Next
बोलू ‘बोली’चे बोल!
अनिकेत कोनकर
Wednesday, February 27, 2019 | 02:30 PM
15 1 0
Share this article:

(या मराठीच्या बोली आहेत, हे दर्शविणारे हे चित्र केवळ प्रतीकात्मक आहे.)

मराठी राजभाषा दिन (२७ फेब्रुवारी) आणि आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष (२०१९) या निमित्तानं ‘बाइट्स ऑफ इंडिया’चा विशेष उपक्रम -‘बोलू ‘बोली’चे बोल!’ मराठीच्या विविध बोलीभाषांचा आस्वाद आपल्याला या उपक्रमातल्या व्हिडिओंमधून घेता येईल. मराठीच्या विविध बोलीभाषांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल सांगणारा हा लेख...
...........
आज (२७ फेब्रुवारी) कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी राजभाषा दिन. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन नुकताच (२१ फेब्रुवारी) होऊन गेला. आणि विशेष म्हणजे २०१९ हे आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलं आहे. भाषा किंवा त्याहून नेमकं सांगायचं झालं, तर आपली स्वतःची भाषा/मातृभाषा/स्थानिक भाषा किती महत्त्वाची आहे, हे यावरून प्रकर्षानं जाणवतं. संयुक्त राष्ट्रसंघासारखी संस्था भाषेसारख्या विषयाला वाहिलेले दिन किंवा वर्ष घोषित करते, हे त्याचं पहिलं आणि अभिमानास्पद कारण. आणि भाषांचे दिन किंवा वर्ष साजरं करून त्या भाषांची आठवण ठेवण्याची वेळ यावी लागते, हे अस्वस्थ करणारं दुसरं कारण. 


अनेकोत्तम साहित्यिकांनी वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती केल्यामुळे मराठी भाषा अत्यंत समृद्ध आणि संपन्न आहे. मराठीला अजून अभिजात भाषेचा दर्जा अधिकृतपणे मिळालेला नसला, तरी ती त्या दर्जाचीच भाषा असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. ही अभिमानाचीच गोष्ट आहे; मात्र गेल्या काही वर्षांत जगातल्या इतर सर्व भाषांना जी समस्या भेडसावते आहे, तीच मराठीला भेडसावते आहे आणि ती म्हणजे अन्य भाषांचं आणि मुख्यतः इंग्रजी भाषेचं आक्रमण. कोणतीही भाषा वाईट नाही/नसते. एका ठरावीक मर्यादेपर्यंत एका भाषेतले शब्द दुसऱ्या भाषेत वापरण्यातही काही गैर नाही; किंबहुना असे शब्द सामावून घेण्यातून भाषेचा प्रवाहीपणा दिसून येतो; पण जेव्हा हे प्रमाण वाढत जातं, तसतसं ते मूळ भाषेला मारक ठरतं. कारण अन्य भाषेतले शब्द आपल्या भाषेत वापरण्याची क्रिया नकळत होत असते. मराठीच्या बाबतीत सांगायचं झालं, तर केवळ क्रियापद मराठी आणि बाकीचे शब्द इंग्रजी (काही हिंदीही) अशी वाक्यरचना अलीकडे अगदी बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत आणि मंडईपासून मॉलपर्यंत बहुतांश ठिकाणी ऐकायला मिळते. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे प्रत्येक जण व्यक्त होऊ लागला, ही गोष्ट चांगलीच; पण जशा प्रकारे बोललं जातं, तशाच प्रकारे लिहिण्याचं प्रमाणही वाढलं. कोणत्याही विषयावर तातडीनं व्यक्त होण्याची गरज ती माध्यमं भागवत असल्यानं लिहिण्यापूर्वी भाषेच्या दर्जाबद्दल फारसा विचार न करता जसंच्या तसं लिहिलं जाऊ लागलं. त्यामुळे मराठी शब्दांचा अभाव असलेली ‘मराठी’ वाचायलाही मिळू लागली. समाजमाध्यमांवर उत्तम मराठी भाषेत लिहिणारेही अनेक जण आहेत; पण त्यांचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. वाचणं, ऐकणं या माध्यमातून आपण ज्या प्रकारच्या भाषेच्या मोठ्या प्रमाणावर सान्निध्यात येतो, तीच आपली भाषा कधी बनून जाते, ते लक्षातही येत नाही. आपण ज्याच्याशी संवाद साधतो आहोत, त्याला आपलं म्हणणं कळावं, इतकाच संवाद साधणाऱ्यांचा हेतू असतो. त्यामुळे कोणत्या भाषेतले शब्द आपण दर वेळी वापरतो आहोत, याचं भान प्रत्येक वेळी असतंच असं नाही. त्यातून आपोआपच प्रत्येक जण कळत-नकळत अशी अनेक भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली वेगळीच भाषा वापरू लागतो. ती धड