Next
किस्मत की हवा, कभी नरम कभी गरम...
BOI
Sunday, February 04, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आज चार फेब्रुवारी... मास्टर भगवान ऊर्फ भगवानदादा यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या, भगवानदादांच्या ‘अलबेला’ चित्रपटामधल्या ‘किस्मत की हवा, कभी नरम कभी गरम...’  या गाण्याचा
......
आज चार फेब्रुवारी! मास्टर भगवान यांचा स्मृतिदिन! मास्टर भगवान कोण होते? अभिनेता, निर्माता आणि चित्रपटप्रेमींच्या एका पिढीला ‘पागल’ बनवणारा चित्रपटांचा नायक! १९३१मध्ये जेव्हा सिनेमा बोलू लागला, त्यानंतर जे बोलपट निर्माण होऊ लागले त्यांचे वेगवेगळे प्रकार होते; चित्रपटांच्या ग्रेड होत्या. स्टंटपट म्हणून एक प्रकार होता. आणि सर्वसामान्य चित्रपटप्रेमींना तो प्रकार आवडतही होता. त्या चित्रपटांचा नायक म्हणजे मास्टर भगवान! त्यांच्या चित्रपटात फारसे नावीन्य नसायचे. त्या चित्रपटात दोन उनाड तरुण असायचे ते म्हणजे बाबूराव पैलवान आणि मास्टर भगवान! ते गावातून शहरात यायचे, बदमाषांच्या तावडीत सापडायचे किंवा बदमाषांच्या तावडीत सापडलेल्या नायिकेला किंवा तिच्या बापाला वाचवायचे, त्यासाठी हिकमती करायचे, मारामारी करायचे. दुसऱ्या नायिकेची सोय मैत्रीण किंवा मोलकरीण या स्वरूपात दिग्दर्शकाने करून ठेवलेली असायची. आणि अशा कथानकाच्या चित्रपटाचे नाव कधी ‘बदला’ असायचे, कधी ‘जलन’ असायचे, तर कधी ‘भेदी बंगला’, ‘मददगार’, ‘लालच’ असे असायचे. या चित्रपटांना तुफान गर्दी होत असे. 

या स्टंटपटातील भूमिका हा काही भगवानदादांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश नव्हे. त्यापूर्वी म्हणजे १९३०मध्ये पडद्यावर आलेला ‘बेवफा आशिक’ हा मूकपट मास्टर भगवान यांची भूमिका असलेला पहिला चित्रपट होय! त्यानंतर बोलपट, रंगीत चित्रपट, सिनेमास्कोप, सत्तर एमएमचे चित्रपट अशी त्यांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल झालेली आहे. मास्टर भगवान यांच्या आधी चित्रपटसृष्टीत आलेला नूरमहंमद चार्ली हा विनोदी नट आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी बघून नट बनण्याची प्रेरणा भगवान यांना मिळाली. तसेच त्यांचे दुसरे स्फूर्तिस्थान म्हणजे त्या काळातील दणकट शरीरयष्टीचे मास्टर विठ्ठल! त्यांची चित्रपटातील मारामारी बघून मास्टर भगवानही आपल्या मित्रांबरोबर तशी मारामारी करायचा प्रयत्न करायचे. 

मास्टर भगवान यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांच्या मुलाने चित्रपटात जाऊन नट बनावे असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळेच ‘तू बाकी कोणीही बन, परंतु नट बनू नको,’ असे त्यांनी भगवान यांना सांगितले. ‘रिकामे बसण्यापेक्षा तालमीत जाऊन व्यायाम कर कारण तब्येत धडधाकट हवी,’ या वडिलांच्या सांगण्यावरून ते तालमीत जाऊ लागले. तेथेच त्यांची ओळख वसंतराव पैलवान यांच्याशी झाली. हे वसंतराव तेव्हा चित्रपटातून भूमिका करत होते. त्यांच्या ओळखीने मास्टर भगवान यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला, पण नट म्हणून नव्हे, तर एक कामगार म्हणून! काही दिवस पडेल ते काम करून नंतर १९३०मध्ये ते चित्रपटाचे नायक झाले. १९३७मध्ये ते नटाचे दिग्दर्शक बनले. तो चित्रपट होता ‘बहादूर किसान!’ त्यानंतर ‘क्रिमिनल’ हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताकरिता संगीतकार नौशाद यांनी पियानो वाजवला होता, संगीतकार सी. रामचंद्र यांनी ऑर्गन आणि संगीतकार सज्जाद यांनी मेंडोलियन वाजवले होते. 

