Next
‘सागरपुत्र’च्या माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेने सभागृह भारावले
BOI
Saturday, February 23, 2019 | 06:01 PM
15 0 0
Share this article:

‘वाटचाल’च्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना अण्णा शिरगावकर. सोबत डॉ. अशोक देशमुख, शांता सहस्रबुद्धे, डॉ. एन. आर. भागवत, धीरज वाटेकर, विलास महाडिक, रमेश जोशी, मिलन गुजर.

दापोली : ‘आदरणीय अण्णा! आम्ही तुमचे सागरपुत्र आणि कोकणकन्या आज या समारंभातून तुमचं आमच्यावर असलेलं मोठं ऋण अंशतः फेडत आहोत. आम्हाला काहीसं ऋणमुक्त होऊ द्या. तुमचं ध्येय, स्वप्न होतं सागरपुत्र विद्याविकास संस्था. तुम्ही सर्वस्व ओतलंत त्यासाठी...!’ अशा आशयाच्या कृतज्ञता पत्राचे वाचन व्यासपीठावरून सुरू असताना सारे सागरपुत्र आणि वाशिष्ठीकन्या वसतिगृहाचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व्यासपीठाच्या दिशेने झेपावत ८९ वर्षांच्या अण्णांसमोर नतमस्तक झाले. हा अत्यंत भावनिक प्रसंग याचि देहि याचि डोळा अनुभवलेल्या, तुडुंब भरलेल्या सभागृहातील प्रत्येकाच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. निमित्त होते अण्णा शिरगावकर : दाभोळमधील साठ वर्षे ‘वाटचाल’ या विशेषांकाच्या प्रकाशनाचे. दापोलीच्या राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात शिवजयंतीदिनी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.

या प्रसंगी बोलताना डॉ. अशोक देशमुख. सोबत मान्यवर

तालुक्यातील जगप्रसिद्ध दाभोळमध्ये आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण साठ वर्षे घालविलेले आणि सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिरगाव (चिपळूण) येथे आपल्या मुलीकडे वास्तव्यास असलेले कोकणच्या प्राचीन इतिहासाचे संशोधक, पुराणवस्तू संग्राहक, अभ्यासू लेखक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा शिरगावकर यांच्या दाभोळमधील साठ वर्षांच्या कार्यकालावर आधारित ‘वाटचाल’ हा लेखक धीरज वाटेकर आणि त्यांचे सहकारी विलास महाडिक यांची निर्मिती-संकलन-संपादन असलेला १३२ पानी, संपूर्ण रंगीत, दुर्मिळ माहिती, कात्रणे आणि छायाचित्रांचा संग्रह असा संग्राह्य विशेषांक शिवजयंतीला उपस्थितांच्या हस्ते प्रकाशित झाला. हा विशेषांक म्हणजे ‘दाभोळमध्ये राहून अण्णांनी केलेल्या कामाचा वयाच्या ८९व्या वर्षी समाजाला सादर केलेला अहवाल होय’. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर स्वतः अण्णा, डॉ. अशोक देशमु, निवृत्त प्राचार्या शांता सहस्रबुद्धे, भागवत हॉस्पिटलचे संचालक डॉ. एन. आर. भागवत, धीरज वाटेकर, विलास महाडिक, कार्यक्रमाचे निमंत्रक उद्योजक-पत्रकार रमेश जोशी, उखाणेकार मिलन गुजर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला उपस्थित नागरिक

या वेळी बोलताना अण्णांनी, शिवजयंती आणि संत रोहिदास जयंतीच्या अनुषंगाने आरक्षण आणि माणसांना जातीजातीत विभागल्या गेलेल्या सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य केले. ‘मला वेळच मिळत नाही’ अशी सबब देणाऱ्यांना आपल्या अनुभवातून समजावण्याचा प्रयत्न केला. सागरपुत्र वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर त्यांचा सन्मान घडवून आणल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ अशीच काहीशी त्यांची भावना झाली होती. कार्यक्रमाचे निमंत्रक उद्योजक-पत्रकार रमेश जोशी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील आपली भूमिका मांडली. एका साध्या सूचनेवरून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. मिलन गुजर यांनी कवितावाचन केले. वाशिष्ठीच्या तीरावरील दानशूर स्वामीभक्त अंबरीश उर्फ दादा खातू आणि परिवाराच्या सेवाभावी वृत्तीस अण्णांनी हा विशेषांक समर्पित केला आहे. स्वामींच्या कृपेने जीवनात केलेल्या कणभर कामाला अण्णांनी मणभर कौतुकाची झालर लावल्याची भावनिक प्रतिक्रिया दादा खातू यांनी व्यक्त केली.

