Next
वाघाच्या बछड्याला हिमा दासचे नाव
जागतिक व्याघ्रदिनी बान्नेरघट्टा प्राणिसंग्रहालयाकडून हिमाचा गौरव
BOI
Tuesday, July 30, 2019 | 04:39 PM
15 0 0
Share this article:

हिमा दास

बेंगळुरू : विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अवघ्या १९ दिवसांमध्ये सलग पाच सुवर्णपदके जिंकणारी भारताची धावपटू हिमा दास हिचे नाव बान्नेरघट्टा प्राणिसंग्रहालयातील वाघाच्या बछड्याला देण्यात आले आहे. हिमाच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संपूर्ण देशाला अभिमान वाटत असून, तिच्या कामगिरीचा गौरव म्हणून जागतिक व्याघ्रदिनाचे औचित्य साधून बान्नेरघट्टा प्राणिसंग्रहालयाने तिचा हा आगळा वेगळा सन्मान केला आहे. 
  


जागतिक व्याघ्रदिनी इथल्या आठ वाघांना प्राणिसंग्रहालयातील सफारी विभागात सोडण्यात आले होते. यात दोन वाघिणी आणि त्यांचे बछडेही होते. यातील एका वाघिणीच्या सहा महिन्यांच्या बछड्याला हिमाचे नाव देण्यात आले आहे. या प्राणिसंग्रहालयाच्या कार्यकारी संचालक वनश्री विपीन सिंग यांनी ही घोषणा केली. 

आसामची ही सुवर्णकन्या तिच्या क्षेत्रात वाघाप्रमाणेच धीट आणि धाडसी आहे. त्यामुळे तिचे नाव वाघाच्या बछड्याला देणे अगदी समर्पक ठरले आहे.
देशात वाघांची संख्या वाढल्याच्या आनंददायी बातमीपाठोपाठ हिमाचे नाव वाघाच्या बछड्याला देण्याची बातमी हा आनंद द्विगुणित करणारी आहे. यामुळे प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढेल, तसेच व्याघ्रसंवर्धनाचा संदेशही दिला जाईल, अशी प्राणिसंग्रहालयाची भूमिका आहे. अलीकडेच या प्राणिसंग्रहालयातील दोन अस्वलांना क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि मिताली राज यांची नावे देण्यात आली होती. 


हिमा दासने २०१८ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिच्या या कामगिरीचा गौरव करत युनिसेफने (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड) अर्थात संयुक्त राष्ट्रसंघ बालनिधी कोशाने बालदिनी (१४ नोव्हेंबर २०१८) तिची यूथ अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती.  

हिमा अत्यंत संवेदनशील व्यक्ती असून, तिला मिळणाऱ्या मानधनातील निम्मी रक्कम तिने आसाम पूरग्रस्त मदतनिधीला दिली आहे. तिच्या या कृतीचेही सर्वत्र कौतुक होत आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search