Next
दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
BOI
Wednesday, April 18 | 04:07 PM
15 0 0
Share this story

श्रीमंत दगडूशेठ गणपती, पुणे

पुणे : अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. मूर्तीभोवती केलेली आंब्यांची आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती अशी सारी सजावट अत्यंत लक्षवेधक दिसत होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आंब्याचे प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने हा नैवेद्य अर्पण करण्यात आला. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांच्यासह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. 

तत्पूर्वी पहाटे चार वाजता प्रख्यात गायक संजीव मेहेंदळे यांनी गायनसेवा अर्पण केली. ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘जय शंकरा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘तू सुखकर्ता तू दुखहर्ता’ यांसारखी एकाहून एक सरस भक्तिगीते या वेळी सादर करण्यात आली. अभिजित जायदे (तबला), दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), प्रसाद भांडवलकर (पखवाज) यांनी साथसंगत केली. 

सकाळी आठ वाजता मंदार देसाई आणि कुटुंबीयांच्या हस्ते विशेष गणेशयाग करण्यात आला. विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्या वतीने उटीचे भजनदेखील आयोजित करण्यात आले होते. 

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील जवानांना, कोंढवा येथील बालसंगोपन केंद्रातील मुले आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना देण्यात येणार आहे, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.   

(श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर येथील आंब्यांच्या सजावटीचा  आणि गायक संजीव मेहेंदळे  यांच्या गायनाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link