इंग्रजीही नसते, मराठीही नसते नि हिंदीही नसते. त्यातून संवादाचा तात्कालिक हेतू साध्य होत असला, तरी भाषेच्या जपणुकीच्या दृष्टीनं मात्र हे नक्कीच चांगलं नाही. याचा फटका मराठीसह त्या त्या भागांत बोलल्या जाणाऱ्या मराठीच्या बोलीभाषांनाही बसला/बसतोय. उलट, तंत्रज्ञानाच्या युगात वापरला जाणारा प्रत्येक शब्द साठवला जाणार असल्यानं आणि साहजिकच ‘सर्चेबल’ (शोधता येण्यासारखा) असल्यानं तो जपून, तोलूनमापून वापरण्याची जास्त गरज आहे, मग भाषा कोणतीही असो. (आपण ‘चॅटिंग, मेसेजिंग’साठी नेमके कोणते शब्द वापरतोय, हे तपासायचं असेल, तर आपल्या मोबाइलची डिक्शनरी पाहावी. म्हणजे आपल्या दैनंदिन बोलण्यात/वापरण्यात किती इंग्रजी शब्द आहेत नि किती मराठी शब्द आहेत, हे प्रत्येकाला आपोआपच कळेल.) अशा प्रकारातूनच, जगभरात बोलल्या जाणाऱ्या सुमारे ६७०० स्थानिक भाषांपैकी ४० टक्के भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचं निरीक्षण स्थानिक विषयांवर काम करणाऱ्या जागतिक पातळीवरील समितीनं संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडलं होतं. त्यातूनच २०१९ हे आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून साजरं करायचं, असा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघानं २०१६मध्ये जाहीर केला. एखादी बोलीभाषा/स्थानिक भाषा म्हणजे नेमकं काय असतं? त्या भागातली संस्कृती, खाद्यसंस्कृती, परंपरा, कला, इतिहास आणि एकंदरच त्या भागाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या ज्ञानाचा कित्येक वर्षांचा ठेवा त्या भाषेत सामावलेला असतो. आता त्या भाषाच धोक्यात आल्या, तर साहजिकच हे सारंही धोक्यात येणार आणि दुर्दैवानं तसंच झालं/होतं आहे. त्यामुळेच या स्थानिक भाषा जपण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूनं हे वर्ष साजरं केलं जाणार आहे. २००० सालापासून साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनामागचं कारणही तेच आहे.मराठी ही सुंदर, समृद्ध भाषा आहेच; पण तिची प्रत्येक बोलीही अतिशय संपन्न आहे. अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, नागपुरी, आगरी, कोकणी, मराठवाडी, उदगिरी, तावडी, सामवेदी, सातारी, कोल्हापुरी, बेळगावी अशी प्रत्येक बोली वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक बोलीचा लहेजा, सौंदर्यस्थळं, रांगडेपणा, भावना थेट व्यक्त करण्याची क्षमता या गोष्टी प्रेमात पडाव्यात अशाच आहेत; मात्र वापर घटल्यानं बोलीभाषा मागे पडत चालल्या. असं असलं, तरी मराठीच्या अनेक बोलीभाषांमधल्या काही जागरूक नागरिकांना या धोक्याच्या घंटेची किणकिण खूप आधी ऐकू आली. त्यामुळे त्यांनी बोलींच्या जतनासाठी चांगली कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांत मराठीच्या विविध बोलीभाषांसाठी विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आणि वैयक्तिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गंगाराम गवाणकरांनी लिहिलेलं आणि मच्छिंद्र कांबळींमुळे गाजलेलं ‘संगीत वस्त्रहरण’ हे नाटक आल्यावर मालवणी बोलीची गोडी साता समुद्रापार पोहोचली. वऱ्हाडी बोलीमध्ये डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. विठ्ठल वाघ यांच्यासारख्या साहित्यिकांनी विपुल लेखन केलं आहे. आगरी बोलीतही बऱ्यापैकी साहित्यनिर्मिती होत होती; मात्र अलीकडच्या काही वर्षांत हे प्रयत्न बऱ्यापैकी वाढले आहेत आणि विविध बोलीभाषांत होत आहेत, असं कुठे ना कुठे, काही ना काही वाचनात येत होतं. त्या अनुषंगानं, ‘बोलू बोलींचे बोल!’ या उपक्रमाच्या निमित्तानं अनेक जणांशी संवाद साधला. तेव्हा चित्र खूप आशादायी असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. अर्थात प्रयत्न करणाऱ्या या हातांना खूप मोठ्या सहकार्याची, लोकसहभागाची आवश्यकता आहे, हेही तितकंच खरं. रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी वस्ती जास्त असल्यानं तिलोरी-कुणबी ही बोली जास्त प्रमाणात बोलली जायची. