Next
एकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती
BOI
Thursday, April 19, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

चित्रकार रझा यांनी विद्यार्थ्यांना दिलेला हाच तो संदेश

चित्रकार एस. एच. रझा
यांनी १९९१-९२मध्ये पहिल्या पुणे भेटीत अभिनव कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एक चित्र काढलं होतं. त्यामध्ये ‘एकाग्रता’ असं खास रझा पद्धतीच्या हस्ताक्षरात नोंदवलं होतं. लहानशा पांढऱ्याशुभ्र कॅनव्हासवर त्यांच्या खास पद्धतीचं ‘बिंदू’ नामे ‘वर्तुळ’ रंगवलेलं होतं आणि ‘एकाग्रता’ असं तांबूस रंगात लिहिलं होतं. ही कलाकृती आजही अभिनव कला महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहे. कलेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एकाग्रता’ यासारखा दुसरा योग्य संदेश तो काय?... ‘स्मरणचित्रे’ सदरात आज पाहू या चित्रकार रझा यांच्या त्या पुणे भेटीची गोष्ट...
.............
रझा हे तेव्हा भारतीय समकालीन चित्रकारांमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार होते, कला क्षेत्रातील सेलेब्रिटी होते. १९५४पासून त्यांचा मुक्काम पॅरिसला असूनही भारतात त्यांचा मित्रवर्ग, शिष्यवर्ग व चाहता वर्गही मोठा होता. त्यांच्या ज्या पहिल्या पुणे भेटीत त्यांनी ‘एकाग्रता’ हे चित्र रंगवलं होतं, त्या भेटीची ही कथा... त्याचं असं झालं, की १९९१-९२च्या सुमारास कला महाविद्यालयातल्या रवी कुंटे या विद्यार्थ्याने शेवटच्या वर्षाला चित्रकार सय्यद हैदर रझा यांच्यावर प्रकल्प करावयाचं निश्चित केलं. त्यानं चित्रकार विजय शिंदेंकडून त्यांचा पॅरिसचा पत्ता मिळवला व सरळ रझांना पत्र लिहिलं. 

रझा खरोखरच सज्जन गृहस्थ होते. त्यांनी पत्राचं उत्तर तर दिलंच दिलं. परंतु त्याबरोबर दोन-तीन कॅटलॉग पाठवून दिले. रझांच्या या साहित्यामुळे कुंटे आनंदला आणि त्यानं पुन्हा आभाराचं पत्र पाठवलं. इंटरनेट सेवा सहज उपलब्ध नसलेला तो काळ असल्याने माहिती मिळत असे ती प्रसिद्ध झालेल्या कॅटलॉगद्वारे. आभाराच्या पत्रालाही उत्तर म्हणून रझांचं पत्र आलं. त्यांचं चित्रप्रदर्शन मुंबईत ‘एनसीपीए’मध्ये होत असून, तिथं प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी सकाळी ११ वाजता प्रदर्शनस्थळीच भेटीचं आमंत्रण त्यांनी दिले. रवी कुंटेला आनंद झाला खरा. परंतु एकटा जाण्यास तो धजावत नव्हता. मी व राजू सुतार रझांना भेटण्यास उत्सुक होतोच. शेवटी तिघांनी जायचं ठरलं. (एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट हा टाटा ट्रस्टचा उपक्रम असून, तिथं समकालीन कलासंग्रह व कलादालन आहे.) 

पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाला १९९१-९२च्या सुमारास दिलेल्या भेटीदरम्यान चित्रे पाहताना ज्येष्ठ चित्रकार एस. एच. रझा. सोबत इंद्रमल बोराणा, केदार दामले, नितीन हडप, रवी कुंटे आदी विद्यार्थी.

