Next
उमेदवारांचे भवितव्य सीलबंद करणारी कामगिरी ‘लाख’मोलाची
लाखेच्या सहा लाख कांड्‌या आणि चार लाख मेणबत्यांचा होणार वापर
प्रेस रिलीज
Saturday, March 30, 2019 | 01:39 PM
15 0 0
Share this article:

लाखेची कांडीमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची मोलाची कामगिरी बजावायला ‘लाखे’चा वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी सहा नग या प्रमाणे लाखेचे सहा लाख ८१ हजार नग कांडी लागणार आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची निवडणूक काळातील पहिलीच वेळ आहे.

जप्ती असो अथवा कागदपत्रे, पुरावे सीलबंद करायचे असो शासकीय कारवाई असो त्यात ‘लाखे’ची लालभडक मोहोर महत्त्वाची ठरते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानानंतर मतदान यंत्रे व त्याच्याशी निगडित साहित्य मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी ती सीलबंद केली जातात. त्यासाठी मोलाची कामगिरी लाखेकडून बजावण्यात येते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र, मतदारांची नावे व स्वाक्षरी असलेली यादी आदी साहित्य मतदानाची वेळ संपल्यानंतर सीलबंद केली जाते. मतमोजणीच्या दिवशी हे सील काढले जाते.

यापूर्वी कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्यामुळे मतपेटी व इतर साहित्य सीलबंद केली जात; मात्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आल्यानंतर या यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र यांनाही सील केले जाते. मतदान यंत्रे व इतर अनुषंगिक साहित्य सीलबंद करण्याची कामगिरी ही मतदान प्रक्रियेतील ही सर्वात मोठी जबाबदारी असते. हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी आउटर पेपर, ग्रीन पेपर व व्हीव्हीपॅटसाठी पिंक पेपरचा वापर केला जातो. त्यावर लाख लावून सीलबंद केले जाते. यासाठी यंदा प्रत्येक मतदान केंद्रासाठी सहा नग या प्रमाणे राज्यासाठी सहा लाख ८१ हजार ८०० नग लाख मागविण्यात आले आहेत. भारतीय सुरक्षा मुद्रणालयाकडून ही लाख केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राज्याकडे पाठविण्यात येते.

ही लाख वितळवून मतदान यंत्रे सीलबंद केली जातात. ती वितळविण्यासाठीची मेणबत्ती निवडणूक आयोगाकडून पुरविली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वितळविण्यासाठी सुमारे चार लाख ५५ हजार मेणबत्त्यांची मागणी राज्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबरोबर कागदे, पेन्सिल, खोडरबर, शाई आदी साहित्य मोठ्या प्रमाणात मागविण्यात आले आहेत. पुढील पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी कोण होणार याचे भवितव्य मतदान यंत्रात सुरक्षितपणे ठेवण्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत या ‘लाखे’ला मोठे मोल आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search