Next
आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी...
BOI
Monday, November 05, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोदिवाळीत केलेला व्यवसाय हा आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ कसा ठरला, याबद्दल लिहीत आहेत बोरीवलीचे नितीन जोगळेकर...
........
आमचे मुंबईत राहणारे कुटुंब. ही १९९५-९६च्या सुमाराची आठवण आहे. मी साधारण १८-१९ वर्षांचा असेन. आई-वडील बदलीनिमित्त मुंबईबाहेर राहायला गेले होते. मग मी तेरावीत विज्ञान शाखेला आणि मोठा भाऊ अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला. तेव्हा भेट झाली, की वडील दोन-तीन महिन्यांचे पैसे आम्हांला देऊन ठेवत. त्या वर्षीच्या दिवाळीत आम्हा भावंडांना सहजच वाटले, की व्यवसाय करावा. परंतु भांडवल? मग वडिलांनी पुढच्या दोन-तीन महिन्यांचे घरखर्चासाठी दिलेले पैसे वापरून फटाके, फराळ आणि दिवाळी अंक यांचा व्यवसाय करायचा असे ठरवले. दोघांमध्ये प्रत्येकी किमान १०० ग्राहकांचे टार्गेट ठेवले आणि पाहता पाहता ते शिवधनुष्य आम्ही पेलले. अगदी, ‘कोण म्हणते मराठी माणसाला धंदा जमत नाही,’ या आविर्भावात. 

आम्हाला व्यवसाय करायचा होता अन् नफाही कमवायचा होता. दिवाळी अंक मध्यमवर्गीय माणसे विकत घेतातच. आम्हांला त्यावर ३३ टक्के सवलत मिळत होती. आम्ही ग्राहकांना १५ टक्के सवलत द्यायचे ठरवले. आम्हाला १०० रुपयांचा अंक ६७ रुपयांना मिळत होता. तो आम्ही ग्राहकांना ८५ रुपयांना द्यायचा, असे ठरवले. फराळाच्या पदार्थांचे कंत्राटही आम्ही एका चांगल्या गृहिणीला देऊ केले. लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा हे पदार्थ सर्व जणच करतात. त्यामुळे आम्ही त्या पदार्थांवर फोकस न करता अनारसे, चिरोटे, कडबोळी, शंकरपाळे (तिखट, खारट अन् गोड) असे ऑफ-बीट पदार्थ जास्त प्रमाणात केले आणि विकले.

आता विषय होता फटाक्यांचा. फटाके विकण्यात अगदी १०० टक्के नफा आहे. हे ठाऊक होते. फक्त तो माल साठवायचा प्रश्न होता. आमचे घर म्हणजे दोन खोल्यांचे. फराळ, फटाके अन् दिवाळी अंक यांनीच ते भरून गेले. विशेष म्हणजे ते फटाके आम्ही ठाकरे बंधूंनाही विकले. त्यांची अन् आमची प्रत्यक्ष ओळख नव्हती. मग एका शाखाप्रमुखाच्या माध्यमातून त्यांची भेट घेतली. त्यांनी आमच्याकडून फटाके विकत घेतले, हे समजल्याबरोबर अनेक शिवसैनिकांनी आमच्याकडून फटाके घेतले. 

हा सगळा आटापिटा करताना खूप मेहनत केली; मात्र या काळात अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. समाधान एकच होते, की हरलो नाही. बुडलो नाही. यशस्वीरीत्या व्यवसाय केला. आता एप्रिलपर्यंत वडिलांनी पैसे पाठविले नाहीत तरी चालेल, अशी परिस्थिती होती. भांडवल तर सुटलेच. युद्ध जिंकलेल्या विजयी वीराप्रमाणे दिवाळी अंक, फराळ घेऊन आई-वडिलांच्या बदलीच्या गावी गेलो. उरलेले फटाके मित्रांना असेच वाटून टाकले. त्यातले काही दिवाळीच्या आधीच आम्ही उडवले; मात्र गेल्यावर लगेचच आईला आमचे प्रताप सांगितले. आईने कौतुकही केले; पण अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चिंताही व्यक्त केली.

सायंकाळी वडील कामावरून घरी आले. त्यांना आमचे हे प्रताप समजल्यावर ते भयंकर चिडले. त्यांनी रागावून आमच्या एक-एक कानाखालीच वाजवली. ‘कोणी सांगितले होते तुम्हाला हे धंदे..’ असे म्हणून ते ओरडलेही. ‘हे तुमचे अभ्यासाचे दिवस आहेत. आता फक्त अभ्यास करा...’ त्यांनी सुनावले; पण तो पत्थरदिल बाप नव्हता. रात्री जेवायच्या आधी त्यांनी आम्हाला कुशीत घेतले. इतक्या मोठ्या मुलांना थोबाडीत मारली म्हणून माफीही मागितली. 

यथावकाश आमचे शिक्षण पूर्ण झाले. आणि आम्ही नोकऱ्या शोधल्याच नाहीत. सरळ व्यवसायात उतरलो. धंद्याचे बाळकडू, त्यातले अनुभव आम्हाला त्या दिवाळीतच मिळाले होते. ती दिवाळी हा आमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता...

संपर्क : नितीन मनोहर जोगळेकर, प्रेरणानगर, बोरीवली, मुंबई
मोबाइल : ७०३९७ ८३९८०, ८१०८७ ९२०८८

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shashikant Ghaskadbi About 347 Days ago
खूप छान
0
1

Select Language
Share Link
 
Search