Next
‘युतीमुळे महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकू’
‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा विश्वास
प्रेस रिलीज
Tuesday, February 19, 2019 | 04:16 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘भारतीय जनता पक्ष (भाजप) व शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक युती करून लढतील,’ असा निर्णय १८ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘भाजप’ राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत जाहीर केला. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा युती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना नेते आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

शाह म्हणाले, ‘शिवसेना हा अकाली दलाप्रमाणे ‘भाजप’चा जुना साथीदार आहे. अनेक बऱ्यावाईट प्रसंगात शिवसेना ‘भाजप’सोबत राहिला आहे. दोन्ही पक्षांची युती सैद्धांतिक आधारावर आहे. मध्यंतरी काही मतभेद झाले होते, पण ते मतभेद दूर झाले असून, त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने लढतील व आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अधिक संख्याबळाने सत्तेवर येईल.’

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आजचा दिवस अत्यंत आनंदाचा असून, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका दोन्ही पक्ष युती करून लढतील. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात ‘भाजप’ २५ व शिवसेना २३ जागा लढवेल. विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर उरलेल्या जागांपैकी अर्ध्या अर्ध्या जागांवर ‘भाजप’ व शिवसेना लढतील. निवडणुकीनंतर राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यावर पदे व जबाबदाऱ्या समान पद्धतीने सांभाळू.’

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी हिताचे अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यानुसार काही निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतून राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी निर्णय घेऊ, पीकविमा योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रारनिवारण केंद्र उघडण्यात येईल, नाणार येथील भूमीपूत्रांचा विरोध ध्यानात घेऊन तेथील प्रकल्पासाठीचे भूसंपादन थांबविण्यात येईल व जेथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तेथे रिफायनरीचा प्रकल्प हलविण्यात येईल आणि मुंबईत ५० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांचा कर माफ करण्यास मान्यता देण्यात येईल. राज्यातील दुष्काळग्रस्त भागात जनतेला दिलासा देण्यासाठी भाजपा शिवसेना नेते संयुक्त दौरे करतील,’ असेही फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेना व ‘भाजप’ एकत्र आल्यामुळे देश व राज्य मजबूत होईल. युतीच्या निर्णयाचे तमाम हिंदू स्वागत करतील. आमचे हिंदुत्वाचे विचार व धोरण एकच असून खुल्या दिलाने व एकमताने आम्ही पुढे जाऊ.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search