अण्णांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करताना सागरपुत्र आणि वाशिष्ठीकन्या वसतिगृहाच्या माजी विद्यार्थ्यांनी

दाभोळच्या डॉ. अ. न. केतकर यांनी ‘सागरपुत्र’मधील अण्णांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णांसोबत साठ वर्षांपूर्वी दाभोळला आलेले डॉ. एम. बी. लुकतुके म्हणाले, ‘तेव्हा दाभोळमध्ये कस्टम, पोर्ट, शाळा, हेडमास्तर एवढेच काय ते होते. अण्णांनी गावाला अनेकांच्या सहकार्याने सामाजिक आणि बौद्धिक पातळीवर गावपण देण्याचा प्रयत्न केला. अण्णांच्या पूनम स्टोअर्सच्या मागील रिकाम्या जागेत काउंटरपेक्षा अधिक गर्दी कायम राहिली.’

अण्णांजवळ आपली कृतज्ञता व्यक्त करताना सागरपुत्र वसतिगृहातील एक माजी दिव्यांग विद्यार्थी

‘वाटचाल’ विशेषांकाच्या निर्मिती-संकलन-संपादनाविषयी लेखक वाटेकर यांनी आपल्या मनोगतातून माहिती दिली. निवृत्त प्राचार्या शांता सहस्रबुद्धे, डॉ. देशमुख यांनी मनोगतातून काही आठवणी सांगितल्या. साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात अण्णांच्या, स्वामी स्वरुपानंदांपासून सत्यसाईबाबांपर्यंत आणि दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयींपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंतच्या झालेल्या मार्गदर्शन भेटींच्या नोंदी अंकात आहेत. ६० वर्षांच्या दाभोळमधील कारकिर्दीत अण्णांनी समाजकारण, राजकारण, पुराणवस्तूसंग्रह, इतिहास संशोधन या क्षेत्रांत केलेल्या डोंगराएवढ्या कामाच्या अहवालाची दस्तऐवज स्वरूपात संक्षिप्त नोंदीं या अंकात आहेत.

डॉ. अशोक देशमुख यांना सन्मानित करताना रमेश जोशी, मिलन गुजर.

या वेळी स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या आशाताई कामत, डॉ. प्रशांत मेहता, डॉ. दिलीप जोशी, डॉ. गोविंद जोशी, डॉ. दीपक हर्डीकर, डॉ. शैलजा जोशी, डॉ. अशोक निर्बाण, श्री. व सौ. शेलार, मुख्याध्यापक सुनिल देसाई, दाभोळचे डॉ. अ. न. केतकर, डॉ. एम. बी. लुकतुके, अनिष पटवर्धन, किशोर तांबडे, दादा मुरमुरे, ‘कोमसाप’च्या दापोली अध्यक्षा रेखा जेगरमल, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भगतसिंह फाटक, वाशिष्ठी कन्या छात्रालयाच्या माजी अधीक्षका आरती लाड, नूतन प्रकाशनच्या रिना आणि रवींद्र लब्धे, नवी मुंबईच्या विभावरी कामेरकर, उज्ज्वला बेंडखळे यांच्यासह सुमारे अडीचशे नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि कृतज्ञता पत्राचे वाचन कुणाल मंडलिक यांनी केले. गप्पा-टप्पांच्या सुमारे अडीच तास रंगलेल्या साध्या कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी खमंगवडा आणि चहापानाने झाला. आयोजन सागरपुत्र आणि वाशिष्ठी कन्या छात्रालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी केले.

हा अंक वाशिष्ठीच्या तीरावरील दानशूर स्वामीभक्त अंबरीश उर्फ दादा खातू आणि परिवाराच्या सेवाभावी वृत्तीस अण्णांनी समर्पित केला आहे. यावेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Neena Kurkal About 238 Days ago
Baba n all of his Sagarputra family r amazing.... the programme has brought everyone close to each other... Ramesh Dada has done an xellent job..... there r no words tht i can xpress it... all the best for future too... n my best wishes to Baba for writing more n more such books n make us knowledgeable abt things which v don't know.... Thanx!!!!!
1
0

Select Language
Share Link
 
Search