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष अरुण इंगवले गेली अनेक वर्षं या बोलीच्या जतनासाठी काम करत आहेत. या बोलीतले सुमारे नऊ हजार शब्द, सुमारे साठ गाणी, काही म्हणी असं साहित्य त्यांनी संकलित केलंय. अजूनही त्यात बरंच काम करण्यासारखं आहे, असं ते म्हणतात. ‘१९०३ साली जॉर्ज ग्रिअर्सनने भारताचं भार्षिक सर्वेक्षण केलं, तेव्हा तिलोरी-कुणबी ही बोली बोलणारे सुमारे १३ लाख लोक होते; पण १९६१मध्ये पुन्हा भाषिक सर्वेक्षण झालं, तेव्हा केवळ तीन लोकांची नोंद झाली. याचा अर्थ असा, की केवळ तीनच जणांनी ती आपली मातृभाषा असल्याचं सांगितलं. ही बोली बोलणं कमीपणाचं, अडाणीपणाचं लक्षण असल्याची भावना वाढीला लागली असल्याचं हे द्योतक होतं,’ अरुण इंगवले सांगत होते. रत्नागिरीच्या चिपळूण, संगमेश्वरपासून अगदी राजापूरपर्यंतच्या भागात ही बोली बोलली जाते. संगमेश्वर परिसरात ही बोली बोलण्याचं प्रमाण जास्त असल्यानं त्याला संगमेश्वरी असं नाव दिलं गेलं. दर १२ कोसांवर भाषा बदलते, या नियमानुसार या बोलीतही वेगवेगळ्या भागांत काही वेगळे शब्द आहेत. इंग्रजीचा प्रभाव या बोलीवरही कसा पडतोय, याचं एक उत्तम उदाहरण इंगवले यांनी सांगितलं. ‘‘वेळ नाही’ हे सांगण्याची वेळ प्रत्येकाला कधी ना कधी येते; पण अलीकडे हे सांगायचं झालं तर ‘टाइम नाय’ असं म्हटलं जातं. ‘वेल नाय’ असं म्हणणं काही अवघड नसलं तरीही....’ असं इंगवले म्हणाले. 

काही वर्षांपूर्वी संगमेश्वरचे आनंद बोंद्रे यांनी या बोलीतून किस्से सांगण्याचा एक कार्यक्रम सुरू केला. तसंच त्यांचे बंधू गिरीश बोंद्रे यांनी या बोलीतून लेखन केलं. त्याच आधारावर तयार करण्यात आलेला ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ हा कोकणातल्या लोककलांवर आधारित असलेला, संगमेश्वरी बोलीतला लोकनाट्याच्या बाजाचा कार्यक्रम गेल्या एक-दोन वर्षांत लोकप्रिय झाला आहे. सुनील बेंडखळे आणि त्यांचे सहकारी हा कार्यक्रम सादर करतात.मच्छिंद्र कांबळींच्या ‘वस्त्रहरण’ नाटकानंतर मालवणी बोलीला खूप चांगले दिवस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या या बोलीतही विविध भागांप्रमाणे शब्दोच्चार, हेल यांमध्ये काही भेद आहेत; पण एकंदरीतच ही रसाळ बोली आहे. भाषा सर्वेक्षणानुसार या बोलीला कुडाळी असं नाव होतं; पण ‘वस्त्रहरण’नंतर ती मालवणी म्हणून प्रसिद्ध झाली. दादा मडकईकर, महेश केळुस्कर यांच्या मालवणीतल्या कविता प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या काळात अनेक नवे लेखक, कवी या बोलीत लेखन करत आहेत. या बोलीतल्या टीव्ही मालिकाही गाजल्या.ठाणे, रायगड जिल्ह्यात कोळी लोकांची आगरी बोली प्रसिद्ध आहे. या बोलीत बऱ्यापैकी साहित्यनिर्मिती झाली आहे. टीव्ही वाहिन्यांवरच्या कार्यक्रमातही या बोलीतले कार्यक्रम सादर केले जातात. सर्वेश तरे हा तरुण कवी आगरी बोलीच्या संवर्धनासाठी काम करतो आहे. आगरी बोली शिकू इच्छिणाऱ्यांसाठी त्याने काही समविचारी मित्रांच्या सहकार्याने दोन दिवसांचा प्रशिक्षण वर्ग सुरू केला होता; मात्र त्याला इतका प्रतिसाद मिळाला, की ‘आगरी शाळा’ नावाचा १५ दिवसांचा सर्टिफिकेट कोर्सच सुरू करण्यात आला. हा कोर्स करणाऱ्याला ‘अल्ट्रा मराठी’ या संस्थेकडून सर्टिफिकेशन देण्यात येतं. या १५ दिवसांच्या उपक्रमात आगरी बोलीचं रीतसर प्रशिक्षण देण्यात येतं, असं सर्वेशनं सांगितलं. तरुणाईला रॅप संगीत आवडत असल्यानं सर्वेशनं आगरी-कोळी बोलीतलं पहिलं रॅप गाणंही अलीकडेच तयार केलं आहे. ते यू-ट्यूबवर गाजतं आहे. लोकांनी आपली बोली बोलण्यात लाज का बाळगावी, असा सवाल सर्वेश करतो.

भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर या पट्ट्यात डांगाणी/मावळी बोली बोलली जाते. सर्व बोलींप्रमाणेच ही बोलीदेखील गोड आहे. यात म्हणी, गाणी, भारूड, भजनं असं बरंच साहित्य आहे. परंतु ते मौखिक स्वरूपात आहे. ते लिखित स्वरूपात आणून जतन करण्यासाठी ‘मही बोली, मही भाषा’ नावाचा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. हा खरंच खूप स्तुत्य आणि अन्य बोलींभाषांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी आदर्श घ्यावा, असा उपक्रम आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत ‘झाडी बोली’ बोलली जाते. या बोलीतलं लेखन पहिल्यांदा प्रकाशित केले ते डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी. त्यांनी झाडी बोलीचा कोशही तयार केला असून, त्या बोलीतल्या एक मासिकाचे ते संपादकही आहेत. प्रा. डॉ. सुमिता कोंडबत्तुनवार याही झाडी बोलीत लेखन करतात. झाडी बोलीतला एक तासाचा एक कार्यक्रमही त्या सादर करतात. वसई भागात बोलल्या जाणाऱ्या सामवेदी बोलीतही बऱ्यापैकी लेखन केलं जातं. फेलिक्स डिसूझा हे या बोलीत लेखन करणारे अलीकडचे लेखक आहेत. कोकणातले दालदी मुस्लिम बोलत असलेल्या दालदी मुस्लिम कोकणी बोलीवर रत्नागिरीतील प्राध्यापिका डॉ. निधी पटवर्धन यांचा अभ्यास आहे. त्या बोलीच्या जतनासाठी त्या कार्यरत आहेत.कोल्हापुरी, सातारी अशा ग्रामीण बोलींमध्ये शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारख्या लेखकांनी खूप लेखन केलं. या बोली मराठी चित्रपटांतही पूर्वीपासून दिसतायत. अलीकडे मराठी मालिकांतही त्या दिसू लागल्यात, ही चांगली गोष्ट आहे. मराठवाड्यातल्या बोलीही चित्रपटांसारख्या माध्यमातून काही प्रमाणात मांडल्या जात आहेत. मराठवाडी बोलीत आसाराम लोमटे यांच्यासारखे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आहेत. लातूर जिल्ह्यातल्या उदगिरी बोलीत प्रसाद कुमठेकर या तरुण लेखकाने लिहिलेल्या ‘बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गोव्यात बोलल्या जाणाऱ्या कोकणी बोलीत तर महाबळेश्वर सैल यांच्यासारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आहे. चित्पावनी ही गोव्यातल्या चित्पावन ब्राह्मणांची बोली; मात्र ती वापरण्याचं प्रमाण आता खूप कमी झालं आहे. या बोलीच्या जतनासाठी श्रीधर बर्वे यांनी ‘सुलभ चित्पावनी’ हे पुस्तक लिहिलं आहे. राजेंद्र बर्वे यांच्यासारखे काही कवी या बोलीत कविताही लिहितात. खानदेशातली अहिराणी बोली म्हटलं, की पहिल्यांदा आठवतात त्या बहिणाबाई. जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या त्यांच्या कवितांनी अहिराणी बोलीला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश अहिराणी-मराठी शब्दकोशाच्या रूपानं प्रसिद्ध केला. कमलाकर देसले यांच्यासारखे ज्येष्ठ लेखक/कवी मराठीसह अहिराणी बोलीतही लेखन करतात. अहिराणी बोलीत त्यांनी कविता, गझलाही लिहिल्या आहेत. अहिराणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देसले यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचा अहिराणी भाषेत ओवीबद्ध अनुवादही केला आहे. ‘जुन्या खानदेश परिसरात, म्हणजे अजिंठ्याचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, चांदवडचे डोंगर आणि