‘क्रिमिनल’ चित्रपटानंतर मास्टर भगवान यांना मद्रासच्या चित्रपटांची ऑफर आली. ‘जयकोडी’ ‘वनमोहिनी’ असे काही दाक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर तेथील अनेक चित्रपटांच्या ऑफर्स सोडून मास्टर भगवान मुंबईत परत आले. आता ते मास्टर भगवानचे भगवानदादा झाले होते. दिग्दर्शनातील जाणकार, संगीतातीलही जाणकार! त्यांच्या नावाला वजन प्राप्त झाले होते. शशधर मुखर्जी, गुरुदत्त असे कलावंत त्यांचा सल्ला घेत असत! पुढे भगवान दादांनी ‘जागृती पिक्चर्स’ या स्वतःच्या चित्रपट संस्थेची स्थापना केली. स्टंट चित्रपटांची निर्मिती झाली व त्यानंतर ते ‘सोशल’ चित्रपटांकडे वळले. तो पहिला चित्रपट होता ‘अलबेला!’

या चित्रपटाची यशोगाथा फार मोठी आहे. परंतु या चित्रपटानंतर भगवान दादांनी बनविलेल्या  ‘झमेला’, ‘रंगीला’, ‘भागमभाग’, ‘भला आदमी’, ‘प्यारा दुश्मन’, ‘लाबेला’ यांपैकी एकाही चित्रपटाने ‘अलबेला’सारखे यश मिळवले नाही. त्यांचे व संगीतकार सी. रामचंद्र यांचे मैत्रीचे संबंध होते. ‘अलबेला’ची गाणी त्यांचीच होती. भगवानदादांनी अन्य संगीतकारांकडूनही आपल्या काही चित्रपटांकरिता गणी तयार करून घेतली; पण संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेली ती गीते स्मरणीय ठरली नाहीत. आणि खुद्द सी. रामचंद्र यांनी संगीत देऊनही १९६५नंतरच्या ‘हम दीवाने’ आणि ‘लाबेला’ या चित्रपटांतील गाणी यशाची उंची गाठू शकली नाहीत.

‘लाबेला’ नंतर त्याची चित्रपटनिर्मिती ठप्प झाली. बाहेरच्या चित्रपटांतील लहान-मोठ्या भूमिका ते करू लागले. त्यांनी निर्माता, दिग्दर्शक बनून लाखो रुपये मिळवले व ते खर्चही केले. प्रमुख भूमिका केल्या आणि अखेरच्या काळात अत्यंत छोट्या छोट्या भूमिकाही केल्या. जीवनात लोकप्रियता अनुभवली आणि हेटाळणीही अनुभवली. ‘भगवानचे नृत्य’ ही चित्रपटसृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण बाब होती. नवीन नटांनी ती उचलली. नवीन चित्रपट निर्माते त्यांना त्या नृत्यापुरते मानत होते. रंक ते राव आणि राव ते रंक हेच मास्टर भगवान ऊर्फ भगवानदादा यांच्या जीवनाचे सार सांगता येईल. ते सारे संपवून भगवानदाद चार फेब्रुवारी २००२ रोजी हे जग सोडून गेले.

