Next
धीट, हळुवार नि मोकळ्याढाकळ्या प्रेमकथा!
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Friday, March 30, 2018 | 04:59 PM
15 0 0
Share this story

‘मेनका’ हे तसं धीटपणे व्यक्त होणाऱ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ आणि अनेक सिद्धहस्त लेखकांनी आपल्या भावस्पर्शी आणि मुक्त प्रेमाच्या कथा त्या माध्यमातून वाचकांसमोर आणल्या होत्या. मेनका प्रकाशनाने निवडक १४ लेखकांची प्रामुख्याने ६० आणि ७०च्या दशकातली एकेक कथा निवडून अशा १४ कथांचा संच ‘पिंपळपान (भाग ३)’ नावाने प्रकाशित केला आहे. या कथा वाचताना ‘तो’ आणि ‘ती’च्या कधी तरल तर कधी धीट प्रेमाचा आविष्कार आपल्याला स्तिमित करून जातो. त्या पुस्तकाचा हा परिचय...
..............
प्रेम, प्रीती, अनुराग, प्रणय, आलिंगन, बाहुपाश, चुंबन हे सर्व शब्द आणि त्यांचे अर्थ ‘तो’ आणि ‘ती’च्या मधुर नात्यामधले भावसंबंध दर्शवणारे! जेव्हा या शब्दांतून समोर येणाऱ्या भावना एखादी कथा व्यक्त करत असते, तेव्हा वाचकही त्या कथेत वर्णन केलेली प्रेमावस्था आणि भावावस्था त्यातल्या पात्रांबरोबर नकळतच जगत असतो! मेनका प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या १४ कथांच्या संचामधून प्रेमाचे विविध आविष्कार आपल्यासमोर येतात. पिंपळपान (भाग तीन) या नावाने ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्या काळाचा विचार करता, ६० आणि ७०च्या दशकाच्या मानाने त्या कथांची मांडणी, धाटणी आणि अभिव्यक्ती बऱ्यापैकी धीट आणि मोकळीढाकळी होती हे जाणवतं. 

भाषाप्रभू पु. भा. भाव्यांच्या ‘मर्यादा’ या कथेनं संग्रहाचं पहिलं पान आपण उघडतो. सऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळातली ही कथा. भारतात अजून ब्रिटिशांचा अंमल आहे. रायबहादूर हिरालाल वर्मा आपल्या १७ वर्षांच्या देखण्या कन्येला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये सोडायला रेल्वेच्या दुसऱ्या वर्गानं (ब्रिटिशांच्या काळचा) निघाले आहेत. त्यांच्या अतिशय देखण्या कन्येला अर्थातच लोकांच्या बुभुक्षित नजरांना सामोरं जावं लागतंय आणि त्यावरून रायबहादूरसाहेबांची चिडचिड सुरू आहे. आपल्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा वापर करून ते एतद्देशीयांना (मुलीला त्रास देणाऱ्यांना आणि त्रास होणाऱ्या आपल्या मुलीलाही) गप्प बसवतात खरं; पण शेवटी त्या डब्यात घुसलेल्या ब्रिटिश सैनिकाचे बरोबर आणलेल्या अँग्लो इंडियन तरुणीबरोबरचे अश्लील शारीरिक चाळे निमूटपणे सहन करण्यावाचून त्यांना गत्यंतर उरत नाही आणि तिथेच त्यांच्या नीतिमत्तेची आणि वृथा अभिमानाची मर्यादा उघड पडते. भाव्यांनी १९७७ साली लिहिलेली ही कथा त्यांच्या बेधडक शैलीतली आणि त्यांची भाषेवरची हुकुमत दाखवणारी.

नयना आचार्य यांनी त्यांच्या ‘मोनार्क’ या १९७३ सालच्या कथेमध्ये - चित्रकला आणि शिल्पकला शिकणाऱ्या एका मनस्वी मुलीला एका डोंगरात लपलेलं शिल्प पाहायला गेल्यावर एका अनोळखी युरोपियन ट्रेकरबरोबर मुसळधार पावसात गुहेत रात्र काढावी लागते. त्या वेळी तिथे चालू असलेला नाग-नागिणीचा उत्तान प्रणय पाहून, स्वतःवर ताबा न राहून त्या अनोळखी ग्रीक तरुणाबरोबर शरीरसुखाचा अनुभव घ्यावासा वाटतो. पुढे जाऊन त्यांच्यात फुलणाऱ्या नात्याचं धिटाईनं केलेलं वर्णन या कथेमध्ये आहे. 

स्नेहलता दसनूरकर यांच्या १९७४ सालच्या ‘मॅटिनी’ कथेत गावाकडच्या साध्या राहणी असलेल्या स्त्रीने लग्न होऊन शहरात आल्यावर चंगळवादी जीवनशैली स्वीकारण्यासाठी आणि नवऱ्याला प्रमोशन मिळून भरपूर पैसा मिळवण्यासाठी केलेल्या तडजोडीची कहाणी सांगितली आहे. 

बा. भ. पाटील यांच्या ‘ओठी मिठी प्रीत दाटे!’ कथेमधून आपल्या पसंत केलेल्या भावी जोडीदारावर भाळलेल्या, त्याच्या रूपावर मुग्ध झालेल्या आणि लग्न होऊन पुढल्या रोमँटिक क्षणांची स्वप्नं पाहत, त्याची स्टेशनवर वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणीच्या मनाची घालमेल दाखवली आहे. 

