Next
‘तटरक्षक’च्या रत्नागिरीतील नव्या इमारतीचे अनावरण
प्रमुख महानिदेशक राजेंद्र सिंग यांची उपस्थिती
BOI
Tuesday, November 13, 2018 | 03:53 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील नव्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे आणि रत्नवाटिका या ग्रीन हाउस उद्यानाचे अनावरण प्रमुख महानिदेशक राजेंद्र सिंग व त्यांच्या पत्नी ऊर्मिला सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. हा कार्यक्रम १५ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजित केला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) येथील मिरजोळे ब्लॉकमधील भूखंडावर ही प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम मार्च २०१५मध्ये मिलिटरी अभियांत्रिकी सेवा विभागामार्फत सुरू झाले होते. सध्या विमानतळ येथून कार्यरत असलेले तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय गद्रे मरीन्सच्या बाजूच्या एच-टू या भूखंडावरील नवीन कार्यालयात स्थलांतरित होणार आहे. सामान्य आस्थापन कार्यालयाशिवाय तटरक्षक दलाचे मुख्य संचालन कार्यालय, रडार रूम, सॅटेलाइट ट्रॅकिंग यंत्रणा कक्ष, कॉनफरन्स हॉल, चिकित्सालय, प्रेरणा कक्ष, वाचनालय, सीएसडी कॅंटीन आदी विभाग या इमारतीत असणार आहेत.

राजेंद्र सिंगरत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सागरी सुरक्षेचे हे मुख्य समन्वय केंद्र असणार आहे. या इमारतीतून जहाज, होवेर्क्रफ्ट व विमान आदींच्या साहाय्याने सागरी दुर्घटनेच्या वेळी बचाव कार्ये पार पाडणे, सागरी प्रदूषण, तस्करी आणि देश विघातक हालचाली यांवर प्रतिबंध आणणे, तटरक्षक दलाच्या प्रभावी विस्तारासाठी बांधकाम व भूमी संपादनाचे विषय हाताळणे आदी कार्ये केली जाणार आहेत.

२८ फेब्रुवारी २०१६ रोजी कमान स्वीकारल्यानंतर तटरक्षक दलाचे राष्ट्रीय प्रमुख महानिदेशक राजेंद्र सिंग यांची ही प्रथमच रत्नागिरी भेट आहे. ते उत्तराखंडचे मूळ रहिवाशी असून, त्यांनी देहरादून येथे पदवीपूर्व, तर मसुरी येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे. सन १९८०मध्ये ते तटरक्षक दलाच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या वर्षांमध्येच भारतीय तटरक्षक दलामध्ये रुजू झाले. तटरक्षक दलाच्या विकासात व वृद्धीच्या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी तटरक्षक दलाच्या प्रत्येक श्रेणीतील जहाजांचे कमान अधिकारी पद भूषविले आहे. ८०च्या दशकाच्या सुरुवातीस जेव्हा भारतीय समुद्रात तस्करी परमोच्च बिंदूवर होती तेव्हा त्यांनी अनेक समुद्री आर्थिक गुन्हेगारांना पकडण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कठोर परिश्रमांची नोंद घेत १५ ऑगस्ट १९९० रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना तटरक्षक पदक (टीएम) बहाल केले गेले.

ऊर्मिला सिंगआपल्या उत्कृष्ट कारकिर्दीच्या दरम्यानच महानिदेशक सिंग यांनी अमेरिकेच्या तटरक्षक दलाबरोबर समुद्री शोध व बचाव कार्य आणि समुद्री सुरक्षा या विषयांवर प्रशिक्षण प्राप्त केले आणि मसूरीच्या लाल बहादुर शास्त्री अकादमीच्या राष्ट्रीय सुरक्षा अभ्यासक्रमात प्राविण्य मिळविले. संचालन, प्रशासन, मानव संसाधन व नीती आणि योजना या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम सेवा प्रदान केल्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.

गेल्या ३४ वर्षांपासून महानिदेशक सिंग यांच्या नेतृत्वाखाली तटरक्षक दल एक मल्टी-मिशन एजन्सी म्हणून विकासित होत आहे. महानिरीक्षक असताना त्यांनी तटरक्षक दलाच्या पूर्व व पश्चिम या दोन्ही क्षेत्रांचे कमांडर पद भूषविले आहे. भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी कालानुरूप बदलत्या आव्हानांना पेलण्यासाठी तटरक्षक दलाच्या कार्यकक्षा अधिक व्यापक करण्याचे देखील कार्य केले; तसेच तटरक्षक दलाच्या संस्थात्मक वाढीस चालना देणे आणि उच्च पातळीवरील संचालनीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी दिलेल्या विशिष्ट सेवेसाठी १५ ऑगस्ट २००७रोजी त्यांना राष्ट्रपती तटरक्षक पदक (पीटीएम) हे तटरक्षक दलातील सर्वोच्च पदक देऊन गौरविण्यात आले आहे.

महानिदेशक सिंग यांच्याबरोबर या भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी व तटरक्षिका या सैनिक पत्नींच्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ऊर्मिला या देखील रत्नागिरी येथे येणार आहेत. तटरक्षक दलातील सैनिकांच्या पत्नींच्या जीवनात अर्थपूर्ण व आशावादी बदल घडून आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे प्रेरणादायी आहे. तटरक्षिका या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्त्री उपयोगी व समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search