Next
पुण्यात सेंटर फॉर डिफिकल्ट कॅन्सर्सची सेवा उपलब्ध
प्रेस रिलीज
Tuesday, July 17, 2018 | 06:23 PM
15 0 0
Share this story

पुणे : असाध्य कर्करोगाने  ग्रासलेल्या रुग्णाला व्यक्तिसापेक्ष उपचार पद्धती उपलब्ध करून देणारे सेंटर फॉर डिफिकल्ट कॅन्सर्स (सी.डी.सी.) पुण्यात सुरू झाले आहे. नुकतेच त्याचे उद्घाटन अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अनंतभूषण रानडे, डॉ. अमित भट, या केंद्राच्या प्रमुख डॉ. दर्शना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 या केंद्राबाबत अधिक माहिती देताना डॉ. दर्शना पाटील म्हणाल्या, ‘कर्करोग हा जनुकिय म्हणजेच डीएनएमध्ये होणाऱ्या विशिष्ट बदलांमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे एका रुग्णासाठी परिणामकारक ठरलेली पारंपारिक उपचार पद्धती दुसऱ्या रुग्णासाठी गुणकारी ठरेलच असे नाही. अलीकडच्या काही वर्षांमध्ये, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (एन.जी.एस.) सारख्या प्रगत आणि अतिसंवेदनशील तंत्रज्ञानामुळे मानवी कर्करोगांच्या जनुकीय शास्त्राविषयी अधिकाअधिक माहिती उपलब्ध होत आहे. या तंत्रज्ञानामुळे कर्करोगाची जनुकीय पातळीवर माहिती घेऊन कर्करोगतज्ज्ञ व्यक्तीसापेक्ष उपचार करू शकतात. तसेच, रुग्णाच्या जिवंत कर्करोग पेशींचा अभ्यास करून त्यावर परिणामकारक औषधांची प्रयोगशाळेतच निवड करणे आता शक्य झाले आहे. पारंपारिक उपचार पद्धतींच्या काही मर्यादा आहेत. याउलट, व्यक्तिसापेक्ष उपचाराचा दृष्टिकोन रुग्णासाठी कित्येक पटीने प्रभावशाली ठरतो. त्यामुळे त्या रुग्णाला सर्वात प्रभावशाली असणारा उपचार निवडता येऊ शकतो. रुग्णावर होणारा अनावश्यक औषधांचा भडिमार व त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात.’

 ‘प्रिसिजन ऑन्कॉलॉजीद्वारे उपलब्ध होणारी उपचार पद्धती ही पूर्णतः मॉलेक्युलर टेस्टशी निगडीत असून, ती रुग्णाच्या जिवंत कर्करोग पेशी आणि रक्ताच्या नमुन्यावर संशोधन करून दिली जाते. जे कॅन्सर पेशंट कोणत्याही उपचारांना दाद देत नाहीत अशा रुग्णांकरिता संस्थेने यशस्वी उपचार पद्धती उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या कर्करोग रुग्णामध्ये वारंवार उपचार करूनही यश आले नाही किंवा जिथे कॅन्सर पुन्हा निर्माण झाला आहे किंवा थेरपी यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे, अशा पेशंट्सना सी. डी. सी.मार्फत सुचविलेल्या उपचाराद्वारे चांगले यश मिळाले आहे. ज्येष्ठ कॅन्सर तंत्राच्या देखरेखीखाली दिली जाणारी ही उपचारपद्धती जगातील प्रसिद्ध हॉस्पिटल्समध्ये क्लिनिकल चाचण्यांद्वारे सिद्ध झालेली आहे’, असेही पाटील यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link