ठरल्या वेळेला आम्ही ‘एनसीपीए’च्या गेस्ट हाउसवर पोहोचलो. बेल वाजवली. प्रसन्न मुद्रेनं रझांनी स्वतःच दार उघडून आमचं शब्दश: सहर्ष स्वागत केलं. आम्हा सर्वांना ती अत्यंत उत्साही आणि आनंदी सकाळ वाटत होतीच होती. परंतु रझाही तितकेच खुशीत होते. त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं आणि पहिला प्रश्न विचारला. ‘पिकासोचा जन्मदिन कोणता?’ आम्ही लगेच उत्तर दिलं, ‘२५ नोव्हेंबर.’ आम्हाला हा प्रश्नही अनपेक्षित होता आणि उत्तरही त्यांना बहुधा अनपेक्षित असावं... मग तर ते एकदम रंगात आले. कला महाविद्यालयातली तिसऱ्या-चौथ्या वर्षाची पोरं पिकासोचा जन्मदिन लक्षात ठेवतात, म्हणजे त्याची कला अभ्यासण्याचा प्रयत्न तर यांनी केलाच असावा, असा काहीसा कयास रझांनी बांधला असावा. पुढे गप्पा रंगल्या त्या जवळजवळ दोन तास. रवी कुंटेची प्रकल्पासंदर्भातली प्रश्नोत्तरं विचारून झाल्यावर आम्ही केलेलं दृश्यकलेतले प्रयोग त्यांना फोटोद्वारे दाखवले. एका मोठ्या आकाराच्या (साधारणत: आठ फूट बाय पाच फूट) नळीच्या पत्र्यावर मी तेव्हा येणाऱ्या इन्स्टंट फोटोंच्या फोटोफ्रेम लावल्या होत्या. त्यावर इनॅमल रंगाने रंगवलं होतं. ते थोडं जाळलं होतं. एकूणच रॉबर्ट रॉश्चनबर्ग या अमेरिकन कलावंताच्या फोटोत पाहिलेल्या कलाकृतींच्या प्रभावातून हा प्रयोग मी तेव्हा केला होता. काहीशी अमूर्त स्वरूपाची, परंतु अवकाशातली जणू निसर्गचित्रं, अशा मिश्र स्वरूपात काढलेल्या जलरंग व तैलरंगातली चित्रं दाखवली. (तेव्हा मी तैलरंगामध्ये रबर सोल्युशन मिसळून चित्रं काढत असे.) राजू सुतारनं त्याची तैलरंगातली अमूर्त चित्रं दाखवली. पुण्यातल्या आमच्या इन्फॉर्मल ग्रुपच्या नाना स्वरूपाच्या लहानसहान चळवळी व उपक्रमांबद्दल त्यांना सांगितलं. या सगळ्यामुळे रझा फार प्रभावित झाले. त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, ‘हे सगळं पाहून मला आमच्या तरुणपणीच्या प्रोग्रेसिव्ह ग्रुपची फार आठवण होतेय. आम्हीही असंच ग्रुपनं काम आणि प्रयोग करत असू.’ मग आम्ही त्यांना पुण्यात येण्याबाबत विचारलं, तेव्हा त्यांना त्यांचे गुरू व कलाशिक्षक केळकर यांना भेटण्यासाठी अहमदनगरला जायची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही म्हणालो, ‘पुण्यातून जाता येईल.’ शेवटी त्यांनी ‘संध्याकाळी प्रदर्शनाचं उद्घाटन आहे. त्यासाठी थांबा,’ असं सांगून बरोबर सहा वाजता यायला सांगितलं.

प्रदर्शन केमोल्डच्या केकू गांधी व सेरिननं आयोजित केलं होतं. उद्घाटनाला रझांचे मित्र बाळ छाबडा, लक्ष्मण श्रेष्ठा, सुनीता श्रेष्ठा, ज्ञानेश्वर नाडकर्णी वगैरे मंडळी सहकुटुंब होतीच होती. परंतु प्रमुख पाहुणे म्हणून जे. आर. डी. टाटा स्वतः उपस्थित होते. टाटांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केलं. लहानशी पार्टी झाली. रझांनी पुण्यात येण्याचं नक्की करून आम्हाला निरोप दिला. मग पुढे विजय शिंदे, सुजाता बजाज, राजन पेंढारकर, मुरलीधर नांगरे, सुधाकर चव्हाण इत्यादींनी एकत्र येऊन रझांना पुण्याला आणून व पुढे नगरला नेऊन पुन्हा मुंबईला नेण्याचं आयोजन केलं. रझांना घ्यायला आम्ही पुणे स्टेशनवर उत्साहात हजर होतो. चित्रकार विजय शिंदेंच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. ‘रझा! रझा!’ करून ते गाडी स्टेशनात घुसल्यापासून रझांना हाका मारू लागले. नांगरेदेखील उत्साहात होते. पुष्पहार घालून नांगरेंनी त्यांचं स्वागत केलं. 

चित्रावर चर्चा करताना ज्येष्ठ चित्रकार एस. एच. रझा आणि सोबत पांडुरंग ताठे, महेंद्र बोराणा, राजू सुतारदुसऱ्या दिवशी रझांनी अभिनव कला महाविद्यालयाला भेट दिली. चित्रं दाखवण्यास सगळे उत्सुक होतो. अविनाश थोपडे, वैशाली ओक, राजू, रवी कुंटे, पांडुरंग ताठे व मी असे आम्ही आपापली चित्रे वर्गात प्रदर्शनासारखी मांडली होती. रझांनी त्यावर आपले विचार प्रकट केले ते चित्र खूप वेळ व गांभीर्याने पाहून. माझ्या उजव्या हाताचे बोट जाड आहे, त्यामुळे माझ्या चित्रात एक प्रकारचा बोल्डनेस आहे.... इतक्या खोलवर जाऊन त्यांची प्रत्येकाच्या चित्राची मीमांसा केली होती. मग त्यांचं प्रात्यक्षिक झालं. या प्रात्यक्षिकात त्यांनी कॅनव्हासवर क्रिम्झन रंगाl चित्र केलं. शांतचित्तानं केलेल्या या चित्रावर त्यांनी लिहिलेला शब्द विद्यार्थ्यांसाठी आणि भावी पिढ्यांसाठी जणू महत्त्वाचा संदेशच होता. तो शब्द होता... ‘एकाग्रता!’

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(चित्रकार रझा यांचं २३ जुलै २०१६ रोजी नवी दिल्लीत निधन झालं. त्यांनी तरुण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेल्या रझा फाउंडेशनच्या http://www.therazafoundation.org या वेबसाइटवर रझा यांच्याबद्दलची अधिक माहिती उपलब्ध आहे.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
किरण भिकन भुजबळ About 340 Days ago
मस्तं लिहीलंय
1
0

Select Language
Share Link