हिरा कर्नाड यांनी ‘पारख’ कथेमध्ये आपल्या मुलाने पसंत केलेल्या काळ्यासावळ्या, परंतु आकर्षक मुलीवर आधी सून म्हणून प्रेम न करणारी सासू नंतर हृदयपरिवर्तन होऊन माया करते, त्याची कथा मांडली आहे.

शं. ना. नवरे यांनी एका आश्रमात घडणारी ‘मानसी’ ही प्रेमकथा मांडली आहे. त्या आश्रमात प्रेम, लग्नाचा मोह टाळून सर्वांनी शिस्त पाळून जनसेवेचं व्रत स्वीकारावं असा प्रघात असतो. आश्रमात एक देखणी, आकर्षक तरुणी असते. आश्रमात नव्याने आलेल्या तरुणावर तिचं मन जडतं. त्याची स्थिती दोलायमान होते. प्रत्यक्षात मात्र त्या आश्रमातल्या सर्वांचीच त्या तरुणीवर नजर असते, सर्वांना तिचा मोह असतो. आश्रमाचे आचार्य त्या तरुणावर चिडलेले असतात. पुढे कळतं, की खुद्द आचार्यांनाही त्या तरुणीचा मोह झालेला असतो. अशा वेळी ती तरुणी मात्र ठाम राहून आपल्या प्रेमाचा स्वीकार करते त्याची ही कथा. 

प्रमोदिनी वडके-कवळे यांच्या ‘सवतपान’ कथेमध्ये नवऱ्याने लग्नाआधी आपल्या मैत्रिणीबद्दल स्पष्ट सांगूनही लग्नानंतर तिच्याबद्दल त्याच्या बायकोला वाटणारी असूया आणि तिचा मानसिक कोंडमारा आणि शेवटी सत्य उमगल्यावर तिने घेतलेला निर्णय याची कथा आहे. 

जोत्स्ना देवधर यांच्या ‘रखेली’ कथेमध्ये नवऱ्याने एका असहाय अबलेची सुटका करून तिला कायमचा आधार देण्यासाठी आणल्यावर आणि तिच्याशी नातं ठेवायला सुरुवात केल्यावर बायकोने तिचा केलेला स्वाभाविक दु:स्वास आणि दोघींना सांभाळताना झालेली त्याची ससेहोलपट यांचं वर्णन आहे. 

डॉ. श्रीकांत मुंदरगी यांच्या ‘राँदेव्हू’ कथेमध्ये हिंदू मेडिकल स्टुडंट आणि मुस्लिम तरुणी यांच्या प्रेमाची असफल कथा मांडली आहे. 

हमीद दलवाई यांनी ‘अनामिका’ कथेमधून कथानायकाला हुरहुर लावून गेलेल्या, पैशासाठी शरीरविक्रय करणाऱ्या, पण चांगल्या घरातल्या स्त्रीची कहाणी सांगितली आहे. 

आशा बगे यांच्या १९७६ सालच्या ‘वीज’ कथेमध्ये कॉलेजकाळात उमललेलं, पण अव्यक्तच राहिलेलं प्रेम पुढे अनेक वर्षांनी पुन्हा आयुष्यात आल्यावर होणारी मनाची घालमेल दाखवली आहे. 

पद्माकर ठोंबरे यांच्या ‘रिटर्न व्हिजिट’मध्ये एका सुखवस्तू, पण गुलछबू माणसाच्या आयुष्यात घडणारा प्रसंग आणि त्याला हादरवून सोडणारं ‘रिटर्न गिफ्ट’ मिळाल्याचं वर्णन आहे. स्वतः अनेक तरुणींचा सहवास मिळवणाऱ्या आणि स्त्रीदेहाचा उपभोग घेण्याचा हव्यास असणाऱ्या साहेबाला त्यांचा परदेशातला मित्र भारतात घरी आल्यावर जो धक्का देतो तो त्यांना हलवून सोडणाराच!

अनुराधा गुरव यांच्या १९७३ सालच्या ‘सांवरे कहां लगायी देर’ या कथेमध्ये गावाकडच्या जमीनदारांच्या वाड्यात आलेल्या शहरी पाहुणीचं आणि जमीनदारांच्या मुलाचं प्रेम कसं जमतं त्याची कथा आहे.

चंद्रकांत पै यांच्या ‘प्रेमभंग’  कथेत परस्परसंमतीने दूर गेलेल्या दोन प्रेमी जीवांची कहाणी आहे.

या कथांमध्ये प्रेम आहे. प्रेमाबरोबर येणारा रोमान्स आहे. कुणीतरी कुणामध्ये अडकणं आहे. मनाचे हिंदोळे आहेत. भावनिक चढउतार आहेत. ६० आणि ७०च्या दशकांमधल्या या लेखनातून दिसणारी धिटाई आहे. ‘पिंपळपान’चा हा तिसरा भाग नक्कीच वाचनीय आहे.  

पुस्तक : पिंपळपान   
लेखक : पु. भा.भावे, जोत्स्ना देवधर, शं. ना. नवरे, आशा बगे, स्नेहलता दसनूरकर आणि इतर नऊ लेखक    
प्रकाशक : मेनका प्रकाशन, सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०     
पृष्ठे : १९८   
मूल्य : २५० ₹ 

(‘पिंपळपान’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link