Next
‘सवाई’ यंदा महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात
१२ ते १६ डिसेंबर दरम्यान महोत्सवाचे आयोजन
BOI
Wednesday, October 10, 2018 | 06:28 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा दि. १२ ते १६ डिसेंबर या काळात मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

गेली बत्तीस वर्षे हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होत होता, मात्र यंदा सोसायटीने शाळेची जागा महोत्सवासाठी देता येणार नाही, असे लेखी पत्र दिल्यामुळे जागेतील हा बदल करण्यात येत आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक रसिक, संस्थाचालक आणि हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क साधून याबाबत काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. या सगळ्यांच्या भावनांचा आर्य संगीत प्रसारक मंडळ मनापासून स्वीकार करीत असल्याचे जोशी यांनी या निवेदनात म्हटले आहे.

पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था महोत्सवास मनापासून आणि विनाअट मदत करण्यास तयार असल्याचेही चित्र यामुळे समोर आले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले. जागा बदलाच्या निमित्ताने या सगळ्या भावनांची उजळणी झाली, असेही जोशी यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्रीय मंडळाशी भीमसेनजींचा दीर्घकाळ अतिशय निकटचा संबंध होता. मंडळाच्या विविध उपक्रमांत ते सहभागीही होत असत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळास मुकुंदनगर येथील क्रीडा संकुलातील मैदान या महोत्सवासाठी देण्याचे अगत्याने मान्य केले, याबद्दल जोशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

हा महोत्सव दरवर्षीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होईल आणि त्यासाठी गेली ६५ वर्षे रसिक, हितचिंतक आणि प्रायोजक यांच्याकडून जे सहकार्य मिळत आले, तसेच यापुढेही मिळेल, असा विश्वास श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केला आहे.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link