Next
प्रदूषणविरहित गणपती विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब्स’चा पुढाकार
BOI
Wednesday, September 11, 2019 | 03:22 PM
15 0 0
Share this article:

लायन्स क्लबच्या प्रदूषण विरहित गणपती विसर्जन उपक्रमाबद्दल माहिती देताना किशोर मोहोळकर, सागर भोईटे व अनिल मंद्रुपकर

पुणे : ‘दहा दिवस आनंदाने आपल्या बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याचे विसर्जन प्रदूषणविरहित व्हावे, यासाठी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी दोन या संस्थेच्या वतीने पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गणपती विसर्जन काळात (दि. ११ व १२ सप्टेंबर २०१९) ‘प्रदूषण विरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३२ लायन्स क्लब सहभागी होणार आहेत,’ अशी माहिती लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या जलप्रदूषण विभागाचे जिल्हाध्यक्ष लायन किशोर मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी लायन सागर भोईटे, अनिल मंद्रुपकर आदी उपस्थित होते.

किशोर मोहोळकर म्हणाले, ‘प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली व किशोर मोहोळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रदूषण विरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून गणपती उत्सव काळात होणाऱ्या पर्यावरण हानीबद्दल जनजागरण करण्यात आले आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील सुमारे आठ हजार पत्रके वाटली असून, पुणे व पिपरी-चिंचवडमध्ये शंभरच्यावर फ्लेक्स लावले आहेत. यात प्रामुख्याने धातूच्या कायम स्वरूपाच्या मूर्ती बनवून घ्या, मूर्ती दान करा असे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक कलरचे तोटे समजावून सांगण्यावर आणि घरच्या घरी मूर्ती विसर्जन करण्याच्या पद्धती यावर भर दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे घरच्या घरी अमोनियम बायकार्बोनेटचा (खाण्याचा सोडा) वापर करुन विसर्जन करणे, अमोनियम सल्फेटचा वापर करून त्याचे खतात रूपांतर करण्याचे प्रात्यक्षिक आणि अमोनियम बायसल्फेटचे घरोघरी व सोसायट्यामध्ये वाटप करून जनजागृती करणे व प्रोत्साहन देणे, यावर भर दिला आहे.’

सागर भोईटे म्हणाले, ‘महानगरपालिकेकडून शंभरपेक्षा जास्त सदस्य असलेल्या सोसायट्यांची यादी घेऊन, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सोसायट्यांमध्ये प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. १३० पोती (प्रत्येक पोत्यात २५ किलो पावडर) म्हणजे तीन हजार २५० किलो सोडियम बायकार्बोनेट पावडर वाटण्यात आली आहे. म्हणजे प्रत्येक घरगुती गणपती विसर्जनासाठी सरासरी एक किलो पावडर वापरली गेली, तर किमान दोन हजार गणेशमूर्तींचे विसर्जन घरातच होईल आणि दोन हजार किलो प्लास्टर ऑफ पॅरिस नदी-तलावात जाणार नाही. परिणामी नदीप्रदूषण कमी होईल. या कामात पन्नासपेक्षा जास्त विदयार्थ्यांनी मदत केली आहे. विसर्जनानंतर ही पावडर हौदात टाकण्यात येणार आहे.’

अनिल मंद्रुपकर म्हणाले, ‘श्री फाउंडेशनच्या सहकार्याने पुण्यातील विविध घाटांवर मूर्ती दान देण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. पुण्यातील राजाराम पूल, निलायम टॉकीज घाट, खराडी येथे पाच गाड्या मूर्ती वाहतुकीसाठी उपलब्ध केल्या आहेत. पुण्यातील व पिंपरी-चिंचवड येथील विविध घाटांवर निर्माल्य गोळा करून त्याचे जागेवरच कंपोस्ट मशीनच्या साह्याने खातात रूपांतर करण्यात येणार आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search