Next
‘तळजाई टेकडी वर्षभर राहणार हिरवीगार’
ग्रे-वॉटर प्रकल्पाला पेशवेकालीन भूमिगत कालव्याच्या पाण्याची जोड
प्रेस रिलीज
Thursday, May 09, 2019 | 12:00 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘आतापर्यंत पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांना ग्रे-वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून दररोज पाच लाख लिटर प्रक्रिया केलेले पाणी मिळत होते; मात्र आता त्याला पेशवेकालीन भूमिगत कालव्यातील ४५ लाख लिटर पाण्याची जोड मिळणार असून, दररोज ५० लाख लिटर पाणी टेकडीवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे टेकडी आता वर्षभर हिरवीगार राहणार आहे,’ अशी माहिती माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी दिली. 

पुणे महापालिकेतर्फे आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे कार्यान्वित झालेल्या देशातील पहिल्या ग्रे-वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून अंघोळीचे आणि स्वयंपाकाच्या पाण्यावर प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी तळजाई टेकडीवर जलवाहिनीतून  पोहचविण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना माजी उपमहापौर बागुल म्हणाले, ‘तळजाई टेकडीवर १०७ एकर क्षेत्रात वसुंधरा जैववैविध्य उद्यान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महापालिकेकडून साकारला जात आहे. नुकतेच येथे नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर येथे एक लाख चौरस फुटाचे कै. सदू शिंदे क्रीडांगणही उभारण्यात आले आहे. आजपर्यंत या टेकडीवरील वनसंपदेला वाचविण्यासाठी, प्राणी-पक्षांच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. आजपर्यंत या टेकडीवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहचवले जात होते; मात्र  कै. वसंतराव बागुल उद्यान येथे कार्यान्वित झालेल्या देशातील पहिल्या ग्रे-वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून ‘तळजाई’वर अडीच किमीच्या जलवाहिनीद्वारे आता प्रक्रिया केलेले पाच लाख लिटर पाणी पोहचत आहे; मात्र येथे हे पाणी अपुरे पडत असल्याने वनसंपदा हिरवीगार ठेवण्यासाठी पेशवेकालीन भूमिगत कालव्यातून आता ४५ लाख लीटर पाणी उचलण्यास सुरुवात केली आहे.’

‘सुमारे सात वर्षांपूर्वी पेशवेकालीन पाण्याचा उन्हाळ्यात उपयोग केला होता. आता ग्रे-वॉटरचे पाच लाख आणि पेशवेकालीन पाणी योजनेचे ४५ लाख असे दररोज पन्नास लाख लिटर पाणी येथे मिळत आहे. त्यामुळे आता वर्षभर तळजाई टेकडी हिरवीगार राहणार आहे. शिवाय वसुंधरा जैववैविध्य उद्यान प्रकल्पाला या पाण्याचा उपयोगही होत आहे. तसेच जमिनीत पाणी मुरून भूगर्भातील पाणीसाठाही वाढणार आहे. वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था आणि टेकडीचे संवर्धन यामुळे पर्यावरणप्रेमी सुखावले आहेत. लवकरच सौरउर्जेवरील ३०० किलोवॅटचा आदर्शवत प्रकल्पही  कार्यान्वित होणार आहे,’ असे बागुल यांनी सांगितले.
 
एकीकडे धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहता पिण्याच्या पाण्यासाठी पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर अंघोळीचे आणि स्वयंपाकाच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी ग्रे-वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत आणि पाण्याचा पुनर्वापर सहज शक्य आहे. शहरात विविध ठिकाणी पेशवेकालीन भूमिगत कालवे असून, त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते, हे पाणी पुणे शहराची वनसंपदा वाचवण्यासाठी वापरणे काळाची गरज आहे. अशा प्रकारे उपलब्ध असणारे पाण्याचे स्रोत वापरले जावेत,’ अशी अपेक्षा बागुल यांनी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search