Next
रत्नागिरीच्या सोनल कांबळेला मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक
BOI
Friday, January 18, 2019 | 12:03 PM
15 0 0
Share this article:

सुवर्णपदक स्वीकारताना सोनल कांबळे

रत्नागिरी :
मार्च २०१८मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. परीक्षेत रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाची विद्यार्थिनी सोनल मिलिंद कांबळे विद्यापीठात सर्वप्रथम आली आहे. त्यामुळे तिला काशिनाथ त्र्यंबक तेलंग सुवर्णपदक मिळाले आहे. मुंबई विद्यापीठात अलीकडेच झालेल्या दीक्षान्त समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि प्रमुख अतिथी नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड रॉबर्टस् यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. 

सोनल मिलिंद कांबळेसोनल महाविद्यालयाच्या प्रथम वर्षापासून समाजशास्त्र विभागाची विद्यार्थिनी असून, तिने विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाला यश मिळवून दिले आहे. महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात तिने कार्य केले असून, अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी केलेल्या समाजप्रबोधनात्मक पथनाट्यातून तिने समाजकार्य केले आहे. सामाजिक संशोधनाची आवड असणाऱ्या सोनलने विविध निबंध स्पर्धांमध्येही यश मिळविले आहे. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

आजपर्यंत महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे १० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. विभागातील विद्यार्थ्यांनी सेट आणि नेट परीक्षेतही सातत्याने सुयश प्राप्त केले आहे. 

गोगट-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी तिचे व समाजशास्त्र विभागाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘समाजशास्त्र विभागाला आदर्श परंपरा असून, या परंपरेनुसार सोनलने संपादित केलेले यश ठळकपणे अधोरेखित करण्याजोगे आहे. केवळ बौद्धिक क्षेत्रातच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आणि स्पर्धामध्ये तिने प्राप्त केलेले यश प्रेरणादायी आहे.’

समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे म्हणाले, ‘दिवंगत संजय जोशी यांच्या अथक प्रयत्नांतून २००४ साली सुरू झालेल्या समाजशास्त्र विभागातील दहा विद्यार्थी गेल्या चौदा वर्षांत गुणवत्ता यादीत चमकले आहेत. मुंबईबाहेरील एखाद्या महाविद्यालयातून एका विषयात दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणे हे संजय जोशी यांच्या प्रेरणेमुळेच शक्य झाले आहे. हे यश त्यांनाच समर्पित करण्यात येत आहे.’ या यशात सहभागी असलेल्या विभागातील सर्व प्राध्यापकांबरोबरच प्रा. सचिन सनगरे यांनी केलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांच्यासह तीनही विभागांचे उपप्राचार्य आणि प्राध्यापक यांनीही सोनलचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

(याच महाविद्यालयाच्या स्वरदा महाबळ या विद्यार्थिनीने यंदाच्या पदवी परीक्षेत मुंबई विद्यापीठाचे संस्कृतचे सुवर्णपदक मिळविले आहे. तिच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search