Next
‘राष्ट्र निर्मितीसाठी सकारात्मक तरुणाई गरजेची’
विद्यार्थी सहायक समितीच्या व्याख्यानमालेत पोपटराव पवार यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, December 24, 2018 | 01:37 PM
15 0 0
Share this article:

व्याख्याते पोपटराव पवार यांचा सत्कार करताना मान्यवरपुणे : ‘स्वातंत्र्यलढ्यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरुणाई, मात्र अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या तालावर रमत आहे. सोशल मीडियाला अधिक वेळ देत आहे. तरुणांनी हा विचार बदलत ग्रामविकास व कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा. कारण राष्ट्र निर्मितीसाठी सकारात्मक तरुणाईची गरज असते,’ असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

गणिततज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी सहायक समिती व उचित माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ‘लोकसहभागातून ग्रामविकास’ या विषयावर पवार यांनी मार्गदर्शन केले. समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन येथे झालेल्या या व्याख्यानावेळी विद्यार्थी सहायक समितीचे विश्वस्त व माजी पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील, विश्वस्त तुषार रंजनकर, माजी विद्यार्थी हरीश बुटले, चंद्रकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘हिवरेबाजारमध्ये कोणत्याही महापुरुषांचे पुतळे उभारले नाहीत, की जयंतीही आम्ही साजरी करत नाही; पण त्यांचे विचार प्रत्यक्ष अंमलात आणतो. वाढते शहरीकरण व अधिक उत्पादनाच्या नावाखाली शेतीवर होत असलेले अघोरी उपाय पाहता, आजारांचे प्रमाण वाढत आहे. जमिनी खराब करून टाकल्या आहेत. यासाठी आता तरुणांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन केले, तर दुष्काळाशीही दोन हात करता येऊ शकतात. आजच्या तरुणांच्या हातात माहिती तंत्रज्ञानाचे मोठे जाळे आले आहे. त्याचा उपयोग सकारात्मक कामासाठी करायला हवा.’

‘विद्यार्थ्यांनी पाण्याचा ताळेबंद शिकावा. पावसाचे पाणी अडवून ते जिरविण्याचा उपक्रम राबविला पाहिजे. पाण्याचा ताळेबंद मांडल्यानेच हिवरेबाजारचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला, असे सांगितले; मात्र सध्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. हे थांबवण्यासाठी तरुणांनी खेड्यातील उपलब्ध साधनांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यावा,’ असे आवाहनही पवार यांनी या प्रसंगी केले.

गिरीश कुलकर्णी याने सूत्रसंचालन केले. ऋतुजा धावडे हिने आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search