Next
‘गांधी के अधुरे सपने’ विषयावरील व्याखानाचे आयोजन
BOI
Tuesday, January 29, 2019 | 05:52 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘लोकायत सोशलिस्ट पार्टी’तर्फे प्रजासत्ताक दिन आणि हुतात्मा दिनानिमित्त ‘जवाहरलाल नेहरू’ विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक मनिंद्रनाथ ठाकूर यांचे ‘गांधी के अधुरे सपने’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी, ‘आज जगाला खऱ्या अर्थाने कशाची गरज आहे, तर ती गांधी विचारांची’, असे मत प्रा. ठाकूर यांनी मांडले. 

रविवारी (२७ जानेवारी) येथील पत्रकार संघाच्या सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘गांधी आजही तितकेच प्रासंगिक आहेत, कारण आजच्या अनेक समस्यांची उत्तरे आपल्याला गांधींजवळ सापडतात. जे मानवमुक्तीसाठी प्रयत्न करतात, त्यांचे कार्य नेहमीच अपूर्ण राहते’, असे सांगत प्रा. मनिंद्रनाथ ठाकूर यांनी महात्मा गांधींच्या अर्धवट राहिलेल्या अनेक स्वप्नांवर प्रकाश टाकला. 

‘महात्मा गांधीनी त्यांच्या आयुष्यात कोट्यवधी लोकांचा विश्वास संपादन केला होता. गांधींच्या मनात लोकांबद्दल अपार प्रेम होते. त्यांनी लोकांमध्ये ब्रिटीशांविरोधात लढण्याची हिंमत जागवली. आज लोकांचा एकमेकांवरील विश्वास उडत आहे. आत्मकेंद्रिता वाढत आहे आणि त्यातून हिंसा जन्म घेत आहे. अशा वेळी लोकांमध्ये आपापसांत विश्वास निर्माण करणे, हे त्यांचे अर्धवट राहिलेले एक स्वप्न आहे. तसेच त्यांनी धर्माला नेहमीच मानवतावादी नजरेतून पहिले. त्यांना कोणत्या एका धर्मात बसवणे शक्य नाही. धर्माला परिवर्तनाचे साधन बनवले पाहिजे, नाहीतर धर्म ही एक वर्चस्ववादी व्यवस्था बनून राहील असे गांधीजी म्हणत होते. गांधींची लढाई ही अशा परिवर्तनशील धर्मासाठी होती आणि असे परिवर्तनशील धर्म हेदेखील त्यांचे अर्धवट राहिलेले एक स्वप्न आहे’, असे ठाकूर यांनी नमूद केले. 

गांधीजींच्या तिसऱ्या स्वप्नाबद्दल बोलताना मनिंद्रनाथ ठाकूर म्हणाले, ‘आज आपल्यासाठीचे निर्णय आपण नाही, तर ही भांडवली व्यवस्था घेते. वाढत्या चंगळवादामुळे लोकांचे स्वतःवरील नियंत्रण कमी होत चालले आहे. चंगळवादाविरोधातील लढाई हे गांधीजींचे एक अपूर्ण राहिलेले कार्य आहे. तसेच आजुबाजूच्या झगमगाटाने न डगमगता लोकांनी आत्मविश्वासाने निर्णय घेतला पाहिजे. स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा समाज गांधींच्या स्वप्नातील समाज होता आणि त्यालाच ते स्वराज्य म्हणायचे. राजकीय सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी सर्वसामान्य लोकांनी स्वतःला संघटित करून शासनाला नियंत्रित केले पाहिजे, असे गांधींचे एक स्वप्न होते. आज हिंसा आणि व्यापक नरसंहार करण्याची माणसाची क्षमता वाढते आहे. त्यातून एकूण साऱ्या मानवी अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा वेळी हिंसेने नाही, तर संवादातून मार्ग काढण्याची गरज आहे. हेच गांधींचे वैश्विक स्वप्न होय आणि म्हणूनच आज जगाला कुणाची सर्वात जास्त गरज असेल, तर ती गांधींची आहे’, अशा शब्दांत मनिंद्रनाथ ठाकून यांनी महात्मा गांधींच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांवर प्रकाश टाकला.  

जाती-धर्माच्या नावावर कसलाही भेदभाव नसलेला समतावादी समाज बनवणे हे गांधींचे एक अर्धवट राहिलेले स्वप्न आहे, असे ते म्हणाले. गांधी फक्त वाचून किंवा चर्चेतून समजणार नाहीत, तर त्यासाठी गांधींच्या स्वप्नांना आपली स्वप्ने बनवून जगण्याची गरज आहे. गांधीजी हे शांतीचे नाही, तर संघर्षाचे दूत होते. आज गांधी-भगतसिंग-आंबेडकर यांच्यात वाद निर्माण न करता संवाद निर्माण करून पुढे जाण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 

व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी श्रोत्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘जनता’ या समाजवादी साप्ताहिकाचे संपादक नीरज जैन म्हणाले, ‘ज्या माणसाने जगाच्या सर्वांत मोठ्या अहिंसक जनआंदोलनाचे नेतृत्व केले, आज दुर्दैवाने त्याच्याबद्दल आपण खूप कमी जाणतो. म्हणूनच भारताला मिळालेल्या गांधी नावाच्या अमूल्य ठेव्याला समजण्यासाठी हे व्याख्यान आयोजित केले होते.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘लोकायत’च्या संयोजक अलका जोशी यांनी केले. या वेळी ‘लोकायत कला पथका’ने गाणी व नृत्य सादर केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link