Next
एक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...
BOI
Saturday, April 14, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

शेषनाग तलाव
एक पाऊल टाकणंही अशक्यप्राय झालं होतं. काही अंतर पार करून गेल्यावर दुरून शेषनागचे लंगर, गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला; पण तितकं अंतर चालणं या जन्मात शक्य नाही असं वाटत होतं. पुन्हा काठी टेकवत चालत गेलो. बस्स.. आता एक पाऊलही नाही टाकू शकणार हे कळलं... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा चोविसावा भाग.. 
......................................
समोर पहाडांनी वेढलेला शेषनाग तलाव होता. नीट निरखून बघताना बर्फाच्छादित पहाडांतून सतत पाण्याचा स्रोत निघतोय हे दिसत होतं. त्यातूनच तलावाची निर्मिती झाली होती. त्याच तलावातून एक पाण्याचा स्रोत बाहेर निघत होता, तीच लीडर नदी. मी पहिल्यांदाच जीवनात हिमालयातून होणारा नदीचा उगम बघत होतो. अगदी छोटा प्रवाह पुढे दऱ्या-खोऱ्यांतून खाली जात मोठा होत शेवटी झेलमशी संगम होत, तिच्यात विसर्जित होत तिथून झेलममय होऊन पुढचा प्रवास ती करते.

मी अत्यंत वाईट प्रकारे थकलो होतो आणि छातीत भयंकर वेदना होत होत्या. श्वास घेता येत नव्हता. अर्धवट श्वास घेत छातीला हाताने थोडा दाब देत चालत होतो. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या प्रचंड निसर्गसौंदर्याचा मला फारसा आस्वाद घेता येत नव्हता. मी रस्त्याच्या कडेला जरा झोपलो. लोक जात होते. छातीत खूप वेदना होत होत्या. पण त्याजागी असं पडून राहणं धोक्याचं होतं. यातून काहीही मिळणार नव्हतंच. वेळ वेगाने जात होता. थोड्याच वेळात अंधार पडणार होता. शेषनाग बेस कँप तिथून दोन किमीवर होता. मी पुन्हा शक्ती एकवटून उठलो. पुन्हा अप्रतिम शेषनाग तलाव बघता येईल का माहिती नव्हतं, कारण दुसऱ्या दिवशी पुढे जायचा रस्ता वेगळा होता. त्यामुळे तशाही अवस्थेत मोबाईल कॅमेराने काही फोटो काढले. सेल्फीज काढण्याचा कुळाचार पूर्ण केला.

अभिजित पानसेएक पाऊल टाकणंही अशक्यप्राय झालं होतं. काही अंतर पार करून गेल्यावर दुरून शेषनागचे लंगर, गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला; पण तितकं अंतर चालणं या जन्मात शक्य नाही असं वाटत होतं. पुन्हा काठी टेकवत चालत गेलो. बस्स.. आता एक पाऊलही नाही टाकू शकणार हे कळलं. पुन्हा तिथेच खाली मान करुन अर्धवट श्वास घेत छाती दाबत बसलो. घोडेवाले जात होते. समूहाने काही लोक पायी येत होते. मला वाटत होतं, फक्त माझाच स्टॅमिना कमी झालाय. 

तिथे मला सगळ्यात जास्त त्रास होता, तो म्हणजे प्राणवायूची कमतरता. त्यामुळे छाती दुखत होती. तेव्हा मात्र हे कारण आहे हे माहिती नव्हतं. ही सर्व ‘ऍक्युट माउंटेनिअरिंग सिकनेस’ची लक्षणं होती. त्यामुळे काळजी वाटत होती. मला आठवलं, शेषनागला वैद्यकीय सुविधा असणारच. तिथे काहीतरी करता येईल. औषधी मिळतील. अगदी उरला-सुरला त्राण एकवटून मी चालत गेलो. 

लंगर आणि तंबूस्थानाकडे जाण्याचा रस्ता पुन्हा वळणावर होता. खाली नदीचा एक मोठा प्रवाह, झरा वाहत होता. त्यावरून जायला एक पक्का लाकडी पूल होता. तो पूल पार करून पलीकडे जाणं म्हणजे वैद्यकीय सुविधा मिळून आयुष्य टिकवणं होतं. तो पूल कसातरी पार केला. समोर स्वागत करणारी मोठी कमान होती. काही पावले चालून गेलो. आत खूप लोकांची गर्दी होती. तंबूसाठी लोक विचारत होते. मला आधीच मुळात उशीर झालेला. त्यात मी तेव्हा एकटा असल्याने तंबू मिळताना अडचणी होण्याची शक्यता खूप जास्त होती. संध्याकाळ होत होती. मला उभं राहण्याचेही त्राण नसल्याने प्रथम मेडिकल कँपमध्ये जाणं महत्त्वाचं होतं.

समोरच मेडिकल कँप होता. मी आत गेलो. तिथे आधीच काही लोक रांगेत उभे होते. दहा मिनिटे थांबलो. मग मागे एका बाकावर जाऊन बसलो. आत काही जणांना श्वासाचा त्रास होता, त्यांना प्राणवायू दिला जात होता. कोणाचा रक्तदाब वाढला होता. कोणाला मळमळ.. एकेक रुग्णाची विचारपूस करून उपचार दिले जात होते. मी बाकड्यावर बसल्याने रांगेत नव्हतो. असंच बसून राहिलो, तर आपला नंबर लागणारच नाही आणि उशीर होऊन बाहेर तंबू मिळेल की नाही याची काळजी वाटत होती.

पुन्हा रांगेत लागलो. एकदाचा नंबर लागला. त्यांनी कुठून आलात वगैरे प्रश्न विचारले. ब्लड प्रेशर तपासलं. ते अगदी नॉर्मल होतं. त्यांनी सांगितलं, की हा उंचीवरील त्रास आहे. काही औषधं दिली. मी तिथून बाहेर आलो. आता सगळ्यांत महत्वाचं होतं, ते तंबू मिळवणं. लोक विचारायला यायचे, पण एकटा म्हटल्यावर ते थांबायला सांगायचे. आजूबाजूला जेवणाची चंगळ होती. मला मात्र खाण्याची कणभरही इच्छा नव्हती. खूप मळमळत होतं.
तेवढ्यात एका यात्रेकरूने आवाज दिला...


(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link