तापी, बोरी, अनेर, वाघूर या नद्यांच्या प्रदेशात अहिर लोक वास्तव्यास असत. ते अहिराणी बोलत. अहिरांची भाषा म्हणून अहिराणी ओळखली जाते,’ अशी माहिती कमलाकर देसले यांनी दिली. प्रामुख्याने जळगावच्या पूर्व भागात बोलल्या जाणाऱ्या तावडी बोलीत लेखन करणारे कवी म्हणून मधू पांढरे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, अस्मितादर्श, वैखरी, शब्दकार, मराठा यांसारख्या नियतकालिकांतून सातत्याने लेखन करतात. ‘गर्भारगानं’ हा त्यांचा तावडी बोलीतला कवितासंग्रह आहे. मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी यांसह अनेक बोलींची साहित्य संमेलनंही अलीकडच्या काही वर्षांत होऊ लागली आहेत. त्यामुळे या बोलींबद्दलची जागरूकता वाढीला लागते आहे. त्याशिवाय विविध ठिकाणी होत असलेली ग्रामीण साहित्य संमेलनंही नवे लेखक, नवे वाचक घडवत आहेत. ‘त्या त्या भागातल्या ग्रंथालयांनी स्थानिक भागांतले साहित्यिक, बोलीभाषांमधले लेखक यांच्या चर्चा, संवाद किंवा विविध प्रकारचे स्थानिक साहित्यिक कार्यक्रम सातत्याने आयोजित करायला हवेत,’ असं मूळच्या देवगडच्या नि सध्या रत्नागिरीत असलेल्या रश्मी कशेळकर यांना वाटतं. कशेळकर स्वतः मराठी आणि मालवणी बोलीतही लेखन करतात. ‘विविध बोलींमध्ये लेखन करत असलेल्या आम्ही मैत्रिणी अधूनमधून एकत्र भेटून एकमेकांचं साहित्य वाचून दाखवतो, त्याचा रसास्वाद घेतो,’ असा छोटेखानी उपक्रम राबवत असल्याचं कशेळकर यांनी सांगितलं. विविध बोलीभाषांमधल्या उपक्रमांची ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणं झाली. असे आणखी कित्येक अज्ञात शिलेदार कार्यरत असतील. प्रमाण मराठीसह सर्व बोलींच्या जतनासाठी, दस्तावेजीकरणासाठी, संवर्धनासाठी असे उपक्रम होण्याची गरज आहे. आजचं तंत्रज्ञानाचं युग असल्यानं माहिती साठवणं आणि प्रसारित करणं या गोष्टी खूप सोप्या झाल्यात; पण मुळात ती माहिती गोळा करणं, त्यावर संशोधन करणं, तिची अधिकृतता तपासणं या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. त्यासाठी तरुण पिढीनं पुढे येऊन ज्येष्ठ व्यक्तींकडे असलेला माहितीचा साठा जपण्याच्या दृष्टीनं कार्यरत व्हायला हवं, हा निश्चय आजच्या दिवसाच्या औचित्यानं करू या! म्हणजे या बोलीभाषांचा एक दिवस किंवा एक वर्ष साजरं करण्यापेक्षा प्रत्येक दिवस बोलीभाषेच्या/भाषेच्या वापराचा/गौरवाचा होईल.

मराठीच्या बोलीभाषांसाठी झटणाऱ्या सर्वांच्या कार्याला छोटासा हातभार म्हणून ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबविला आहे. मराठीच्या विविध बोलींचा लहेजा, त्यांची वैशिष्ट्यं आणि गोडवा यांचा आस्वाद/आनंद भाषाप्रेमींना घेता यावा, यासाठी काही बोलींमधले नमुने व्हिडिओ स्वरूपात येथे सादर करत आहोत. (सर्व बोलींच्या व्हिडिओसाठी येथे क्लिक करा.) या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद आणि सर्व मराठी जनांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!

(बोलीभाषांसंदर्भातील आपले काही उपक्रम असतील, तर जरूर कळवा.)
ई-मेल : aniket.konkar@bytesofindia.com
मोबाइल : ७४४७७ ९२७९५

(मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने २०१८मध्ये राबविलेल्या उपक्रमातील लेख वाचण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search