Next
पर्यावरण संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींचा अनोखा निर्धार
निवडून आलेले खासदार राबविणार ‘जेवढीमते तेवढी झाडे’ उपक्रम
BOI
Friday, June 14, 2019 | 03:17 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर विजयी झालेल्या काही खासदारांनी पुढाकार घेत आपल्या मतदारसंघात ‘जेवढी मते तेवढी झाडे’ लावण्याचा अनोखा निर्धार जाहीर करत पर्यावरण रक्षणाप्रती आपली कटिबद्धता जाहीर केली. या सर्व खासदारांचे अभिनंदन करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व लोकसभा-राज्यसभेच्या खासदार, तसेच आमदारांना अशा पद्धतीने वृक्ष लावण्याचे आवाहन केले आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘जेवढी मते तेवढी झाडे’ या संकल्पांतर्गत मतदारसंघात सहा लाख झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा दूत होण्याचे ठरवले आहे. त्यांच्याप्रमाणेच राहुल शेवाळे यांनीदेखील ‘प्लांट अ होप’ नावाने मिळालेल्या मतांएवढी म्हणजे चार लाख २४ हजार ९१३ झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले आहे.

वातावरणीय बदल, दुष्काळ, पाणी संकट अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनी माणसांसमोर आव्हान निर्माण केले असताना त्याला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये वृक्षलागवड हा सर्वाधिक  प्रभावी पर्याय असल्याचे जागतिकस्तरावर मान्य झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने लोकसहभागातून ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतले आहे. मागील वर्षात राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची दोन कोटी ८२ लाख रोपे लावून, चार कोटी वृक्षलागवडीची पाच कोटी ४३ लाख रोपे लावून, तर १३ कोटी वृक्षलागवडीची १५ कोटींहून अधिक रोपे लावून पूर्तता झाली आहे.

‘लोकसहभागातून दर वर्षी साजऱ्या होणाऱ्या या वृक्षोत्सवात या वर्षी आपल्या सर्वांना मिळून ३३ कोटी वृक्ष राज्यात लावायचे आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून दुष्काळाला हद्दपार करताना सुजल आणि हरित महाराष्ट्राची वाटचाल यशस्वी होणार आहे. जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत होणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेत समाजातील सर्व घटक सहभागी होणार आहेत. सर्व लोकप्रतिनिधींनी आतापर्यंतच्या वृक्षलागवड कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहेच; परंतु या वेळेस काही खासदारांनी सुरू केलेला ‘मतांएवढी रोपे’ हा उपक्रम वृक्षलागवडीच्या वाटचालीला अधिक सशक्त करणारा आहे. इतर खासदार, आमदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी वृक्षलागवडीच्या मोहिमेचे अशाप्रकारे नेतृत्व करावे आणि ३३ कोटी वृक्षलागवडीचे ‘वृक्ष धनुष्य’ उचलण्यात योगदान द्यावे,’ असे आवाहन वनमंत्र्यांनी सर्व खासदार-आमदारांना पाठवलेल्या पत्रातून केले आहे.

‘जी व्यक्ती, संस्था राज्यात वृक्षलागवड करू इच्छिते त्या सर्वांना ‘मागेल त्यांना रोपं’ योजनेतून रोपं मिळणार आहेत. कोणत्या प्रजातीची रोपे कुठे लावायची याचे वन विभाग मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने आता या वृक्षोत्सवात सहभागी व्हावे आणि पर्यावरण रक्षणाप्रतीचे आपले दायित्व पार पाडावे,’ असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search