Next
कुरुंजी येथे ‘बांबू डे’ साजरा
प्रेस रिलीज
Monday, December 04 | 06:08 PM
15 0 0
Share this story

​पुणे : ​‘सिनर्जी, कॅज्युअरिना हॉलिडे व्हिलेज’तर्फे ​​​​‘बांबू डे’​ साजरा करण्यात आला. बांबूच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गृहनिर्मिती’ला चालना देणे आणि ​स्थानिक बांबू कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश ​होता.

‘गृहनिर्मितीमध्ये बांबूचा कल्पक उपयोग’ या विषयावर तज्ज्ञांचा परिसंवाद,​ ​बांबूपासून केलेल्या घरांच्या प्रतिकृती,​ ​फर्निचरचे प्रदर्शन,​ ‘बांबू हाऊस’ला भेट,​ ​बांबू कलाकारांचा सत्कार,​ ​बांबू लागवड असे याचे स्वरूप ​होते. ‘बांबूच्या साहाय्याने पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे’, असा सूर या परिसंवादात उमटला.

हा कार्यक्रम रविवारी (३ डिसेंबर) कुरुंजी (ता. भोर) येथील कॅश्युरिना प्रकल्प येथे आयोजित केला होता​. ‘बांबू हाऊस’मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू संशोधक आणि  ‘नेटिव्ह कॉनबेक बांबू प्रा. लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक संजीव करपे, ‘बांबू टेल्स’चे विवेक कोलते, स्थानिक बांबू कलाकार सचिन महाडिक, गडचिरोली येथील बांबू आणि वनहक्क चळवळीतील कार्यकर्ते सुबोध कुलकर्णी, बांबू​ ​गृहनिर्मिती क्षेत्रातील उद्योजक मंदार देवगावकर, अपर्णा देवगावकर, राजेंद्र आवटे यां​चे परिसंवाद झाले.

करपे म्हणाले, ‘जगभर बांबूपासून घरे, फर्निचर, पूल अशा गोष्टी बनाविल्या जात आहेत. बांबूच्याबाबतीत भारतीय संशोधन सर्वोत्कृष्ट असून त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. बांबूचा वापर पर्यावरणस्नेही असून ग्लोबल वॉर्मिंगवरदेखील उपयुक्त ठरणार आहे. बांबू आग आणि कीडरोधक करता येतो. त्यामुळे तो गृह बांधणीत निर्धोक ठरतो. गोवा, मालदीव, हैद्राबाद, जपान, थायलंड येथे बांबूपासून गृहनिर्मिती आणि शोभिवंत बांधकामे करण्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वोत्तर राज्यात अशी घरे आहेत; मात्र भारतातील उर्वरित राज्यांनी बांबूला आपलेसे करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगातून संजीवनी मिळू शकते. महाराष्ट्र सरकार गडचिरोली येथे बांबू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारत असून वर्षभरात ती पूर्ण होईल.’

आवटे यांनी निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन विकसित करताना बांबू हाऊस उभारणे हे आकर्षण ठरत असल्याचे नमूद केले. म्हणूनच सिनर्जी, कॅज्युअरिना हॉलिडे प्रकल्पात संजीव करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक बांबू हाऊस उभारण्यात आल्याचे ते म्हणाले. देवगावकर यांनी ‘बांधकाम व्यावसायिकांनी पारंपरिक रचना बाजूला ठेऊन बांबू हाऊस संकल्पना अंगिकारली पाहिजे,’ असे सांगितले.

अमृता  देवगावकर म्हणाल्या, ‘पर्यटंकाना बांबू हाऊस आवडत असून त्यातून थंडीत उबदार वातावरण आणि उन्हाळ्यात थंडावा मिळतो. बांबूचे फायदे गृहनिर्मितीमध्ये असून आवड निर्माण करण्याची गरज आहे.’

मंदार देवगावकर, अमृता देवगावकर यांनी बांबू कलाकारांचा सत्कार केला. राजेंद्र आवटे यांनी स्वागत केले. गणेश शिरोडे, श्री. मिरकुटे यांसह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link