भगवानदादांचे जीवनचरित्र सविस्तरपणे बघितले आणि त्यावर असा धावता दृष्टिक्षेप टाकला, तरी एकच गोष्ट ठळकपणे जाणवते! कोणती गोष्ट? त्यांच्या जीवनाशी निगडित असणारे त्यांच्यावरच चित्रित झालेले एक गीत ही गोष्ट आपल्याला सांगते. मानवी जीवनातील नियतीचे खेळ राजेंद्रकृष्ण या सिद्धहस्त गीतकाराने काव्यात गुंफले आहेत. संगीतकार सी. रामचंद्र यांनी ते संगीतबद्ध करून गायलेही आहेत. काय म्हणतात भगवानदादा आपल्या १९५१च्या ‘अलबेला’ चित्रपटात

किस्मत की बाते तो किस्मतही जाने

या ओळींनी गीत सुरू होते. कधी काळ्याकट्ट रात्री (अर्थात दु:ख) तर कधी सोनेरी दिवस (अर्थात सुख) (खरेच काय असते हे? का असते हे?) नशिबाच्या या गोष्टी, नशिबालाच ठाऊक (नाही का?)

ओ बेटाजी, अरे ओ बाबूजी 
किस्मत की हवा कभी नरम, कभी गरम 
कभी नरम नरम, कभी गरम गरम 
कभी नरम नरम, नरम - नरम रे, ओ बेटाजी ...

(अरे बाबा नशिबाची खेळी कोणाला सांगता येते का) नशिबाची ही हवा कधी नरम असते, तर कधी गरम असते (कधी सौख्य, तर कधी दु:ख हे असेच असते.)

बडी अकड़से बेटा निकले घर से अॅक्टर होने 
वाह री किस्मत वाह री किस्मत, किस्मत में थे बरतन धोने 
अरे भाई लिखे बरतन धोने 
ओ बेटाजी, जिने का मजा कभी नरम, कभी गरम.....

(अहो बघा की आम्ही) मोठ्या तोऱ्यात, नट बनायचे म्हणून घराबाहेर पडलो होतो, पण काय नशीब आहे बघा, आमच्या नशिबात भांडी घासण्याचे, धुण्याचे काम लिहिले होते (तेच आता करायला लागले आहे) असे आहे बघा.... जीवनाची ही पद्धत कधी नरम, तर कधी गरम असते... (हेच खरे नाही का?)

दुनिया के इस चिडियाघर में तरह तरह का जलवा 
मिले किसी को सूखी रोटी, किसी को पूरी हलवा,
अरे भाई किसी को पूरी हलवा,
ओ बे जी, खिचडी का मजा कभी नरम, कभी गरम....

या जगरूपी प्राणिसंग्रहालयात किती प्रकारांचे दर्शन घडते? (या दुनियेत किती विविध प्रकार असतात नाही का?) कोणाला कोरडी भाकरी खावी लागते आणि कोणाला शिरापुरी खायला मिळते. खरेच ही जीवनरूपी खिचडी कधी गरम असते, तर कधी नरम असते.

दर्द दिया तो थोडा, खुशी भी थोडी थोडी,
वाह रे मालिक, वाह रे मालिक 
दुख और सुख की खूब बनायी जोडी,
अरे वाह खूब बनायी जोडी,
ओ बेटाजी जीवन की नशा कभी नरम, कभी गरम...

या शेवटच्या कडव्यात कवी परमेश्वराला उद्देशून म्हणतो (अरे देवा आम्हाला) तू दु:ख थोडे थोडे दिलेस आणि सुखही थोडे थोडे दिलेस (खरेच हे) परमेश्वरा (मालिक) सुख-दु:खाची तू अजब जोडी बनवली आहेस. (खूप चांगली?) जोडी बनवली आहेस. (खरे की हो, या) जीवनाची नशा कधी नरम असते, तर कधी गरम असते. 

केवळ भगवानदादांच्या जीवनातील घटनांशीच नव्हे, तर आपल्या सर्वांच्या जीवनाच्या आशयाशी साधर्म्य असलेला या गीताचा आशय पाहता अशीही ‘सुनहरी गीते’ हिंदी चित्रपटांच्या खजिन्यात आहेत हे पाहून हिंदी चित्रपटगीतांचा खजिना कसा संपन्न आहे हे दिसून येते.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search