांदाच गाठली जाताना आम्ही पाहतो आहोत. ग्राहकसेवेच्या क्षेत्रात एक मोठा बदल घडवून आणणाऱ्या या सुविधेच्या निमित्ताने टाटा पॉवरशी या संदर्भात हातमिळवणी करणे हा आम्ही आमचा बहुमान समजतो. सुनियोजित अशा प्रणालींच्या या एकत्रीकरणामुळे टाटा पॉवर ही ‘ई-एनएसीएच’चा वापर मूलभूत सेवांच्या बिल भरण्यासाठी करणारी पहिलीच कंपनी ठरली आहे. वीजबिल भरणा करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आता संपूर्णतः कागदविरहित आणि सोपे झाले आहे. या सुविधेद्वारे टाटा पॉवर यांनी ग्राहकांना ‘सुलभताआणि लवचिकता’ यांची भेट दिली आहे.’

‘एनएसीएच’च्या ई-मान्यतेमुळे ग्राहकांना हे फायदे मिळतील : ई-मान्यतेसाठी लागणारा वेळ खूपच कमी होईल. प्रत्यक्ष स्वाक्षरीची गरज नसल्यामुळे आता रद्द होणाऱ्या अर्जांची संख्या कमी होईल आणि त्यासाठी ग्राहकांच्या बँकेवर अवलंबून न राहताही प्रक्रिया जास्त स्वतंत्रपणे राबवली जाईल. आधार कार्डाच्या पूर्व-पडताळणीमुळे ही प्रक्रिया जास्त सुरक्षित होईल. ग्राहकसेवा केंद्रांमध्ये जाण्याची गरज न उरल्यामुळे ग्राहकांसाठी ही प्रक्रिया जास्त सोयीची ठरेल. ग्राहक आता कुठूनही, केव्हाही आणि त्यांच्या सोयीप्रमाणे पाच सोप्या टप्प्यांत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.

‘एनएसीएच’च्या माध्यमातून मान्यतेची नोंदणी करण्यासाठी या बाबींची पूर्तता आवश्यक आहे : ग्राहकाचा आधार क्रमांक त्याच्या बँक अकाउंटशी जोडलेला असावा. ग्राहकाला वन टाइम पासवर्ड म्हणजेच ‘ओटीपी’ देण्यात येणार असल्यामुळे ‘यूआयडीएआय’मध्ये आधार पडताळणीसाठी नोंदणी केलेला त्याचा मोबाइल फोन हाताशी असणे आवश्यक आहे. एनएसीएच ई-मान्यतेसाठी ग्राहकाच्या बँकेची नोंदणी ‘एनपीसीआय’मध्ये केलेली असणे आवश्यक आहे. आजच्या तारखेला ४१ बँका या प्रक्रियेसाठी कार्यान्वित आहेत आणि इतरही बऱ्याच बँकांचा सहभाग अपेक्षित आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link